

Indian Theatre Documentary 1988
esakal
प्रभा जोशी - saptrang@esakal.com
भारतीय नाटकांची वैभवशाली परंपरा, त्यातली ठळक प्रादेशिकता याचा रंजक उद्बोधक प्रवास मांडणारा ‘इंडियन थिएटर’ हा लघुपट फिल्म्स डिव्हिजनसाठी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी बनवला. १९८८ मध्ये बनवलेला हा लघुपट केवळ भारतीय नाटकांचा प्रवास नाही तर ते रंगभूमीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या भारतातील अनेक मोठ्या कलाकारांचं फार महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आहे.
उत्क्रांती, परिवर्तन, प्रगती आणि आता तंत्रज्ञानाची घोडदौड अशा टप्प्यांवर प्राचीन कला इतिहासाच्या अनेक खुणा पुसट झाल्या किंवा मिटल्या तरी मानवी इतिहासातील एक आद्यकला अद्याप चैतन्यमय आणि तेजस्वी आहे. ही कला आहे नाटक आणि नाट्यशास्त्र. जगात लिखित साहित्य सर्वदूर पोहोचण्याच्या कितीतरी आधी नाटक हे सादरीकरणाचं, समूह मांडणी करणारं रूप म्हणून मान्य पावलं ते आजतागायत. आपल्याकडची भास आणि कालिदासकालीन नाटक परंपरा हजाराहून अधिक वर्ष जुनी आहे आणि अजूनही ती नाटकं त्याच रूपात सादरही केली जातात. एखाद्या प्राचीन कलेचा वारसा इतका मोठा असेल तर तो तितकाच मौल्यवानही असतो.