- रणधीर शिंदे, saptrang@esakal.com
कोल्हापूरला विशिष्ट अशी ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. एका बाजूला कर्नाटकची सीमा, तर दुसऱ्या बाजूला कोकणची सीमा. या प्रदेश घडणीमुळे त्यास काही वेगळी परिमाणे लाभली.
कोल्हापूर परिसरात भाषेचे कमालीचे वैविध्य आढळते ते तिच्यातील प्रदेशठेवण, निसर्ग, सीमाप्रदेश व लोकजीवनशैलीमुळे. इथे एक बाब ध्यानात घ्यायला हवी, की बोलीभाषांमधील फरक शास्त्रीय काटेकोरपणे सिद्ध करणे गुंतागुंतीचे आहे. परंतु भाषाभेद वैशिष्ट्यांवरून त्या भाषेचा काही एक वेगळेपणा सिद्ध होतो.
कोल्हापुरी भाषेत रांगडेपणा आणि उधळे-मोकळेपणाचा बाज आहे. वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांहून परस्परभिन्न वाटाव्या अशा बोली छटा तीमध्ये आहेत. कागल-गडहिंग्लज, चंदगड परिसरात कानडी प्रभावाच्या खुणा आहेत, तर राधानगरी, गगनबावडा, चंदगड, आजरा, शाहूवाडी परिसरातील भाषेवर काही बाबतीत कोकणी वळणाच्या भाषेच्या खुणा आहेत.
चंदगड परिसरात कन्नड-कोकणी-मराठी यांच्या एकत्रीकरणातून ‘चंदगडी’ बोली निष्पन्न झाली. जॉर्ज ग्रिअर्सनच्या १९०५ च्या भारतीय भाषा सर्वेक्षणात कोल्हापुरी बोलीभाषेचा इंडो-आर्यन कुळातील भाषा म्हणून निर्देश आहे.
सातवाहन, मौर्य, चालुक्य, कदम्ब, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार ते मुसलमान एवढ्या राजवटींशी या प्रदेशाचा संबंध आला. इनामदार, जहागीरदार, शेतकरी, कुणबी, अलुतेदार, बलुतेदार व डोंगराळ प्रदेशातील लोकसमूह इथे होता आणि आहे.
जीवनाची पुरेपूर शाश्वती, निसर्ग, सहकार, जलसंधारणाचा प्रसार आणि शेतीजीवनाच्या सुस्थितीमुळे या भाषेवर भरड आणि संथपणाचा ठसा उमटला. उच्चार-लकब-हेलकावे, ध्वनी व व्याकरण स्तरावर या भाषेवर इथल्या प्रदेशजीवनाचा प्रभाव आहे.
कोल्हापूरच्या भाषेवर संस्थानी राजवटीच्या खुणा आहेत. जुनी कागदपत्रे, वाङ्मयात तसेच व्यक्तींच्या बोलण्यात संस्थानी शब्द आढळतात. दसरा महोत्सवासारख्या उत्सवांत या ऐतिहासिक वारशाचे व भाषेचे स्मरण पहायला मिळते.
संस्थानी भाषा म्हणून सरदार, इनामदारांच्या भाषेत हा आदब आजही आहे. महसूल, प्रशासनभाषेत त्याच्या खुणा आहेत. पागा, अमलदार, नाईक, साठमारी असे शब्दभांडार या भाषेत आहे.
पां. चि. पाटील यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जुन्या काळातील टपाल व्यवस्थेचा ‘घुंगूरडाक’ व ‘टपाल टांगे’ असा उल्लेख केला आहे. कॅ. मेजर ग्रॅहमने १९५४ मधील संस्थानच्या सांख्यिकी अहवालात कोल्हापूर संस्थानात मराठीसह बोलल्या जाणाऱ्या भाषांचा उल्लेख केला आहे.
