

The Bad Guys franchise
esakal
‘द बॅड गाइज’ (२०२२) आणि त्याचा पुढचा भाग ‘द बॅड गाइज २’ (२०२५) हे दोन्ही सिनेमे एका साध्या, पण परिणामकारक कल्पनेवर आधारलेले आहेत. काही कुख्यात गुन्हेगार प्राणी एकत्र येऊन मोठे चोरीचे डाव रचतात, पण एका अपयशी घटनेनंतर त्यांना चांगले बनण्याचा प्रयोग करावा लागतो. पहिल्या भागात हा प्रयोग अनिच्छेने सुरू होतो, तर दुसऱ्या भागात ते खरोखर बदलले आहेत का, की गुन्हेगारी हाच त्यांचा स्वभाव आहे, हा प्रश्न केंद्रस्थानी येतो. दोन्ही सिनेमे या संघर्षाभोवती फिरतात, पण तो संघर्ष नैतिकतेविषयी असूनही त्याला बोजड किंवा सरळसोट धड्याचे रूप मिळत नाही.
या फ्रँचायझीची गंमत तिच्या पॅरडी आणि ओमाजच्या थरांमध्येही आहे. ‘द बॅड गाइज’ हा ॲनिमेशनपट असूनही तो सतत लाइव्ह-अॅक्शन क्राइम सिनेमांशी असलेले आपले नाते टिकवून ठेवतो. पहिल्या भागातच ‘ओशन्स इलेवन’, ‘पल्प फिक्शन’, ‘रेझर्वॉयर डॉग्ज’ यांसारख्या सिनेमांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. पात्रांची ओळख करून देताना वापरलेली स्लो-मो चाल, स्टायलिश फ्रीज-फ्रेम्स, आणि ‘कूल’ गुन्हेगार अशी मांडणी ही थेट हॉलीवूड हाइस्ट सिनेमांची खिल्ली उडवणारी आहे. मिस्टर वुल्फचा (सॅम रॉकवेल) आत्मविश्वास, मिस्टर स्नेकचा (मार्क मॅरन) संशयी स्वभाव आणि टोळीतील संवादांची लय हे सारे जाणीवपूर्वक शैलीदार स्वरूपाचं आहे. हा सिनेमा गुन्हेगारीचं ग्लॅमरायझेशन करत नाही, पण त्याचं स्टाइलाइज्ड रूप मात्र मनसोक्तपणे वापरतो.