
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘द बॉण्ड्समन’ मालिका कथाकेंद्री नाही, शैलीकेंद्री आहे. तिचं मूल्य ‘काय घडलं?’ याऐवजी ‘ते कसं मांडलं?’ यामध्ये अधिक आहे. तिचं जग खोटं वाटत नाही; पण खरंही वाटत नाही. हा एक चित्रपटीय हिंसोत्सव आहे.
केविन बेकन ‘द बॉण्ड्समन’मध्ये एका बाउंटी हंटरची भूमिका साकारतो; पण तो साधासुधा बाउंटी हंटर नसून मरणातून परतलेला बाउंटी हंटर आहे. त्याने एक रहस्यमय ‘डील’ केलेली आहे आणि आता तो त्याच्या या व्यवहाराची किंमत फेडतो आहे. तो अमेरिकेच्या दक्षिणेकडील अघोरी, विसंगत प्रदेशात भटकतो. त्याचं हे नवं आयुष्य समोर मांडताना मालिका वेस्टर्न, हॉरर आणि कॉमेडीचं एक गमतीशीर मिश्रण सादर करते, त्यामुळे ती थोडी विस्कळित, गोंधळलेली वाटते; पण त्यातच तिचं खरं आकर्षण दडलेलं आहे.