बनिया आणि व्यापाऱ्यांमध्ये गुजराती-मारवाडी भाषा बोलल्या जात होत्या. विद्वान पंडित व मौलवींना अनुक्रमे संस्कृत आणि फारसीचे ज्ञान होते. शिकारी वर्गाची भाषा होती. व्यापारी, कलावंतांच्या विशिष्ट शब्दसंग्रहाला ‘नंद भाषा’ म्हणत असा त्यांनी उल्लेख केला आहे.
कोल्हापूरच्या भाषेचे एक वेगळेपण म्हणजे इथल्या शेतीसंस्कृतीतून उगवलेली भाषा. ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. डोंगर उतरणीची शेती आणि भातशेती या शेतीजीवनाचे भान देणारा शब्दसंग्रह या भाषेत आहे. ‘इरलं’, ‘टोकण’ (खुरप्याने धान्याची पेरणी), ‘तरवा’ (भातलागवडीसाठीची रोपे जमीन भाजून तयार करणे), ‘बेजमी’ (तयारी), ‘हुरदं’ (हुंदका), ‘झोमडं’ (भांडण), ‘झडगं’ (धान्याचे दाणे शेतातच पडून उगवलेले), ‘पिंजराची व्हळी’ (भाकपीत काढल्यावर उरलेला गवतसदृश चारा), ‘गुत्तड’ इत्यादी शब्द त्याची साक्ष पटवतात.
अतिपर्जन्यवृष्टीच्या चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी या प्रदेशातील भाषेत पाऊसरूपांसाठी विविध शब्द वापरले जातात. ग्रामीण भागात जमिनीला प्रादेशिक नावे आहेत. ‘तांबर’, ‘दंडग्या’, ‘माणकांड’, ‘आवळा’, ‘नारगुंडीचा माळ’, ‘बामणकी’, ‘तिकटी’ किंवा ‘तिठ्ठा’ (तीन रस्ते जिथे मिळतात), ‘ढव्ह’ (डोह), असे स्थलविशिष्ट शब्द या परिसरात आहेत.
सामाजिक परिस्थितीतून काही क्षेत्रविशिष्ट शब्द निर्माण झाले आहेत, ते सार्वत्रिक अंगवळणी पडले आहेत. ‘वडाप’ हा नवा शब्द इथे तयार झाला. तो इथल्या रिक्षासंस्कृतीने व वृत्तपत्रसृष्टीने घडवला आहे. अवैध प्रवास वाहतुकीसाठी हा शब्द वापरला जातो.
झाडूसाठी ‘साळोता’, नळासाठी ‘चावी’, दळणासाठी ‘दळाप’, वाजंत्रीसाठी ‘वाजाप’, गोवऱ्यांसाठी ‘शेणी’, ‘बैते’ असे प्रदेशविशिष्ट शब्द या परिसरात आढळतात. ‘बाजार’चे ‘बज्यार’, ‘पोहे’चे ‘फव्हं’, ‘प्रपंच’चे ‘परपंज्या’, ‘आयुष्य’चे ‘आयुक्षा’, ‘संकट’चे ‘संकष्ट’ झाले. ‘नदार’ (नजर), ‘किच्ची’ (कितीतरी), ‘भगटायच्या आगोदर’ (उजाडण्याच्या अगोदर), ‘व्हळी’ (जनावरांचा चारा नीटनेटका रहावा यासाठी केलेली रचना), ‘मोगा’ (पाण्याचा माठ), ‘सपार’ (छप्पर), ‘दिवसाला गोंडा फुटला’, ‘डोळं तांबरल्यागत’, ‘पावसाची चिपळी’, ‘फेसाटीला आणलं’, ‘मधघर’ (घराची मधली खोली) असे खास प्रादेशिक शब्द या भाषेत आहेत.
‘बकऱ्यां’ना ‘पालवं’, तर ‘मेंढी’स ‘बकरं’ म्हणतात. ‘वयलं अंग’ (वरील), ‘हाळी’ (हाक), ‘किनिट’ (संध्याकाळ), ‘रैत’ (रयत), ‘कौलं शाकारणं’, जत्रांना ‘माही’, तर जोतिबा दर्शनास ‘खेटं घालणं’, असे परिसरातील काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द.
