आंबा पिकतो, रस गळतो...

आम्रफळाची गोडी पूर्वीइतकीच मस्त आहे! कृत्रिम पद्धतीने पिकवलेले ‘अशुद्ध’ आंबे आम्ही चाखतच नाही.
Mango
Mangosakal
Updated on

आम्रफळाची गोडी पूर्वीइतकीच मस्त आहे! कृत्रिम पद्धतीने पिकवलेले ‘अशुद्ध’ आंबे आम्ही चाखतच नाही. आमराई आहे म्हणजे आम्रपक्षी हळद्याच भेटेल असं नाही. माझ्या पुतणीचं नाव त्या पाखराला कुणी दिलं असेल? ‘कांचन!’ छान, रसाळ ललित लेखन आता जवळजवळ हद्दपार झालेलं आहे. माहितीमध्ये लालित्य ते काय असणार? मग मला आठवण येते ती शैलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या रवींद्र पिंगेंच्या बहारदार ललितलेखनाची.

‘बाकी सगळी श्रीरामकृपा’ असा पत्राचा शेवट करणाऱ्या त्यांच्या पोस्टकार्डाची. ‘रे, माधवा, चल ‘दूरदर्शन’वर जाऊ. ‘बुक न्यूज’चा कार्यक्रम आहे. तू, मी आणि पत्रकार श्रीराम, आपण करू... अशी त्यांची अचानक साद यायची. मुंबईत आम्ही कोकणच्या रानमेव्याचा गोडवा जपला होता. मी कसलंच कर्मकांड कधी करत नाही, पण पिंगे वडीलधारे असून त्याबद्दल मला रागाने थेंबबरसुद्धा कधी त्याबद्दल बोलले नाहीत.

कवी मनोहर तोडणकर तुम्हाला ठाऊक नसतील. दाभोळचे हायकूकार. परिस्थितीशी झुंज देत दीर्घ काळ दाभोळमध्येच राहिले. गाववाडीशी त्यांनी छान जुळवून घेतलं; पण ओठांवर मुंबईकर साहित्यिकांचे किस्से आणि आठवणी असायच्या. जयवंत दळवींपासून शिरीष पैंपर्यंत आणि माधवराव गडकरींपासून साने गुरूजींपर्यंत अनेकानेक साहित्य-सिताऱ्यांबद्दल ते अंतरीच्या उमाळ्याने बोलत राहायचे.

‘हायकूकार’ म्हणून मुंबईच्या कवी मंडळींना ते ठाऊक होतेच. ‘तोडणकर तुम्ही काही सामान्य दर्जाचे हायकूही तुमच्या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेत. माझ्याकडे का दिलं नाही संपादन? असं मी म्हटलं की, तोडणकर लहान मुलाप्रमाणे खट्टू व्हायचे. मग मी चतुराईने त्यांना त्यांच्याच बऱ्या हायकूंची आठवण करून द्यायचो. मग कुठे कवीची कळी खुलायची!

‘माणसांची गर्दी

रेल्वे फलाटावर

गाडी निघून गेल्यावर...’

‘कशाला ही उशी

फुलांनी विणलीस?

स्वप्नांना जाग आणलीस’

‘आता झाडाला राहिले नाही भान

गवताच्या इवल्या पात्यांनी

हिरवे केले रान’

‘खूप खूप दमलो चालता चालता

जिथं थांबलो तिथं

झरा होता खळखळता...’

असे तोडणकरांचे कितीतरी हायकू ते या नश्वर जगातून गेल्यानंतर मला कातरवेळी आठवत राहतात. क्षीण स्वराची, कायम दुय्यम ठरलेली रत्नागिरी आकाशवाणी आमच्यापासून सर्वार्थाने कायम दूर राहिली; पण त्यांनीही काही उत्तमोत्तम प्रसरणं केल्याचं मी कार्यक्रम न ऐकताही ऐकून आहे! अर्थात, आम्ही ऐकत आलो, पुणे आकाशवाणी! ‘ऑल इंडिया रेडिओ’ने मनावर राज्य केलं.

त्या काळात ‘गृहिणी’ कार्यक्रमात ‘वहिनी’ बोलू लागली की, कोकणातली बाय तिच्या मैत्रिणीला लगेच म्हणायची, ‘हा ज्योत्स्नाबाई देवधरांचा आवाज बरं...!’ मला मात्र शौक होता - ‘रत्नमाला’ या जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमाचा. त्यात ‘अंगणात खेळे राजा’ किंवा ‘गमाडी गंमत जमाडी जंमत’सारख्या माझ्या आईने रचलेली आशा गवाणकर हे नाव ‘रेकॉर्ड’वर आणणारी गाणी ही हमखास वाजायची.

