संमेलन ! त्याची साताठ धा, पंध्रा कवित्व !

धाडसी भाषन! वा! धाडसी? रटाळ म्हणा म्हनावं. एवढं औघड बोलायचं कामच नव्हतं.
Kavi Sammelan
Kavi Sammelansakal
Updated on

एक

साहित्य संमेलनाला गेलो नाही.

वारी चुकली ! कवितेची वही हरवली.

तर, ह्या नव्या ओळी आहेत.

तुला उगाच पाठवत आहे. तीला कविता म्हणू नकोस. कुणालाही दाखवू नकोस.

काहीच कानोसा नसताना तो गेला

गेला म्हणजे एकदम ठार मेला

वारीतल्या वारकऱ्यानं त्याचा मृत्यू पाह्यला

नदीकाठी देह धुवून तिथं काठावरच जाळला

बॅाडी प्याली राकेल, आगच आग झिंगली

भेलकांडून भडकली

सरसरून पेटत रडली भेकली

तरी कवटी फुटली, तशी माया सुटली

राख उडाली भवती, काळी भरडी

हवा सुगंधी झाली, थोडी कोरडी

राख सारी रानात, मातीच्या मनात

मातीनं कर्ब काळं गिळून घेतलं

सवयीनं आलं दुःखं सहन केलं

फाळासंगे फळवली धग

बीजाठायी रुजवली रग

औंदा पीक जोमात होतं

शिवारात त्याचं सत्त्व उगवलं होतं

शेतकऱ्याची वा वारकऱ्याची

वाटेवरच्या वाटसरूची

कहाणी तीच ती एकसारखी

कळस बघून विठ्ठलाला पारखी

मातीत उगवून मातीत निजली

पुन्हा पुन्हा उगवत राहिली

परंपरा अन रिवाजाची

नित्य वारी घडत राहिली

दोन

धाडसी भाषन! वा! धाडसी? रटाळ म्हणा म्हनावं. एवढं औघड बोलायचं कामच नव्हतं. पॅालिटिकल कार्यक्रमात हे साहित्तीक कशाला घुसू द्यायचे कळत नाई. बरं यांन्ला पन कळायला पायजे की आपन शोभेची भाऊली म्हणून आहे तर बाबा ज्येवढ्याला त्येवढं शिपायचं. आख्ख्या गावात सडा घालायचं काय कारने? मरूंदे ना भाषा! परवा आमच्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला तेवा कुटं होत्या आजी? आमी आरक्षण मागतोय कवा धरनं तेवा काय वाती वळत होत्या का? एवढा मान सन्मान केलाय सरकारनी तर त्यांच्या

फॉरमदे बोलायचं, अपोजला नाय. कॅामन सेन्से. आनि मेन म्हंजे, हाये कोन तुमी? एवढ्या दिवसात कदी कुडं सादी पोश्ट नाय का व्हिडिओ नाय. अचानकच व्हायरल?

तीन

मराटीतून essay कशाला लिहायचा?

Nothing special to write

आनि ते पण मराटीतून लिहायचे.

मराटीचं gathering आसलं तर ल्हान school boys ला कशाला त्रास? Teacher la पन सारकी activity देयची habit आहे. Mom सारकी मागे लागली म्हणून मी तर लिहीतो आहे. Dad पन सारका त्येच्या लहानपणाचे details बोलतो. कशाला? तेव्हा तर commodes पन नव्हते. शीऽऽ! मी तर नायच गेलो असतो grandma च्या गावाला. मला village नाय आवडतं. आता आमच्या स्कूलमदे मराटीचा जास्त mention allowded च नाये. म्हाराषट्रेयन आस्लोतर काय ? मराटीचा keyboard पन केवडा ओघडे. मी कुनाकडून तरी Straight लिहून घेतो.

मराटी कोनपन बोलत नाही. Friends माजे तर हसतात. मग कुनाकडून लिहून घेतो? I don’t know.

