निराधारांसाठीचा प्रेमळ आधार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social for Action
निराधारांसाठीचा प्रेमळ आधार !

निराधारांसाठीचा प्रेमळ आधार !

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला. या वेबसाईटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात नवजात ते सहा वर्षे वयाच्या निराधार बालकांचा सुरक्षित सांभाळ व त्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच या मुलांना सुरक्षित हक्काचे घर मिळवून देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या संस्थेच्या कार्याविषयी....

समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित नवजात शिशु व बालके यांना मदत करण्याच्या हेतूने ‘भारतीय समाज सेवा केंद्र'' या संस्थेची स्थापना १९७९ मध्ये पुण्यात झाली. या प्रकारच्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी- सुविधांपेक्षा अशा मुलांची संख्या कितीतरी पटीने अधिक असण्याचा हा काळ होता. उपलब्ध असलेल्या सोयी- सुविधांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नव्हती. कमालीचे दारिद्र्य , साक्षरतेचा आभाव , व्यक्तिगत आरोग्याविषयी तसेच गर्भधारणा याविषयी असलेली चुकीची व अपुरी माहिती यामुळे विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधातून जन्माला येणारी बालके निराधार अवस्थेत सापडत असतं तसेच अशा बालकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असे त्यामुळे अशा बालकांचा परित्याग करण्यात येत असे.

अशा बालकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमती उषा मोडक, डॉ. बानू कोयाजी व श्री. गडकरी या तिघांनी एकत्र येऊन, नवजात ते सहा वर्षे वयाच्या निराधार बालकांचा सुरक्षित सांभाळ व त्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच या मुलांना सुरक्षित हक्काचे घर मिळवून देण्याच्या हेतूने अमेरिकेतील Holt International Children''s Services संस्थेच्या सहकार्याने '' ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ ही संस्था स्थापन करून, काम सुरु केले. पुढे या उपक्रमास नॉर्वे येथील Verden''s barns संस्थेने सहकार्य केले. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती यांच्या मदतीवर संस्थेचे कार्य सुरू आहे. एका लहानश्या घरामध्ये संस्थेचा सुरू झालेला हा प्रवास तब्बल ४२ वर्षे अविरतपणे सुरू आहे. राज्यात औरंगाबाद, सांगली व चिपळूण या शहरांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. सध्या संस्थेत ८६ बालके आहेत.

संस्थेकडे येणाऱ्या प्रत्येक बालकाची प्रवेश प्रक्रिया ही बालकल्याण समिती यांच्या आदेशाने होते. जन्मदाते पालक, कुटुंबे, निराधार व्यवस्थित सापडलेली बालके तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके हे या प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.

संस्थेमार्फत खालील उपक्रम राबविले जातात.

बालसंगोपन केंद्र : प्रत्येक मुलाला जगण्याचा व संरक्षणाचा हक्क आहे. बाळाच्या वाढीला व आयुष्याला आकार देणारी पहिली सहा वर्षे खूप महत्त्वाची असतात. संस्थेत दाखल होणाऱ्या निराधार बालकांना बालसंगोपन केंद्रात ठेवले जातात. प्रत्येक बाळाच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार त्यांच्या पुनर्वसनाचा स्वतंत्र आराखडा ठरवला जातो. प्रत्येक बाळाची काळजी स्वतंत्रपणे घेतली जाते. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध पद्धतीने काटेकोरपणे संगोपन केले जाते. संगोपन कार्यक्रमात पुढील बाबींची अंमलबजावणी केली जाते.

मुलांची वैद्यकीय निगा, थेरपी, समुपदेशन, मनोरंजन, सामाजिक कौशल्य विकास, शारीरिक व भावनिक निरोगीपणा, औपचारिक व अनौपचारिक शिक्षण आणि पर्यायी सेवांच्या माध्यमातून मुलांचे योग्य पुनर्वसन. कुमारी माता व परितक्त्या मातांना सल्ला व मार्गदर्शन : मातांची शारीरिक, भावनिक संपूर्ण काळजी तसेच प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतरच्या गरजांची काळजी आणि मातेचे पुनर्वसन व मुलांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया बालकल्याण समितीमार्फत करून घेणे.

परित्याग केलेल्या बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे, बऱ्याच वेळा ही बालके अत्यंत कमी वजनाची व कुपोषित असतात तसेच त्यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असते. अशावेळी अशा बालकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे.

कायदेशीर शोध प्रक्रिया आणि बेवारस स्थितीत सापडलेल्या मुलांच्या कुटुंबांचा शोध घेऊन, जन्मदाते व कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करून, गरजेनुसार बालकांना जन्मदात्या कुटुंबाकडे स्वाधीन करणे. तसेच कुटुंबाच्या अडचणीच्या काळात मदत करणे.

शाळाबाह्य किंवा शिक्षणापासून वंचित असलेली इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुला-मुलींना ‘शैक्षणिक प्रायोजकता’ या उपक्रमांतर्गत संस्था मदत करते. ही मुले होतकरू असून, शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा त्यांच्यामध्ये असते. बदलत्या काळानुसार उच्च शिक्षणाचे महत्त्व संस्थेने ओळखले आहे व त्या अनुषंगाने गरजू व होतकरू मुलांना संस्था उच्चशिक्षित होण्यासाठी वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करते. संस्थेच्या मदतीमुळे व प्रयत्नामुळे अनेक मुले त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थिर झाली आहेत तसेच पर्यायाने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे.

शैक्षणिक मदत व वस्ती विकास प्रकल्पांतर्गत वस्तीपातळीवरील कमी उत्पन्न गटातील शाळाबाह्य मुलांसाठी ‘शैक्षणिक मदत’ या योजनेतून ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या संस्थेद्वारे मुलांना त्यांच्या कुटुंबातच राहून मोठे होता यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच वस्तीपातळीवर पालकांचे समुपदेशन, मार्गदर्शन कार्यशाळा, वाचनालय, शैक्षणिक साहित्य वाटप, सायकल वाटप आदी उपक्रम राबविले जातात.

वर्ष २०२० पर्यंत संस्थेने एकूण ६ हजार ५५ बालकांचा सांभाळ केला असून, ४ हजार ५६९ बालकांचे योग्य अशा कुटुंबात दत्तकविधीमार्फत पुनर्वसन केले आहे. तसेच ६२९ बालकांना त्यांच्या जन्मदात्या कुटुंबाकडे परत सोपवले आहे. शिवाय २७४ बालकांना त्यांच्या पुढील पुनर्वसनासाठी योग्य त्या संस्थेत पाठवण्यात आले आहे. संस्थेचे ध्येय , उद्दिष्टे व मूल्यांचा विचार करता समाजातील गरजू होतकरू बालकांचे संरक्षण ,संगोपन, शिक्षण व कायम पुनर्वसन या कार्यांसाठी समाजाने पुढे यावे व संस्थेला मदतीचा हात द्यावा. तसेच सामाजिक प्रकल्पांसाठी ''भारतीय समाज सेवा केंद्र'' संस्थेला आपल्या सर्वांच्या सामुदायिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत ...

‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन, ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक : ८६०५०१७३६६

असा मिळाला मदतीचा हात...

प्रार्थना फाउंडेशन संस्थेची या सदरात आलेली माहिती वाचून पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार चोरडिया यांनी प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने प्रार्थना फाउंडेशन संस्थेला दोन लाख पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे.

Web Title: Team Sfa Writes Loving Support For Baseless Social For Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFA