काळ तसा फार जुना नाहीय. कारण काही प्रसंग काळजातून इतक्या सहजासहजी नाही पुसता येत. जरी आता पायात तीन हजार रुपयांचे ब्रँडेड शूज आले, तरी पायाला वडाची पानं बांधून उन्हातान्हात चालल्याची नव्वदच्या दशकातली आठवण कायम सतावत राहतेच.
मी बाहेरचं जास्त खात नाही, तरीही गरज पडेल तेव्हा हॉटेलमध्ये मेनू कार्ड वाचताना लहानपणी गावात खाल्लेली लापशी अजूनही जिभेच्या ध्यानातून जातच नाही. गावातल्या अशा अनेक आठवणी भुंग्यासारख्या कायमच काळजात गुणगुण करत राहतात. त्यापैकीच एक महत्वाची आठवण म्हणजे गावाकडच्या दशक्रियेची.
पहिली दुसरीला असताना मी सारखं आईला विचारायचो की, ‘आयावडे, दर महिन्याला मानसं का बरं मरत नसतील गं?’ आई म्हणायची, ‘ते काय आपल्या हातात असतंय का रं बाळा?’ मी थोडा नाराज व्हायचो. माझं असं विचारण्यामागचं कारणही तिला माहिती असायचं. गरिबीमुळे घरात साखर फार अभावानेच यायची. त्यामुळे गोडधोड फार कमी मिळायचं.
घरात गोडधोड न मिळणारी माझ्यासारखी अनेक पोरं गावात होती अन् त्यांना पोटभर गोड मिळ्ण्याचं कारण म्हणजे कुणी तरी माणूस मेल्यानंतर गावात होणारे दशक्रिया विधी किंवा लग्न. त्यात सर्वात महत्त्वाची असायची दशक्रिया म्हणजेच दहावा. तसं पाहिलं तर लग्नातही गोडधोड मिळायचं, पण लग्नाचा सीजन हा फक्त उन्हाळ्यातच असायचा.
आतासारखी वर्षभर कधीही आणि कुठल्याही वेळी लग्न होत नसत. मग त्या तुलनेत माणसं मात्र वर्षभर कुठल्या ना कुठल्या महिन्यात मरतच असायची. त्यामुळे दहावा आम्हाला महत्त्वाचा वाटे. अगदी आवडत असे. काही जण म्हणतील की, माणूस मेल्यावर होणारा दहावा ह्या माणसाला आवडत होता म्हणजे हा किती स्वार्थी असेल? हो! लहानपणी होतो स्वार्थी!
कारण निरागस भुकेचा आणि पोटाला कधी तरी गोड खायला मिळावं या भावनेपुढे आम्हाला कुणाच्या मरण्याचं दु:ख काहीच कळत नव्हतं. त्यात मी एकटाच होतो असं नाही. माझ्यासोबत कावरी, संप्या, मीरा, लक्ष्या, गण्या, अश्क्या अशी लई पोरं होती.
त्या काळात आम्ही सगळीकडे फार बारीक लक्ष ठेवून असायचो! एखाद्या घराकडं माणसांची जास्त वर्दळ वाढली की, समजायचं तिथला म्हातारा किंवा म्हातारी आता जास्त दिवस जगणार नाही. त्यातही एखाद्या रात्री डॉक्टरची फटफटी आली की, समजायचं तिथली म्हातारी व्यक्ती ‘शिपंवर’ आलीय.
शिपंवर म्हणजेच पूर्वी गावाकडे चमचे नसायचे त्या ऐवजी शंख-शिंपल्यातली जी शिप असायची ना त्याने त्या वृद्ध व्यक्तीला हळहळू पाणी पाजलं जायचं. मग आम्ही पोरं अंदाज लावायचो. मोठाली माणसं पारावर टापा झोडीत बसली की, त्यांचं ऐकून ती व्यक्ती मरण्याचे आडाखे बांधायचो.
‘समजा आज मेलं, तर किती तारखेला दहावा येईल, उद्या मेला तर किती तारखेला दहावा येईल?’ असं बोटावर मोजून किंवा किराणा मालाच्या दुकानात जाऊन कालनिर्णय पाहून तारखेचा अंदाज घ्यायचो. त्याच गोड विचारात झोपी जायचो. कधी कधी त्या व्यक्तीचा दहावा जवळ आलाय अन् आम्ही पोरं लापशी अन् आमटी खातोय असं गोड स्वप्नही पडायचं.
