किरणला हवीय तातडीची मदत... I Kiran Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social for Action

किरणला हवीय तातडीची मदत...

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील किरण विजय जाधव हा तीस वर्षीय तरुण आपली आई, पत्नी व दोन लहान मुलींसोबत राहत आहे. किरण हा घरात एकटाच कमावता असून, एका खाजगी रुग्णवाहिकेवर वाहनचालक म्हणून काम करून, तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.

सामाजिक कामाची आवड असणाऱ्या आणि आपले काम भले आणि आपण भले या विश्वात राहणाऱ्या किरणच्या आयुष्यात एक दिवस दुःखाचा डोंगर कोसळला सर्व काही सुरळीत असताना आठ महिन्यांपूर्वी किरणला अचानक थंडी, ताप येऊन त्याचे हिमोग्लोबीन झपाट्याने कमी झाले. त्यामुळे शहरातील नामांकित रुग्णालयात दाखल करून , त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरु होते , पण किरणच्या आजाराचे निदान होत नव्हते. एका रुग्णालयातून दुसऱ्या खाजगी रुग्णालयात किरणला दाखल केले. पण किरणचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते त्याला होणारा त्रास वाढतच होता. पुढील उपचार खाजगी रुग्णालयांमध्ये घेणे हे किरणच्या कुटुंबीयांना परवडणारे नव्हते म्हणून किरणच्या कुटुंबीयांनी किरणला ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयात विविध तपासण्या केल्यावर किरणच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे दिसून आले. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळताच किरणच्या आई - वडिलांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी किरणला डायलिसिस सांगितले असून, मागील आठ महिन्यांपासून किरणवर येरवडा येथील पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात डायलिसिस सुरु आहे.

किरण एकटा कमावता असल्याने या दरम्यान त्याच्या आजारपणामुळे उत्पन्नाचा स्रोत बंद झाला परिणामी किरणची पत्नी धुणे-भांड्याची कामे करून, आपले कुटुंब चालवत आहे. अशातच सहा महिन्यांपूर्वी किरणच्या वडिलांचे निधन झाले. डॉक्टरांनी किरणला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आवश्यक आहे असे सांगितले व त्यासाठी किडनी डोनरचा शोध घेण्यात आला. पण किडनी डोनर मिळत नसल्याने डॉक्टरांनी नात्यातील व्यक्ती किडनी देऊन, किरणला नवसंजीवनी देऊ शकते असे सांगितल्यावर किरणची आई आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आयुष्यासाठी किडनी देण्यास तयार झाली आहे. किरणवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बारा ऑक्टोबरला पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटल मध्ये होणार असून , त्यासाठी नऊ लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा खर्च आहे.

किडनी प्रत्यारोपनासाठी एवढी मोठी रक्कम किरणच्या कुटुंबियांना उभी करणे शक्य नाही. तसेच आतापर्यंतच्या उपचारांवर खूप खर्च झाला आहे. आपल्या मुलाला किडनी देऊन , मुलाला नवसंजीवन देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या एका आईने समाजातील दानशूर व्यक्तींना, स्वयंसेवी संस्थांना व खाजगी आस्थापनांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. आपल्या सर्वांच्या मदतीने किरण पुन्हा उभा राहू शकतो.

तातडीने कशी कराल मदत

किरण जाधव या तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर इंडिव्हिजवल सेक्शन मध्ये किरण जाधव या तरुणाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन किरण जाधव या तरुणाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक - ८६०५०१७३६६

टॅग्स :Team SFAKiran Jadhav