राज्यातला सर्वांत मोठा शिलालेख

जुन्नर तालुका ऐतिहासिकदृष्ट्या खूपच संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भागातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
largest inscription
largest inscriptionsakal

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

जुन्नर तालुका ऐतिहासिकदृष्ट्या खूपच संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भागातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं जुन्नर भागाविषयी देशात, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना बालपणापासून आकर्षण असतं. याशिवाय, जुन्नर भाग अडीच-तीन हजार वर्षांपासून कायम सत्तेच्या केंद्रभागी राहिलेला आहे. सातवाहनाचा उत्कर्षाचा काळ, त्यांचं वैभव आणि अफाट पसरलेले साम्राज्य या भागानं बघितलेलं आहे.

एवढंच नाही, तर संपूर्ण भारतात आढळणाऱ्या लेणींपैकी २०० ते २५० लेणी फक्त जुन्नर परिसरात अस्तित्वात आहेत. त्यामध्ये लेण्याद्री आहे, शिवनेरीच्या साखळी मार्गावर कोरलेली काही लेणी आहेत, अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणीसमूह आहे, तुळजा सारखे दुर्मीळ चैत्यगृह असलेली लेणी आहेत. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, अशी कितीतरी नावे सांगता येतील.

जुन्नरपासून थोड्या अंतरावर नाणेघाटची लेणी खोदण्यात आली. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्यापार करण्यासाठी नाणेघाट येथे हा मार्ग ‘खोदून’ तयार करण्यात आला. त्या काळातील राष्ट्रीय महामार्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पतीच्या निधनानंतर सक्षमपणानं राज्य चालवणाऱ्या सातवाहन सम्राज्ञी नागणिकाचं कर्तृत्व नाणेघाट येथील गुहेत कोरलेल्या शिलालेखातून आपल्याला समजतं. एवढंच नव्हे, तर सातवाहन राजा-राणी, युवराज यांचे पुतळेही या लेणीत कोरले होते, अगदी त्यांच्या नावासकट. आज मात्र त्यांच्या पायांचा काही भागच आपल्याला दिसतो.

या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.

पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.

पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.

हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.

सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.

महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.

एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.

अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.

डेक्कन कॉलेजमध्ये माझे मास्टर्स सुरू असताना डॉ. दांडेकर सरांनी आम्हाला इथे ब्राह्मी लिपीविषयी महत्त्वाची माहिती सांगत वाचण्यासाठी मार्गदर्शन केले होते. आम्ही इथंच ब्राह्मी खऱ्या अर्थानं शिकलो. या लेणीच्या समोरून जो मार्ग जातो, त्यावर एक दगडी रांजण ठेवलेलं आहे. हा व्यापारी मार्ग असल्यामुळं या भल्यामोठ्या दगडी रांजणात जकातीची नाणी जमा करण्यात येत असत असं सांगण्यात येतं. पण त्याला कसलाही पुरावा नाहीये.

नाणेघाट समृद्ध आहे. पावसाळ्यात स्वर्गासम भासणारा हा भाग आहे. जवळच चावंड, जीवधन, निमगिरी हे किल्ले तर कुकडेश्वरसारखं अतिसुंदर मंदिर आहे. हा संपूर्ण भाग पाहायला निदान दोन दिवस तरी हवेत.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com