
डॉ. सदानंद देशमुख
saptrang@esakal.com
पावसाळ्याचे आगमन म्हणजे सृष्टीचैतन्याचा गाभुळगाभा उजळून काढणारा नवसर्जनाचा काळ! पाऊस पडू लागला की, शेतरानातली माती काही फुलारून नवतीचं रूप घेते. झाडानांच फक्त नवती येत नाही, तर मातीलासुद्धा नवती फुटण्याचा अलौकिक साक्षात्कार होतो. काळजीपूर्वक पाहा किंवा नका पाहू या दिवसात शेतरानात नांगरून-वखरून टाकलेली माती एखाद्या शृंगारसज्ज नृत्यांगनेसारखी चारीमेरा चैतन्यकळेने ओथंबून कशी उतावीळ, मोहतुंबी होते. इतक्यांदी घराच्या किवा पाराच्या ओट्यावर भर दुपारी गप्पा मारत बसलेली बायका-माणसं आता काळ-वेळ विसरून शेत- शिवारातल्या मातीशी रममाण होतात. श्रमांतून सुख भोगताना तनामनाने अंगोपांगी फुलारून येतात.