चार

माज्या घराले लागूनच वावर आहे. माय मले म्हने बुढीले घेऊन वावरात जाऊन जा. बुढीले चालनं होऊन नै ऱ्हाईलं. तीले धरून गं घेऊन जा. मले आब्यास करायले टाईमच नै भेटून राहिला. बोर्डाच्या परिक्शेला मार्क कमी पलडे तं कॉलेजात काहून घेतील? मले फोन पन सादाच दिउन दिला. एका पन विडीओले डाऊनलोड करायले जागाच नै राहिली. माजी मेमरी पन सगळी फुल होऊन गेली. आता हे संमेलन होऊन राहिलं दिल्लीले तं आमाले काहून तरास दिऊन ऱ्हायल्या बाई? मराठीतून कविता नाहीतं गोस्टं लिहाले सांगून राहिल्या. त्येनं काय होणार आहे? मले कविता पन सुचून नाई राहिली. बुढीले गानं म्हनायला लाऊन ते कविता म्हनून लिहून दिउन देते.

पाच

साईत्य संमेलनात साहेब चमकत होते. रमेश टेलरनी चांगला बंद गळा शिवला च्यायला. दिल्लीला जायलाच पायजेल त्यांनी. बरं झालं त्यांनी दिल्लीत घसट वाडवली. जुनी जोड काय बरूबर न्हवती. नवी युती कशी पावरफुले. त्येंचा फोटो लोकल न्यूज पेपर्ला द्यायला गेलो तर त्यो गैबाना सपकाळ संपादक कसा म्हंतो की “ऱ्हानार का साहेब इथंतरी? नाही त्यांचा इतिहासच तसं सांगतो. हॅहॅहॅ! आणि काय त्यांची भाषा! इतकं शिवराळ बोलू नका म्हणावं. ज्या मुखातनं महाराजांचं नाव घेता त्याच तोंडी अभद्र बोलता?” आताच यान्ला इतिहास आटवतो. इतके दिवस काय झोपले होते का? यांच्या वर्धापनदिनाला जैऱ्हात पायजे होती तवा चाटत आला होता. साहेब म्हन्तात की म्हाराजांला पन आसल्याच गाबड्यांनी त्रास दिला होता. खरा इतिहास घडवायला पायजेले.

या टायमाला शिवजयंती जोरात करनार. साहेब खुश झाले पायजे. डबल डॉल्बी नाय लावली तर नावाचा पक्या नाही.

सरकारमध्ये पन यांचे लोक भरले सगळे. पन सायबांनी मशाल घेऊन जायला पैशे दिले. सतरा पोरं तयार झालीये. गावातून पळत रायगडावर जानार. पोलीस भर्तीची प्रॅक्टिसपन होईल. पोलिसांना मराठी कंपलसरी आहे का? नंतर इंग्रजी नायतर हिंदीच वापरतात. नागपूर, औरंगाबाद - संभाजीनगर, जळगाव कुठे पन पोश्टिंग मिळली तरी हिंदीतच बोलायला लागनार.

पेपरमदे पन नीट न्यूज छापत नाही. नुसत्या बिल्डिंगच्या जाहिराती. पोलिस भर्तीच्या जाहिराती साटी घ्यायचा पेपर. नंतर बंद. ऑनलाईनला न्यूज कळती. बाब्याचं लग्न ठरलं. प्रीवेंडींग शूट करायला येतो का म्हनाला. जाईल भोतेक.

सहा

रानात हुतो ओ मालक! द्राक्षाची तोडनी चालूए. कवा येताव? औंदा पेर करू की. जवारीला रानं तयार केलंय. बैलं दवखान्यात न्यून आन्ली. डाक्टर म्हन्ला कडबा साप करून घाला बैलास्नी. कॅनालला पानी येनार न्हाई म्हनत्यात. हिरीला उमाळा हाय पर पानी पुरायचं न्हाई. गावात पानी न्हाई पेयाला. आपल्या हिरीवं येत्यात समदी. तलाठी भाऊसाहेब म्हनले आपली हीर गावाला प्यायला पानी न्हाई म्हनून सरकार घेनार ताब्यात. रबीला काय गावनार न्हाई आसं वाटतंया. मंग काय करू ? मला लिवता येत नाई म्हनून रेकार्ड करून पाटिवतोय मॅसेज. लवकर या मंग! ठ्यू का?

सात

ते दिवस फारच छान होते. आम्ही उन्हाळ्यात मामाकडे जात असू. आजोळ एका तालुक्याच्या गावी होतं. तिथे सगळी मावस, मामे भावंडं जमत असत. चांगलंचुंगलं खाणं आणि हुंदडणं एवढाच कार्यक्रम असायचा. उन्हाळ्याचा उःशाप असलेला आंबा सारं गोड करी. वाळवणं घालणाऱ्या आजी, मामी, मावशा लाड करत असत. त्यात जोडून एखादं लग्न असलं की मग तर नवे कपडे, जास्तीचा प्रवास असा वाढीव वानवळा मिळत असे.