गुऱ्हाळ संस्कृतीचीही एक भाषा व्यवस्था या परिसरात आहे. ‘गुळव्या’, ‘घाणा’, ‘चिप्पाड’, ‘रहाट’, ‘वाफा’, ‘काटेभेंडी’सारखे शब्द त्यामध्ये आहेत. अलंकार-दागिन्यांची प्रदेशविशिष्ट वेगळी नावे आहेत. ‘एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज, कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसून, सोन्याचा साज तुम्ही घडवा,’ अशा गाण्यांत कोल्हापुरी साज भेटतो.
‘चंद्र कोल्हापुरी साज’, ‘कमळ कोल्हापुरी साज’, ‘मासा कोल्हापुरी साज’, ‘नाग कोल्हापुरी साज’, ‘भुंगा कोल्हापुरी साज’ अशी कोल्हापुरी साजाची भाषा आहे. मर्दानी खेळ- तालमीची (कुस्ती) भाषा जशी वेगळी आहे, तसाच इथल्या लोकवाद्यांचा शब्दसंग्रहसुद्धा वेगळा आहे.
‘कोण गा तू? हाकडं कधी आलास गा?’ यात जसा ‘गा’चा वापर आहे, तसाच नामरूपात अनेकदा शब्दाच्या अंती ‘दा’ लावला जातो. प्रेमाचे द्योतक म्हणून! ‘शामादा’, ‘रामूदा’, ‘संदीपदा’, ‘जानूदा’ असे शब्द कानावर नेहमी पडतात. चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ या तालुका परिसरानजिक कानडी मुलूख आहे.
त्यामुळे तिथल्या भाषेवर कानडी भाषासान्निध्याचा परिणाम झाला. व्यक्तिनामे, ग्रामनामे व शब्दांच्या बाबतीत कानडी भाषेचा परिणाम आहे. ‘साहेबरी’, ‘बनाक्का’, ‘बिद्री’, ‘गडहिंग्लज’ व इतरही अनेक नामे कन्नड भाषा सहवासाची द्योतक आहेत. बोली भाषेत जुन्या मराठीत गडहिंग्लजचा उच्चार ‘इंग्लज’ असा आहे.
कोल्हापूर मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी वेगळे शब्द वापरले जातात. ‘खुळा रस्सा’, ‘रक्ती मुंडी’, ‘कुंभारी रक्ती’, ‘गुच्चीवडा’ (बटाटेवड्याचे नाव), ‘खांडोळी’, ‘संगीत चिवडा’ अशी पदार्थांची नावे इथे ऐकायला मिळतात.
महादेव मोरे यांच्या ‘रैत’मधली ही वाक्यं पहा- ‘जेवणाच्या टिपणाला मळ्यास्नं वाड्यावर आलो. संगट आणल्याची दुधाची चरवी जेवनाघरच्या उंबऱ्यावर ठिवली. मग परड्या आंगाला गेलो. तितं हौदे. जवळच तप्यालं. त्येनं पाणी घेटलं. खळाळा हात-पाय-त्वाँड धुतलं. पटक्याच्या शेवानं ते पुसत आत आलो.’
आता कृष्णात खोत यांच्या ‘गावठाण’ कादंबरीतली पन्हाळा परिसरातील बोली पहा- ‘तांबूजाईला वारूळ दिला तवा कुटं ढोरांच्या अंगावरल्या तांबवा गेल्याता, न्हाईतर सारी ढोरं तांबवांनी लच्चाडली होती. दिवसच्या दीस कावळं म्हसरांच्या अंगावर, कोंबडी दाणं येचत्यात तसं तांबवा येचीत हुती.’ अशी प्रादेशिक बोलीची वेगळीच लय या परिसरातील भाषेत आहे. अनेक लेखकांनी ती आपल्या साहित्यात उतरवली आहे.
कोल्हापुरी बोलीभाषेतील तरुणांच्या आणि स्त्रियांच्या भाषेबद्दल पुढील लेखात आणखी जाणून घेऊ...(क्रमश:)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.