कर्करोगग्रस्त बालकांचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devata Life Foundation
कर्करोगग्रस्त बालकांचा आधार

कर्करोगग्रस्त बालकांचा आधार

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. कर्करोगानेग्रस्त मुलं औषधं व उपचारांकरिता दत्तक घेऊन, अशा मुलांना कर्करोगमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नागपूरमधील ‘ देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेविषयी...

‘देवता लाइफ फाउंडेशन’ ही नागपूरमधील संस्था बारा वर्षांखालील कर्करोगग्रस्त मुलांसाठी काम करते. नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे यांनी ‘देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. कर्करोगाने पीडित असलेल्या मुलांना व पालकांना आधार देणं, कर्करोगाविषयी व उपचारांविषयी जनजागृती करणं, मुलांना त्वरित योग्य उपचार व औषधं उपलब्ध करून देणं व कर्करोगाशी लढण्याचं सामर्थ्य व सकारात्मक वृत्ती निर्माण करणं या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली. कर्करोग हा शब्द ऐकताच आपल्या पायाखालची जमीन सरकते. माणूस घाबरून जातो. यातच लहान मुलं असतील, तर या लहान मुलांची व त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था फारच नाजूक होते. यामध्ये काही गोष्टींवर लक्षपूर्वक काम केलं, तर कर्करोगासारख्या विकारावर मात करून, जीव वाचू शकतात.

‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्थेने रुग्णाची कर्करोगविषयक तपासणी आणि त्वरित निदान व योग्य उपचारपद्धती, तसंच कर्करोगाविषयी समाजात सामाजिक प्रबोधन व जनजागृती या बाबींवर काम करण्यास सुरुवात केली. अशा मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व कर्करोगाचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी, प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी ‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्थेने ‘देवदूत’ या नावाने कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे.

‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्थेकडून बारा वर्षांखालील कर्करोगग्रस्त मुलं, त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कर्करोगाच्या उपचारांकरिता दत्तक घेतली जातात. अशा मुलांचे उपचार शासकीय वैद्यकीय रुग्णालयात केले जातात. या मुलांच्या प्रत्येक महिन्याच्या औषधांसाठी, ब्लड व इतर उपचारपूरक खर्चासाठी ‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्थेकडून मदत केली जाते. बहुसंख्य पालक आपल्या मुलांच्या उपचारांकरिता नागपूर तसंच बाहेरून आसपासच्या ग्रामीण भागातून येतात. ‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्थेचे देवदूत अशा कर्करोगग्रस्त मुलांशी सतत भेटत असतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

प्राची धाक नावाच्या एका लहान मुलीला ब्लड कॅन्सर झाल्याचं निदान झालं. संस्थेने तिला तिच्या बाराव्या वर्षी उपचारांकरिता दत्तक घेऊन, त्वरित उपचार उपलब्ध करून दिले. तिच्यावर जवळपास एक वर्ष उपचार करण्यात आले, ती बरीपण झाली. संस्थेचे देवदूत तिच्याशी कायम संपर्कात होते. पण, तीन वर्षांनी तिचा कॅन्सर परत बळावला. संस्थेकडून पुन्हा तिला उपचारांसाठी मदत केली. मुलगीसुद्धा हसत-खेळत उपचारांना सामोरं गेली. तिने किमो घेतले व कॅन्सरला दुसऱ्यांदा मात दिली. या सर्व प्रक्रियेत ‘देवता लाइफ फाउंडेशन’ संस्था तिच्या व तिच्या कुटुंबीयांच्या सोबत होती.

बघता बघता ती आता अठरा वर्षांची झाली आहे. तिच्या हिमतीला दाद देण्यासाठी व काही आनंदाचे क्षण तिच्यासोबत घालविण्यासाठी संस्थेने तिचा अठरावा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. वाढदिवशी सर्व देवदूत एकत्र आले. बाकी सर्व मुलांनासुद्धा बोलावलं. केक, फुगे, गिफ्ट्स अशी सर्व तयारी केली आणि प्राचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तिला सर्वांनी अकरा हजार रुपये तिच्या शिक्षणासाठी व औषधांसाठी दिले. आज प्राची तिच्या घरी सुदृढ स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आहे.

संस्थेतर्फे इतरही सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरं, मोफत शैक्षणिक साहित्यवाटप, उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी कौशल्य शिबिरं, शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकलवाटप असे इतर उपक्रमसुद्धा राबविले जातात. गेल्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी ‘देवता सेवा संघ’ची स्थापना करून, या उपक्रमाच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना डबा पोहोचविणं, मानसिक आधार देणं, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं अशा सेवा दिल्या जातात.

‘देवता लाइफ फाउंडेशन’च्यावतीने ‘वंदे मातरम्‌ रक्तदान महायज्ञ’ रॅलीचं आयोजन मागील वर्षी २ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान केलं होतं. या रॅलीचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा होता. संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. बहुसंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्ताची आवश्यकता सतत राहते. या रक्तदानाच्या महायज्ञातून अनेक गरजू व रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला. ‘देवता लाइफ फाउंडेशन’ने सुरू केलेल्या या महायज्ञात शेकडो लोकांनी रक्तदान करून, अनेकांचे जीव वाचविण्यासाठी मदत केली.

कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारांकरिता मदत करण्यासाठी संस्थेने सुरुवातीला अठरा मुलं दत्तक घेतली होती. त्यांतील आज बारा मुलं संस्थेच्या प्रयत्नांमुळे कर्करोगमुक्त झाली आहेत. शिवाय, नवीन बारा मुलं उपचारांकरिता दत्तक घेतली आहेत. संस्थेला अशा अनेक मुलांना उपचारांकरिता मदत करावयाची आहे. त्याकरिता संस्थेला समाजाच्या सर्व स्तरांतून सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल संस्थेला मदत...

‘देवता लाइफ फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Support For Children With Cancer Devata Life Foundation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top