मी सगळ्यात लहान असल्यानं माझे विशेष लाड होत. मला अजूनही आजोबांनी आठवडी बाजारातून आणलेली ती टपोऱ्या गावरान जांभळांची दुरडी आठवते. जिभेसह कपडे रंगवून ती संपवली होती आम्ही. आता आजोळ राहिलं नाही पण आठवणी ताज्या आहेत. मी हिला म्हटलं परवाच की धाकटी मुलगी एकदा मास्टर्स करायला अमेरिकेला गेली की एक चक्कर मारून येऊ.

बाकी हल्ली सगळंच नवं आणि अनोळखी झालंय. परवा हॉटेलमध्ये ॲस्पारेगस सिझनिंग हवं का म्हणून विचारलं वेटरनं तर मला काही कळेचना. टाक म्हटलं! अन्न हे पूर्णब्रह्म! हा हा हा! मराठी नाटकांनी मात्र जुनं सगळं टिकवून ठेवलं आहे. जुने विषय असल्याने जुने दिवस आठवतात. सगळी आमच्यासारख्या वृद्धांची गर्दी. हमखास फोन वाजतो. हाहाहा!

लवकरच फ्लॅटचं पझेशन मिळणार आहे. रिटायर्ड लोकांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ॲब्युलन्सपासून सगळं आहे. मुलं परतणार नाही असं धरून चालायचं. आयुष्य त्या MIDC त गेलं. आता जरा निवांत जगू. नव्या सोसायटीतल्या लोकांचा what’s up ग्रुप केलाय. दर मंगळवारी त्यावर गाणी म्हणायची असतात. या मंगळवारी ही ‘श्रावणात घननिळा’ म्हणणार आहे. सराव चालू आहे. हाहाहा! साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीत काहीतरी लिहा असे ॲडमिनने सुचवले होते म्हणून हा लेख! हाहाहा! गोड मानून घ्या.

आठ

फ्रेंड्स, मी आज मुद्दाम पोस्ट लिहिते आहे. मागच्या माझ्या पोस्ट ला ट्रोलिंग झालं तरी मी काही बोलनार नव्हते पन मला स्त्रीयांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं आहे. आनि म्हनून मी मुद्दाम महिला आयोगाच्या अद्यक्षांनापन टॅग केलंय. ( साहित्य संमेलनाच्या अद्यक्षपदीपन महिलाच आहेत तर मग हा प्रश्न त्यांना का पडू नये. ) मॅट्रोमदे पन लेडीजची वेगळी रांग पायजे.

कुटे कुटे ती आस्ती पन. पन मेल सगळे मदी घुसतात. आनि दुसरं म्हंजे मॅट्रोतली मराठी ॲलाउन्समेंट नीट नाही झाली आहे. ती दुरुस्त करायला पायजेले. साऊथला सगळे लोकल भाषा वापरतात मग आपन का नाही वापरत? हिंदी येते म्हणून? तुम्हाला जर ही पोस्ट आवडली तर लाईक करा. ट्रोलर्स, आय इग्नोरिंग यू !

नऊ

प्रिय सुरेश,

तुला सांगते, मराठी साहित्य संमेलन हा मोठा विनोद आहे. पुढारी आणि त्यांचे पिट्टू यांच्या मिरवणुका या पलीकडे काही नाही. नवी कविता सापडत नाही आणि आमची कादंबरी कोसला सोडून पुडे पडत नाही. तेच ते राजकारण आणि त्यात ते मीडियावाले. कसलं वाईट मराठी बोलतात राव ते! या वेळी तर निमंत्रणातच घोटाळा केला. तशीही मी तर यंदा जाणारच नव्हते. मागच्या खेपेला काव्यवाचन करायला बोलावलं आणि वेळ पुरला नाही म्हणून आमच्या सारख्या ग्रामीण कवींना नुसता कॅन्टीनच्या कुपनांचा खुराक दिला. ऐकायला एकही माणूस नाही. जे कोण पंचवीस कवी वाचायला आले होते तेच ऐकायला.

