‘गुळपट्टी’ सातासमुद्रापार!

गावात ऊस पिकत नाही अन् भुईमुगांचे पीकही नाही. पण इथल्या गुळपट्टीमध्ये लघु व्यावसायिकांच्या श्रमाचा गंध मिसळतो अन् तिचा गोडवा अधिकच वाढतो.
Jaggery Spanning
Jaggery Spanningsakal
Updated on

ही कहाणी आहे, गांधीग्रामच्या गुळपट्टीची. एका साध्या गोड पदार्थाची, ज्याने केवळ स्वादाने नव्हे, तर इतिहास, संस्कृती आणि परिश्रम यांच्या अनमोल संगमाने आपले खास स्थान निर्माण केले आहे. आता या गुळपट्टीचा प्रवास केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचला असून त्याच्या गोडव्याने देशी नव्हे तर परदेशी नागरिकांनाही भुरळ घातली आहे.

गावात ऊस पिकत नाही अन् भुईमुगांचे पीकही नाही. पण इथल्या गुळपट्टीमध्ये लघु व्यावसायिकांच्या श्रमाचा गंध मिसळतो अन् तिचा गोडवा अधिकच वाढतो. इथल्या मातीमध्ये गोडवा रुजलेला आहे आणि जिथे प्रत्येक घरात, अंगणात गुळाची चवदार पट्टी साकारली जाते.

हे गाव केवळ एका गोड पदार्थाच्या निर्मितीचे केंद्र नाही, तर त्या माध्यमातून शेतकरी, कारागीर आणि उद्योजकांच्या मेहनतीची साक्ष देणारे एक जीवनदायी स्थान बनले आहे. गांधीग्रामचे मूळ नाव वाघोली. हे गाव अकोला शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील, पूर्णेच्या काठी वसलेले जिल्ह्यातील आदर्श गाव.

या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. महात्मा गांधी यांच्या अस्थींचे विसर्जन पूर्णेत करावे, असा मनोदय मध्य प्रांत वऱ्हाड मंत्रिमंडळातील काँग्रेसचे तत्कालीन मंत्री ब्रिजलालजी बियाणी यांनी व्यक्त केला. गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन पूर्णा नदीत या ठिकाणी करण्यात आले. तेव्हापासून गावाला गांधीग्राम नाव पडले. तसा गांधीग्रामचा मूळ व्यवसाय शेती.

मात्र आज इथला प्रमुख व्यवसाय गुळपट्टी बनला आहे. गरम गरम गुळाच्या रसातून उगम पावणारी ही गोडसर पट्टी, वर्षानुवर्षे ग्रामीण भारताच्या सांस्कृतिक खाद्यपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. याच गोडव्याच्या जोरावर गांधीग्रामने स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.

गांधीग्राममध्ये गुळपट्टी बनवण्याची परंपरा ही अगदी ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. त्या काळात ऊस उत्पादकांनी आपले शेतमाल अधिक टिकाऊ आणि विक्रीस सोईस्कर करण्यासाठी गूळ आणि गुळापासून गोड पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. हा उपक्रम सुरुवातीला छोट्या प्रमाणावर सुरू झाला.

घरगुती स्वरूपात बनणारी गुळपट्टी हळूहळू संपूर्ण गावाचा एक प्रमुख उद्योग बनली. गांधीग्रामच्या गुळपट्टीला मध्य भारतात वेगळे स्थान आहे. एकेकाळी ही केवळ स्थानिक बाजारात मर्यादित असलेली चव आता महाराष्ट्राच्या पलीकडेही जगभरात प्रसिद्ध झाली आहे. तिच्या गोडसर चवीमुळे आणि शुद्धतेमुळे ती घराघरांत पोहोचली.

या गोड पदार्थाची खासियत म्हणजे त्याचे सात्त्विक आणि नैसर्गिक स्वरूप. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या गुळपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक मिश्रणे नसतात. गूळ मोठ्या कढईत उकळला जातो. त्यातील अशुद्धी दूर करून त्याचे रूपांतर सुंदर, सुवासिक आणि पौष्टिक गुळपट्टीत केले जाते. गुळाच्या चवीत साखरेचा सरळ गोडवा नसतो.

त्याऐवजी, त्यात प्रकृतीला पोषक अशी गोडसर चव असते, जी पचनास हलकी आणि शरीरासाठी लाभदायक असते. गुळात लोह, कॅल्शिअम आणि आवश्यक खनिजे असतात, त्यामुळे गुळपट्टी हे केवळ स्वादिष्ट नव्हे, तर आरोग्यासाठीही उत्तम खाद्यपदार्थ ठरते. गांधीग्राम आणि गुळपट्टी ही केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नाही, तर परिश्रम, परंपरा आणि स्वावलंबन यांचे प्रतीक आहे.

कधीकाळी शेतीप्रधान असलेले गांधीग्राम आता गुळपट्टीच्या व्यवसायामुळे आर्थिक समृद्धीच्या मार्गावर आहे. गावातील अनेक कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत. शेतीसोबतच आता हा गोड पदार्थ गावातील प्रमुख उद्योग झाला आहे. त्यांना बाजारपेठ मिळाली आहे, त्यांचे उत्पन्न वाढले आहे.

या गावाने आपल्या मेहनतीने आणि गोडव्याने एक आगळेवेगळे स्थान मिळवले आहे. गांधीग्रामच्या गुळपट्टीने हे गाव खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक बनले आहे. शुद्धता, पारंपरिकता आणि मेहनतीच्या या गोड कहाणीचे कितीही कौतुक केले, तरी ते कमीच आहे!

‘गांधीग्राम’ आणि स्वावलंबन

गांधीग्राम हे गाव फक्त गोडवा निर्माण करीत नाही, तर स्वावलंबनाचा आदर्शही मांडते. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन, येथील ग्रामस्थांनी स्वयंपूर्ण जीवनशैली अवलंबली आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता, त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून गावाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. गुळपट्टीचा व्यवसाय हा ग्रामीण उद्योजकतेचा एक आदर्श नमुना आहे.

येथे तयार होणारी गुळपट्टी आता स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होत आहे. आज गांधीग्राममध्ये तयार होणारी गुळपट्टी स्थानिक ब्रँड बनली आहे. गावात येणारे पर्यटक गुळपट्टी खरेदी करताना दिसतात. तिची निर्मिती प्रक्रिया अनुभवतात आणि या गावाच्या विशेषतेची चव चाखतात. ही गुळपट्टी आता देशभरातील बाजारपेठेत पोहोचली असून, तिची मागणी सातत्याने वाढत आहे.

गुळपट्टीचे विविध प्रकार

काजूपट्टी, बदामपट्टी, तीळपट्टी, खोबरापट्टी, टरबूज बी पट्टी, जवसपट्टी, काळेतीळपट्टी, राजगिरापट्टी, फुटाणापट्टी, साखरपट्टी, मुरमुरापट्टी, मखानापट्टी, गंगाफळ बी पट्टी, सूर्यफूल बी पट्टी, तीळ-शेंगदाणापट्टी, मुखवासपट्टी, खजूरपट्टी. गुळपट्टीचे हे विविध प्रकार शंभर रुपये किलोपासून ते एक हजार रुपये किलोपर्यंत विकले जातात.

गुळपट्टीचा उद्योग हा आमचा मूळ व्यवसाय बनला आहे. गावातील प्रत्येक घराघरात गुळपट्टी तयार केली जाते. आमची गुळपट्टी ही अमेरिका, चीन, दुबईलासुद्धा पाठवली जाते.

- सुखदेवराव अढावू, संचालक, राजलक्ष्मी गुळपट्टी उद्योग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com