

Dulquer Salmaan Netflix Movies
esakal
सुहास किर्लोस्कर
कांथा (कांता) म्हणजे प्रिय स्त्री, जिच्याकडे आकृष्ट होऊन चित्रपटाचा नायक स्वतः बदलतो, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बदल घडवून आणतो, चित्रपटाचा क्लायमॅक्सही बदलण्याची त्याची इच्छा असते. दिग्दर्शकाला कमी लेखून प्रेक्षकांचे म्हणजेच त्याच्या चाहत्यांचे लांगुलचालन करून तो नायक चित्रपटामध्ये वाट्टेल ते बदल करत राहतो...
चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अभिनय करणाऱ्या कलाकाराकडे चित्रपटाचा सीन पटकथा लेखक आणि संवाद लेखक यांच्याकडून लिहून दिला जातो. दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफरबरोबर चर्चा करून त्याच्या व्हिजनप्रमाणे शॉट कसा घ्यायचा, याबद्दल सूचना देतात आणि त्यानुसार त्या कलाकाराने अभिनय करणे अपेक्षित असते. अभिनेता/अभिनेत्री यांनी हालचाली कशा करणे अपेक्षित आहे, अभिनय लाउड असावा की संयत असे अनेक बारकावे दिग्दर्शक विस्ताराने सांगतात. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कप्तान असतो; परंतु भारतासारख्या देशामध्ये चित्रपट अभिनेत्याच्या नावाने ओळखला जातो. चित्रपट आपल्यामुळेच चालतो, असे काही कलाकारांना वाटते; परंतु उत्तम टीमवर्क नसेल किंवा पटकथा बांधीव आणि विषयाशी इमान राखणारी नसेल, दिग्दर्शकाला नेमके व्हिजन नसेल किंवा दिग्दर्शक एकाच सुपरस्टारला महत्त्व देऊन चित्रपट शूट करू लागले तर ते चित्रपट दर्जेदार होत नसतात. काही कलाकारांचे हे भान सुटते आणि ते स्वतःला वलयांकित समजू लागतात. अहंकाराचा स्पर्श झाल्यानंतर भल्याभल्या आत्मकेंद्री कलाकारांचा अस्त झाल्याचे आपण बघतो.