
उपेक्षितांना हवी ‘माया’
''सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन ’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते.
दुर्लक्षित मुलांसाठी मायेचा आधार बनलेल्या ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ या संस्थेची माहिती या सदरातून यापूर्वी म्हणजे मे महिन्यात दोन भागातून घेतली. ज्येष्ठ समाजसेविका रेणुताई गावस्कर यांच्या प्रयत्नातून उभारलेली ही संस्था उपेक्षित मुलांसाठी मोठे काम करत आहे. महाराष्ट्रातून ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ संस्थेला आर्थिक मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ संस्थेशी संपर्क साधला आहे.
आर्थिक दृष्ट्या मागास, वंचित व शाळाबाह्य मुलांच्या समस्यांचा आवाका लक्षात घेऊन व त्यांना आवश्यक असणाऱ्या मदतीची गरज समजावून घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे साधारणपणे अडीच एकराची जमीन ''एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास'' संस्थेला देणगीदाराच्या माध्यमातून मिळाली आहे. या जागेवर मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, अनौपचारिक शाळा, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अशा अनेक वास्तू उभारायची योजना आहे. या वास्तू उभारण्यासाठी व वसतिगृहासाठी आवश्यक भौतिक साधने अशा साहित्यावर होणारा खर्च जास्त आहे. त्यासाठी निधी संकलन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ संस्थेला अजूनही मदतीची आवश्यकता आहे.
सध्या कुडाळ वसतिगृह व शाळा बांधकाम प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. रोटरी क्लबच्या भक्कम पाठिंब्याने साधारण पन्नास मुलांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येईल, असा एक सांस्कृतिक हॉल बांधून पूर्ण झाला आहे. मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. लहान मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पाण्यासाठी संस्थेने येथे एक बोअरवेल घेतले असून, बोअरवेलला पाणी सुद्धा चांगले लागले आहे. पण कुडाळला आठवड्यातून दोनदा वीज जाते अशावेळी बोअरवेल चा वापर करता येत नाही. पाण्याची गैरसोय होते. पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी संस्थेला एका जनरेटरची गरज आहे. तसेच वसतिगृहाचा संपूर्ण परिसर तीन एकर जागेचा आहे.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसराला भिंतीचे कुंपण करणे आवश्यक आहे. याशिवाय वसतिगृहासाठी व सांस्कृतिक हॉलसाठी आवश्यक भौतिक साधने (बाके, पलंग) शैक्षणिक साधने व सांस्कृतिक साधने खरेदी करण्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे. रेणूताईंना इथे एकीकडे शिक्षण घ्यायला येणाऱ्या व दुसरीकडे संस्थेत राहाणाऱ्या अशा मुलांचं एक सुंदर घर निर्माण करायचे आहे. यासाठी एकलव्य न्यासाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. समाजाच्या क्रियाशील पाठिंब्याशिवाय वंचित मुलांच्या विकासाचे ध्येय गाठणे अवघड आहे. कुडाळचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेणुताई व त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न सुरु आहेत. ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ ही संस्था दानशूर व्यक्तींच्या देणगीवर उभे आहे. त्यासाठी गरज आहे सामूहिक मदतीची !
कशी कराल मदत....
‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक ttps://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन "एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक - ८६०५०१७३६६
Web Title: Team Sfa Writes About Kudal Hostel Social For Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..