बालकांना आणि वृद्धांना मदतीचा हात... | Sakal Social Foundation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prarthana Balgram
बालकांना आणि वृद्धांना मदतीचा हात...

बालकांना आणि वृद्धांना मदतीचा हात...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. आजच्या भागात सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची येथील ''प्रार्थना फाउंडेशन’ च्या कामाविषयी....

अनू आणि प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे ‘ प्रार्थना फाउंडेशन’ च्या माध्यमातून रस्त्यावरील बेघर, निराधार मुले आणि वृद्धांसाठी प्रार्थना बालग्राम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कामगार असणाऱ्या वडिलांचे मासिक उत्पन्न कमी व त्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या जास्त त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी कायम विस्कळीत होती. अर्धवेळ नोकरी करून अनंतअम्मा कृष्णय्या म्हणजे अनू यांनी एमएसडब्ल्यू हा प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला होता. महाविद्यालयाच्या रस्त्यावर भिक्षा मागणारी मुले व अन्नाच्या शोधात कचराकुंडीजवळ फिरणारी मुले पाहून, या लोकांसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून, काहीतरी वेगळे करण्याचा निश्चय त्यांनी केला.

याच दरम्यान त्यांची ओळख प्रसाद मोहिते या तरुणाशी झाली. प्रसाद आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून, प्रसादच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केली होती. वडिलांचे छत्र हिरावल्यानंतर प्रसाद यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले, जगण्यासाठी, अन्नासाठी व शिक्षणासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याप्रमाणेच आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील मुलांना तसेच रस्त्यावरील बेघर , निराधार व भिक्षेकरी मुलांना जीवन जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागत असेल या विचाराने दोघांनीही अशा दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आणि दोघांनी बेघर, निराधार भिक्षा मागणाऱ्या दहा मुलांसाठी ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ प्रकल्प सुरु केला. आजमितीस या शाळेत ३०० मुले आहेत. एकत्र काम करत असतानाच काही काळाने दोघांनी लग्न केले. विवाहानंतर काही काळ दोघेही नोकरी करत होते. भिक्षेकरी, निराधार , बेघर व फूटपाथवर राहणाऱ्या मुलांना दोघे रोज सकाळी शिकविण्यासाठी जात. दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी परत मुलांना शिकविणे असा दिनक्रम सुरु होता.

दरम्यान घरी येताना प्रवासा दरम्यान निराधार आजारी लोकांची सेवा, औषधोपचार दोघेही करत. मात्र नोकरीमुळे ते निराधार लोकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे पूर्णवेळ समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करून , त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दोघांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन , आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अनू यांनी खानावळ सुरू केली व प्रसाद रिक्षा चालवू लागले. खानावळ व्यवसायातून येणारा पैसा ते समाजासाठीच वापरत. दरम्यानच्या काळात वंचितांची शाळा या अनौपचारिक शाळेचे रूपांतर निवासी प्रकल्पात करायचे ठरले त्यासाठी संस्था सुरू करणे आवश्यक होते. याचकाळात अनू-प्रसाद यांचं बाळ दगावलं. त्यांनी आपल्या तान्ह्या बाळाचे देहदान करून समाजाला एक आदर्श घालून दिला. मुलगी जन्माला आली तर तिचं नाव प्रार्थना ठेवायचं असे दोघांचे ठरल्यानं मुलीच्या स्मरणार्थ अनू आणि प्रसाद यांनी ‘प्रार्थना फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना २०१६ मध्ये करून, संस्थेची नोंदणी २०१८ साली केली.

‘प्रार्थना फाउंडेशन’ च्या माध्यमातून विविध समाजविधायक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच रस्त्यावरची बेघर आणि निराधार मुलं-मुली आणि वृद्धांसाठी " प्रार्थना बालग्राम" हा निवासी प्रकल्प हक्काच्या जागेत उभा करण्याची दोघांची इच्छा आहे. त्यासाठी प्रसाद यांनी इर्लेवाडी या मूळ गावी आलेली स्वतःची पाच एकर जमीन विकून प्रकल्पासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची येथे हक्काची जमीन घेतली आहे. त्या जागेवर समाजातील देणगीदारांच्या मदतीने ‘प्रार्थना बालग्राम’चे बांधकाम सुरु आहे. आज बहुसंख्य आजी - आजोबा कोणाचाच आधार नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला दयनीय अवस्थेत जीवन व्यतीत करत आहेत. तर काही जणांना मुले, नातेवाईक असून देखील त्यांचा सांभाळ केला जात नाही. अशा बेघर आजी आजोबांच पुढचं आयुष्य सुखकर व आनंदात जाण्यासाठी त्यांच्या पुनर्वसन व संगोपनासाठी संस्थेच्या माध्यमातून वंचितांच्या निवासी शाळेबरोबरच वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार असून , वृद्धाश्रमाचे देखील बांधकाम सुरु आहे.

रस्त्यावर राहणाऱ्या निराधार व मानसिक रुग्णांसाठी ‘मनोबल’ हा प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून चालवला जातो. या लोकांमध्ये जाऊन त्यांना बोलते करून , त्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक लोक आजारी अवस्थेत पडलेले असतात त्यांना उपचारासाठी संस्थेमार्फत दवाखान्यात नेले जाते. तरुणांसाठी " कृतिशील तरुणाई संवाद " या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईच्या मनात पडणारे विविध प्रश्नांवर विषयांवर सवांद सत्र भरवले जाते. तसेच मार्गदर्शकांच्या मदतीने त्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण केले जाते. वस्ती मध्ये राहणाऱ्या महिला व किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीवर समुपदेशन, व आरोग्य शिबीर राबवले जातात. असे अनेक विविध उपक्रम अनू आणि प्रसाद ‘प्रार्थना फाऊंडेशन’च्या माध्यमातून राबवत आहेत. ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरची बेघर आणि निराधार ३०० मुलं-मुली आणि वृद्धांसाठी " प्रार्थना बालग्राम" हा निवासी प्रकल्प हक्काच्या जागेत उभा राहत असून , प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. सध्या प्रकल्प भाड्याच्या जागेत सुरु आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी " प्रार्थना फाउंडेशन " ला आपल्या सर्वांच्या सामुदायिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘प्रार्थना फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘प्रार्थना फाउंडेशन’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन ‘प्रार्थना फाउंडेशन’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरातले ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Helping Hand To Children And Elderly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :childrenTeam SFA