त्यामुळे तो कार्यक्रम अधिक आपलासा वाटायचा आणि माझ्या कोकणप्रेमी आईची कायमची दूर निघून गेलेली सावलीही ऊन नसताना दिसायची! मी कोकणात कायमचा राहायला आलो तेव्हा दोन-तीन, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या बाया मला सांगू लागल्या, ‘‘खूप जुन्या काळात तुझ्या आईच्या ‘भारतकन्या’ संगितिकेत आम्ही पोरी छान नाचलो होतो बरं! दापोलीतही झाला होता प्रयोग! जुनं ते सोनं त्यांना आठवत होतं.

‘तू मुलांसाठी आणि फक्त मुलांसाठीच लिहीत जा’ हे खुद्द सानेगुरुजी गोरेगावला मृणाल गोरेंच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी आईला प्रेमाने सांगितलं होतं. तो जुना, ध्येयवादी काळच आता गेला. कोण कुणाचं ऐकतंय? अनेक अनुभवी माणसं गप्प गप्प आहेत!

सदानंद बाकरे नावाचे युरोपात आर्टिस्ट म्हणून गाजलेले चित्रकार, शिल्पकार मुरुडला दापोलीजवळ एकले राहायचे. मी ‘सकाळ’साठी त्यांच्यावर लेख लिहायचा म्हणून त्यांची मुलाखत घ्यायला मुंबईतून थेट या रत्नभूमीवर आलो. बाकरे इंग्रजीत बोलायचे, पण अचानक मला म्हणाले, ‘गवाणकर, मला असं का वाटतं, की एक पांढरा नाग मला डसेल आणि मला मरण येईल’ आपल्या मृत्यूच्या वेळी आपलं असं कुणी जवळ नसेल असं त्या कलंदर कलाकाराला वाटलं असेल का?

मी खरं तर पत्रकारितेतला ‘पाहुणा’ पण त्यांना दिलासा देत म्हटलं, ‘‘दादा असं काही होणार नाही. पांढऱ्या रंगाचा नाग असतोच कुठे? ‘गवाणकर, अहो हल्ली माणसं सापापेक्षा विषारी झाली आहेत...’ हे मात्र आर्टिस्ट बाकरे खरं बोलले. माणूसजात फार झपाट्याने बदलली.

झाडं बिचारी किंचाळू शकत नाहीत आणि सापही जोरात आक्रोश करत नाहीत. सापांच्या हत्या व वृक्षांची कत्तल मोजता येईल का? सापाला ठेचण्यासाठी आरडा-ओरडा करून चार माणसं बोलावणं हे अगदी कॉमन! मात्र, रत्नागिरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सर्पाबद्दल सचित्र, रंगीत पुस्तकं लिहिलंय याशिवाय अगणित सापांना जीवदान दिलंय. हे वास्तव दिलासा देणारं नाही का? नक्कीच आहे!

चिपळूणचे भाऊ काटदरे व त्यांचे असंख्य सहकारी यांनी निसर्गमित्र म्हणून केलेली जागृती आणि केलेल्या क्रियाशील उपक्रमांचं आयोजन- नियोजन नक्कीच कौतुकास्पद आहे! मुंबईकर वक्ते, कलाकार, प्राध्यापक यांचे कोकणातले दौरे, कार्यक्रम, भाषणं, शिबिरं ही आम्हा कोकण्यांना मेजवानीच असते.

दर सुट्टीत कोकणातल्या मुलांसाठी अभिनय, एकपात्री नाट्यछटा अशा मार्गाने नाट्यशिबिरं घेणारे - प्रवीणकुमार भारदे हे युवक कलाकार, तर मला अशी धडपड पुण्यात करणाऱ्या प्रकाश पारखींची आठवण करून देतात! जाहिराती, चित्रपट अशा क्षेत्रात कार्यरत असलेले यशोधन बाळ, तर करजगावमधून मुंबईला ‘शूट’साठी जायचे.

जग कितीही बदललं तरी हापूस तो हापूस आहे! मनात व कलानिर्मितीत सरसता जपणारी समरस माणसंही गोडच! मला मधुमेह नाही. त्यामुळे जरा अधिक गोडधोड लिहून होतं! भावलं तर कळवा बरं भाऊ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com