...वणवण थांबेल पाण्यासाठीची !

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
mandav khadak village water issue
mandav khadak village water issuesakal
Summary

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘ सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. या वेळी सकाळ समूहाने राबवलेल्या उपक्रमाविषयी....

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या वेगरे-मांडवखडक या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या ‘सकाळ’ने जाणून ती दूर करण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून गावातील डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकीपासून गावठाणापर्यंत जलवाहिनी टाकण्याचं काम हाती घेतलंय. यामुळे मांडवखडकच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरणार असून, ग्रामस्थांना आता घरपोच चोवीस तास पाणी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील मुठा नदीचा उगम जिथून होतो, तिथल्या भूमिपुत्रांना आजही पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरं जावं लागत आहे. मुठा खोऱ्यातील वेगरे (ता. मुळशी) हा भाग तसा आजही दुर्गमच. मुख्य तीन विभागांत पसरलेल्या या गावातील शेवटचं टोक म्हणजे मांडवखडक. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात पर्जन्यराजाचा डोक्यावर मांडव, तर उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा खडक, अशी अवस्था असते, त्यामुळे ‘टिबलून टिबलून मान आणि बोटांची वाट लागलीय ह्या पाण्यापायी’, ‘म्हातारं भूतासारखं उठून पळतंय रात्रीचंच पाणी भरायला,’ हा संवाद आहे मांडवखडकच्या रहिवाशांचा.

जानेवारी महिना संपला की, इथल्या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. नैसर्गिक झऱ्यातून थेंब-थेंब ठिबकणारं पाणी, एक वाटी साठा होईपर्यंत महिलांना करावी लागणारी प्रतीक्षा, रात्रीचा दिवस करून वाटीवाटीने पाणी भरावं लागणे, अगदी अपरात्रीही पाण्यासाठी खोल दरीत उतरणे अशा अनेक समस्यांना इथल्या महिलांना तोंड द्यावं लागत असून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी मूगाव हद्दीतील विहीर, स्मशानभूमीलगतचा झरा, तर जनावरांसाठी नासकीचा डोह हाच त्यांचा पाण्याचा स्रोत. मे व जूनमध्ये तर जनावरांनाही वाटी-वाटीने पाणी एका बॅरलमध्ये भरून नंतर जनावरांना पाजावं लागतं. किमान दीड ते अडीच किलोमीटर अंतरावर जाऊन येथील महिलांना वाटी अथवा कपाने पाणी भरून हंडा भरावा लागतो. सुमारे दोन तासांनंतर एका कुटुंबाला पाणी उपलब्ध होतं, मग हे पाणी डोक्यावरून वाहून न्यावं लागतं.

पूर्वेला मुख्य वेगरे गाव, दक्षिणेला लवासातील मूगाव, पश्चिमेला ताम्हिणीचा परिसर, तर उत्तरेला वारक गाव आहे. या चारही ठिकाणांपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर डोंगराच्या उंचावरील भागात वसलेली लोकवस्ती. मांडवखडक, बावधानेवस्ती, आखाडेवस्ती, ढेबेवस्ती आणि कोकरेवस्ती अशी विखुरलेल्या अवस्थेत इथली घरं. एकूण तीस कुटुंबं असून दीडशे ते पावणेदोनशेच्या आसपास लोकसंख्या आहे. गाई, म्हशी, शेळ्या आदींचं पालन करून दुग्धोत्पादनावर यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने चालतो. मात्र माणसांनाच प्यायला पाणी नाही, जनावरांच्या पाण्याची समस्या तर आणखीच बिकट आहे. परिसरात तीन ठिकाणी नैसर्गिक झरे असून, हे झरेही एप्रिलनंतर आटू लागल्याने थेंबाथेंबाने साठलेलं पाणी गोळा करावं लागतं.

अलीकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील उंचावरील डोंगरावर तीन लाख लिटर क्षमतेची पाण्याची साठवण टाकी उभारली असून, मूगाव हद्दीतील विहिरीतून त्यात पाणी साठवलं जातं. या टाकीपासून सर्व वस्त्या दीड ते अडीच किलोमीटर अंतरावर असल्याने पाणी असूनही केवळ पाइपलाइनअभावी गावठाणापर्यंत व घरापर्यंत पाणी मिळत नाही. बऱ्याचदा हे पाणी मिळविताना वाया जाण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे दैनिक ‘सकाळ’ने या समस्येची दखल घेतली आणि पाण्याच्या टाकीपासून मांडवखडकपर्यंत जलवाहिनीच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. यासाठी पुण्यातील भोसरी येथील न्यूमन अँड ईस्सार इंजिनिअरिंग (इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत मदत केली आहे.

हे काम पूर्ण होताच घरोघरी पाणी मिळणार असल्याने इथल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरणार आहे. रात्री-अपरात्री पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आता थांबणार आहे. या कामासाठी वेगरे- मांडवखडकचे ग्रामस्थ श्रमदानदेखील करत आहेत.

मांडवखडकला लागून अजून दोन वाड्या-वस्त्या आहेत. या दोन वाड्या-वस्त्यांपर्यंत जलवाहिनी नेण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. तसंच, राज्यातील विविध ग्रामीण भागांतील नागरिकांशी निगडित समस्या दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू राहणार असून, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, औद्योगिक आस्थापना व माहिती तंत्रज्ञान कंपन्या यांनी सीएसआरअंतर्गत (सामाजिक उत्तरदायित्व) मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे.

कशी कराल मदत...

वेगरे-मांडवखडक येथील जलवाहिनीच्या कामासाठी व इतर ठिकाणी करण्यात येणाऱ्या विविध समाजविधायक प्रकल्पांसाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘वेगरे-मांडवखडक’ येथील जलवाहिनीच्या प्रकल्पाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, थेट ऑनलाइन मदत देऊ शकतात. देणगी दिल्यानंतर देणगीची पावती आपल्या ई-मेलवर त्वरित प्राप्त होईल. तसंच, देणगीदारास प्राप्तिकराच्या कलम ८० जी नुसार आयकरात पन्नास टक्के सवलत मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com