esakal | प्रयत्न मुलींच्या उन्नतीसाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Girls Workshop

प्रयत्न मुलींच्या उन्नतीसाठी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सकाळ सोशल फाउंडेशन''च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात ''जान्हवी फाउंडेशन'' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याविषयी...

जान्हवी फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून, २००९ पासून सामाजिक क्षेत्रात ती कार्यरत आहे. २००९ मध्ये बाबासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारानं संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र तुळसे, डॉ. विक्रम गायकवाड व इतर समविचारी सेवाभावी लोकांच्या मदतीनं आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रांत लोकसहभागातून तळागाळातील लोकांचं आयुष्यमान उंचाविण्यासाठी जान्हवी फाउंडेशन संथेची स्थापना करण्यात आली. शिरेद्वारे नशा करणाऱ्या युवकांसाठी, तसंच दारू, तंबाखू, गांजा इत्यादींचं व्यसन करणाऱ्या तरुण व युवकांसाठी समुपदेशन, जनजागृतीपर मार्गदर्शन व उपचार आदी उपक्रम संस्थेमार्फत शहर परिसरातील झोपडपट्टी भागात, तसंच ग्रामीण भागात राबविले जातात. तसंच, झोपडपट्टीतील किशोरवयीन मुलींसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरं आयोजित केली जातात.

जान्हवी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून २०१४ पासून बेघर लोकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं दिवस-रात्र निवारा प्रकल्प चालविला जातो. या प्रकल्पात बेघर लोकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था केली जाते. तसंच अशा लोकांचं समुपदेशन करून, त्यांच्या समस्या मूलतः सोडवण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला जातो. कृती आराखड्यानुसार त्यांच्या समस्यांवर काम करून, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. संस्थेकडून ज्या बेघर लोकांकडं आधार कार्ड, रेशनिंग कार्ड नाही, अशा सर्वांना आधार कार्ड व रेशनिंग कार्ड देण्याची व्यवस्था केली जाते. कोरोनाच्या साथीत व लॉकडाउनकाळात हा निवारा प्रकल्प लोकांसाठी आधारवड ठरला. लॉकडाउन कालावधीत पायी चालत निघालेल्या कामगारांना निवारा प्रकल्पात आश्रय मिळाला व त्यांना परत रोजगार मिळवून देण्याचं काम जान्हवी फाउंडेशनमार्फत करण्यात आलं.

२०१८ पासून जान्हवी फाउंडेशन संस्थेनं महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्यानं शिरेद्वारे नशा करणाऱ्या युवकांसाठी समुपदेशन प्रकल्प पिंपरीत सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत गर्दसह इतर व्यसनं करणाऱ्या युवकांसाठी मोफत दवाखाना चालवला जातो. यामध्ये OST (ओपाइड सबस्टिट्यूट थेरपी) दिली जाते. जान्हवी फाउंडेशनचं हे केंद्र मुंबई वगळता महाराष्ट्रात असणारं दुसरं सुविधा केंद्र आहे. या प्रकल्पाद्वारे तंबाखू, दारू, गांजा, गर्द इत्यादींचं व्यसन सुटण्यासाठी उपचार व समुपदेशन केलं जातं.

जान्हवी फाउंडेशनमार्फत वस्तीपातळीवर पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं, तसंच ग्रामीण भागात जिल्हा परिषद यांच्या सहकार्यानं महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविले जातात, यामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, व्यवसाय सहकार्य आदींचं काम केलं जातं. तसंच, वस्तीपातळीवर व ग्रामीण भागात शालेय व किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी, आरोग्य, स्वच्छता यांविषयी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. तसंच, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, सॅनिटरी पॅडवाटप, हिमोग्लोबीन तपासणी, उपचार व औषधवाटप असे उपक्रम राबविले जातात.

याशिवाय संस्थेकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहकार्यानं किशोरवयीन मुलींचं आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमालांचं आयोजन, तसंच महिलांसाठी डिजिटल साक्षरता अशा विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. जान्हवी फाउंडेशनमार्फत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींसाठी, वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी व व्यक्तिगत शारीरिक स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा वापर व योग्य विल्हेवाट, मासिक पाळीविषयी गैरसमज व अंधश्रद्धा, वास्तविकता, गुड टच - बॅड टच, करिअर समुपदेशन यांविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच, सॅनिटरी पॅडचं वाटप करून, दर तीन महिन्यांनी रक्तक्षयाची तपासणी व लोहाच्या गोळ्यांचं वाटप व त्यानंतर पुन्हा मुलींची तपासणी करून, झालेल्या सुधारणांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. वरील उपक्रमांतर्गत एका मुलीसाठी किमान (आरोग्य तपासणी, औषधं व सॅनिटरी पॅड) एक हजार रुपये खर्च येणार आहे. भोर परिसरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींना वरील प्रकल्पात सहभागी करून घेण्यासाठी संस्थेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी मदत कराल...

'जान्हवी फाउंडेशन'' या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर ॲक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘जान्हवी फाउंडेशन’ या संस्थेच्या उपक्रमांची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ''जान्हवी फाउंडेशन'' या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ''डोनेट नाऊ'' या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक : ८६०५०१७३६६

- टीम SFA support@socialforaction.com

loading image