ज्याचं त्याचं लक्ष आपला नंबर कधी येतो इकडे. सगळेजण रीलं करायच्याच धडपडीत. मी निघून आले. हे बगलबच्चांना साहित्य अकादमी पुरस्कार देणार आणि आमच्या सारख्या कुनी गॅाडफादर नसलेल्यांना साहित्य परिषदेच्या पुरस्कारात पण डावलणार. का? आम्ही पण ण वापरतो की. पन मी ठरवलंय की यापुढे मी जाणार नाही संमेलनाला. मला माझे फॉलोअर आहेत. त्यांचे लाइक्स पुरस्काराहून मोठे आहेत. संमेलनात वाचायला केलेली कविता इथेच लिहीते.

शाळा सुटली, कॉलेजं सरली

शिक्षण काही भेटलं नाही

पुढाऱ्याच्या शेपटी मधलं

रहस्य काही कळलं नाही

राहिले अडाणी सावित्रीच्या देशी

माझ्या अंगणाच्या वेशीपाशी

माय माझी अडाणी, बाप माझा निबर

मुलीसाठी मुक्ती म्हणजे फक्त तीचं सासर

(ही कविता जर तू पोश्ट करनार असशील तर खाली “कुणाला वापरायची असेल तर कॉमेंटमध्ये लिहून परवानगी घ्यावी,”

अशी ओळ टाक.)

बाकी ठीक.

तुझी,

चंदा

दहा

सगळ्या दोस्तांना माझा जय महाराष्ट्र!

या ठिकानी साहेबांचा वाढदिवस येतो आहे. तर आपन मोट्या प्रमाणात रक्तदान शिबीर ठेवले आहे. तरी सगळ्यांनी रक्तदान करून साहेबांचे हात बळकट करू. शाखाप्रमुख म्हणून मी स्वतः दोन बाटल्या देनार आहे. साहित्य संमेलनाला ज्याप्रमाने आपन रेल्वेतून साहित्तीक नेले होते आनि सुखरूप परत आनले. त्यांना दोन टायमाला जेवन आनि नाष्टा आपन दिल्लीत पन दिला. तीतंल्या आपल्या लोकांनी पन मदत केली.

छोले, आलू चाट, पनीरच्या डीश आशे नॅार्थचे डिश पन दिले. तसेच आपन रक्तदान पन देऊ. आपल्याकडं हायवेमुळं ॲक्शीडेंट वाढलेत आनि त्यामुळे रक्तदानाचे महत्व आहे.

तरी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की जास्तीत जास्त रक्तदान करून आपन हा कार्यक्रम यशस्वीपने घडवून आनू. जय हिंद!

जय महाराष्ट्र!

# blooddonation # मराठीत लिहा

अकरा

अभिजातता म्हणजे काय हो? आणि कशाला हवी ती? शासकीय निधी मिळवायलाच की. भाषा अभिजात आहे की उपयुक्त? समृद्ध आहे की प्रगतिशील याचा विचार वापरकर्त्यानं करावा. शासकीय पातळीवरून कितीही कीर्तनं झाली तरी माणसं व्यावहारिक बोध घेतात. इथल्या लोकांना ज्या भाषेची जेवढी गरज आहे तेवढी ती वापरली जाईल. खरंतर भाषेचे कारखाने कष्टकऱ्यांच्या वस्तीत असतात. निसर्गात राबणाऱ्यांच्या घामाचा सुगंध लेऊन भाषा पदार्थ रांधते, नेसू नेसते आणि पंचमहाभूतांच्या अमर सहिष्णूतेने परभाषीय शब्दही आपल्या बोलीत गुंफते. भाषा समृद्ध करण्यासाठी हा व्यवहार उपयुक्त ठरतो.

इथवर तुमच्या अभिजाततेचे पैसे पोहोचणार आहेत का? भाषेनं माणूस जोडावा. साहित्यातून तो घडावा, मग व्यवहारात तो मूल्यवान दिसावा आणि त्याच्या पिढ्यांनी तो वसा निगुतीनं सांभाळावा. असो. आज आमच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ताराबाई भवाळकरांसारखी अधिकारी व्यक्ती लाभते, सतीश आळेकरांसारख्या श्रेष्ठ प्रयोगशील नाटककारास जनस्थान पुरस्कार मिळतो आणि कोकणात माड उतरवायला हिमालयातून आलेला नेपाळी थापा वा विश्वकर्मा आपल्या कष्टासोबत आमच्या भाषेला चार शब्द देऊन प्रवाही ठेवतो हे सारं सुचिन्हच आहे.