एकदा गावात एक जख्ख म्हातारं अगदी दोनच दिवसात मरणारंच अशी आवई उठली. सुतारानंही सरपणाची तयारी केली. त्या म्हाताऱ्याच्या पोरीसोरी उशापायथ्याशी बसून राहिल्या. मुंबईवाली माणसंही रातराणीनं गावी आली. जी आधीच आली होती ती माणसंही अंत्यविधी करूनच जाऊया म्हणून गावीच खोळंबली, पण ते म्हातारं मात्र लवकर मरेच ना?
अगदी दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, चार दिवस झाले, एवढंच काय भेटून गेलेले पाहुणे पुन्हा येऊन भेटून गेले तरी ते म्हातारे मरेना! सगळे कंटाळून गेले. सगळी माणसं आपापल्या गावाला पुन्हा निघून गेली तरी ते म्हातारे ‘वर’ जायचे काही नाव घेईना. आम्ही तर वाट पाहून एवढं वैतागलो की, विचारू नका. त्यानंतर ते म्हातारं सहा महिने जगलं.
आम्हा पोरांना त्याचा एवढा राग आला होता ना की, आम्ही येता-जाता ‘हे डांगार कधी खपातय काय माहिती’, म्हणून चर्चा करून हैराण झालो होतो, पण त्याच दरम्यान ज्या मरणार नव्हत्या अशा दोन म्हाताऱ्या मेल्या. आमचं गोड न मिळण्याचं दु:ख थोडं हलकं झालं. त्यांच्या दहाव्याची लापशी, शिरा आम्ही दाबून खाल्ला.
अशा दशक्रियेच्या जेवणासाठी झाडाच्या पानांच्या पत्रावळ्यावर वाढलं जाई, पण तरीही आम्ही मात्र घरूनच जर्मलच्या ताटल्या न्यायचो. कारण पत्रावळीवर जास्त ‘वाढून’ घरी आणता येत नसे. पंक्ती पडल्या रे पडल्या की, जेवढं काही वाढलं जाईल तेवढं एखाद्या भुकेल्या करडासारखं खाऊन घ्यायचो. पोटाला तडस लागेपर्यंत गपाने मारायचो.
जेव्हा पार गळ्यापर्यंत अन्न आलंय असं वाटलं की, मग ताटात वाढून घ्यायचो. एका ताटलीत लापशी किंवा शिरा अन् दुसऱ्या ताटलीत आमटी-भात काठोकाठ भरून घ्यायचो. त्या दोन्ही ताटल्या अगदी हळहळू घेऊन घरी यायचो. लापशी किंवा शिरा जे असेल ते परातीत पसरवून उन्हात वाळवायचो. बुंदी असेल, तर मात्र जास्त दिवस तावडीतून राहत नसायची.
उन्हात वाळायला घातलेली लापशी, शिरा हा कावळ्या-चिमण्यांनी खाऊ नये म्हणून त्याची राखण करत बसावं लागायचं. तो वाळून कडक झालेला शिरा किंवा लापशी जेव्हा केव्हा खावीशी वाटेल, तेव्हा चुलीवरल्या कढईत गरम पाणी करून आई बनवून द्यायची, पण त्यातही फार मोठं सुख वाटायचं. त्याच आनंदात चांगली झोपही यायची.
आईला फार वाईट वाटायचं, पण वाईट वाटून पोट भरत नसतं म्हणून मनातल्या भावनांना ‘आगीनडाग’ दिल्यासारखं गप बसावं लागायचं. एक दिवस माझ्या बापाचाच दशक्रिया करायची वेळ आली, तेव्हा परवडत नसूनही फक्त रीत म्हणून आईनं उधार किराणा घेऊन लापशी-आमटीचं जेवण केलं. मी सगळ्यांच्या दशक्रियेत भरपूर जेवायचो, पण अप्पाच्या दशक्रियेवेळी मात्र मी लापशीकडं ढुंकूनही पाहिलं नाही.
मला असं वाटत होतं की, माझ्या अप्पाला मारून टाकून त्याच्या चितेच्या जाळावरच ती लापशी शिजवलीय की काय? उरलेली लापशी आईनं घरी आणून वाळवून ठेवली. तरीही मी त्यानंतर ती खाल्लीच नाही. गावगाड्यात असे प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतच होते तरीही आवंढा गिळून सूर्य उठायच्या आधीच कष्टाची लापशी कमावण्यासाठी माणसं धडपडत होती. जीव जगवत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.