

Donald Trump China Visit Analysis
esakal
अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नुकताच झालेला चीन दौरा खूप गाजला; पण त्यातून अमेरिकेच्या आणि चीनच्याही हाती काय लागले, हे विचार करण्याजोगे आहे. भारतासाठी या दौऱ्याचा अर्थ काय, याचे विष्लेषण करणारा हा लेख.
संपूर्ण जगाने डोनाल्ड ट्रम्प यांचा १३ ते १५ मे दरम्यान झालेला बीजिंग दौरा पाहिला. अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर त्या देशातील अनेक बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुखही होते, ही बाब कुणाच्याही नजरेतून सुटली नाही. एकत्रितपणे त्यांचे भाग-भांडवल लाखो-कोटींमध्ये (ट्रिलियन्स) आहे. अनेक वर्षांत प्रथमच झालेल्या जगातील दोन बलाढ्य सत्ता-प्रमुखांच्या या भेटीकडून खूप अपेक्षा होत्या. किमान दोन देशांतील स्पर्धेची जागा सहकार्याच्या भावनेने घ्यावी, यासाठी ते वाट काढतील असे वाटले होते.
बीजिंगने या दौऱ्याचे महत्त्व किती आहे हे दाखवण्यासाठी मोठा गाजावाजा केला. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे ट्रम्प यांच्याबरोबर ‘टेम्पल ऑफ हेवन’च्या भेटीत उपस्थित होते. तसेच ‘झोंगनानहाइ’- जिथे चीनचे राजकीय नेते राहतात- या स्थळाची दुर्मीळ भेट जिनपिंग यांनी ट्रम्प यांना करवली. अपेक्षेप्रमाणे ‘द ग्रेट हॉल ऑफ पीपल’मध्ये पायघड्या घालून केलेले स्वागत आणि शाही जेवणावळ होतीच. जाहीरपणे कॅमेऱ्यांसमोर बोलताना ट्रम्प व जिनपिंग दोघांनीही अमेरिका-चीन संबंधांचे महत्त्व अधोरेखित करत एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.