राजकीय रेट्यानं भाषेबद्दल स्वाभिमान वाढेलही. मात्र तो केवळ उत्सवी दिखावा न होता आत्मीय उल्हास ठरावा. मी विद्यापीठीय व्यवहारात हयात घालविली. त्यामुळे वाचन भरपूर झाले. मरहट्टी, मागधी, राक्षसी, पैशाची, शौरसेनी, फारसी, तुर्की, उर्दू, इंग्रजी, संस्कृत आणि अशा अनेक भाषांच्या संकरातून आमची मराठी पालवित होत आली.

सारं सामावून प्रवाही राहणारी, काठांना भरभराट देऊन त्यात न गुंतता अविरत पुढे जाणारी नदीच जणू. तीची अभिजातता कुठल्या शासकीय निर्णयाने का सिद्ध होते? पण हरकत नाही. त्या नामापोटी मिळणाऱ्या निधीतून कदाचित नवं तंत्रज्ञान कवेत घेण्याचा आवाका भाषेला देता येईलही. असो. अहो, गुंडपुंडाची मायंदाळ रेलचेल असलेल्या राजकीय पक्षांनाही साहित्य संमेलनात मिरवून सुसंस्कृततेची झूल पांघरणे महत्त्वाचे वाटते. मराठीचा उसना कैवार घेऊन स्थानिक पुढारी होता येतं.

मराठी बोलून नवं माध्यमात पैसा मिळवता येतो आणि या भाषेच्या सणांनी परदेशी गेलेल्या पाखरांना जोवर इथल्या मातीची सय येते तोवर भाषेला मरण नाही. इथला निसर्ग जर टिकला तर माझी भाषाही निश्चितच टिकेल असा विश्वास मला वाटतो. तेव्हा खरी काळजी इथल्या डोंगर दऱ्यांची, मोकळ्या माळरानांची, नदी नाल्यांची, झाडा पाखरांची, दगडामातीची आणि मातीत राबणाऱ्या माणसाची करायला हवी. असो. मला साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या परिसंवादात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार!

बारा

प्रश्न : रशियन असून तुम्ही अस्खलित मराठी बोलता?

उत्तर : मी वीस वर्षांपूर्वी रशियातून प्रथम भारतात आले. मला मराठीचा अभ्यास करायचा होता. मराठी नाटक पाहिलं होतं मी पण भाषा येत नव्हती. मग आले पुण्यात आणि शिक्षण सुरू झालं.

प्रश्न : आजच्या मराठीच्या अवस्थेबाबत काय वाटतं?

उत्तर : मला अनास्था दिसते. संमेलनाध्यक्षांनी समर्पक मांडणी केली. मी त्यांचं साहित्य वाचलंय. त्यांचं संस्कृती विषयक चिंतन महत्त्वाचं वाटतं. मात्र असंही वाटतं की बहुजनांच्या मुखातून पाझरणारी मराठी या प्रदेशातल्या जगण्याला अर्थ पुरवीत राहील. मराठी शाळा संपत जाणं हे काळजीकारक असलं तरी या भाषेचा इतिहास लक्षात घेता ती नवे तंत्रज्ञान वापरून प्रवाहित राहील अशी आशाही वाटते.

निवेदक : या आणि अशा विविध विषयांवर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. होय, सबस्क्राइबच. आम्ही अट्टाहासाने मराठी बोलत नाही तर सहजतेने आणि आत्मविश्वासाने बोलतो.

तेरा

भवाळकर? सांगलीच्या आहेत का?

चौदा

साहित्य? लई वाचतो! हा! सकाळपासून चालूच होतंना! नुस्ते टुंग टुंग नोटीफिकेशन! लई

ल्हितात लोक. वाचलं नाई की खवळत्यात ! आत्ता ते कसलंतरी भाषण झालं ना? ते पण आलंय. वाचील ते पन सवडीनं.

पंधरा

चॅट जीपीटी ला क्वेरी दे किंवा जेमिनाय ला! रीप्लाय टू द प्रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द मराठी लिटररी समीट! आणि दे डकवून. सगळ्यापेक्षा वेगळं होईल. संपादकांनाच काय कुणालाही कळणार नाही. डोण्ट ओवरथिंक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com