हरिश्चंद्रापुढं पुन्हा संकट

मार्कंडेय पुराणातील राजा हरिश्चंद्र आणि विश्वामित्रांची कथा मी तुम्हाला सांगत आहे. विश्वामित्रांना सर्व काही दान दिल्यानंतर त्यांना दक्षिणा म्हणून देण्यासाठी हरिश्चंद्राकडं काहीही उरलं नव्हतं.
the story of king harishchandra and vishwamitra markandeya purana cultural history significance
the story of king harishchandra and vishwamitra markandeya purana cultural history significanceSakal
Updated on

- विवेक देबरॉय

मार्कंडेय पुराणातील राजा हरिश्चंद्र आणि विश्वामित्रांची कथा मी तुम्हाला सांगत आहे. विश्वामित्रांना सर्व काही दान दिल्यानंतर त्यांना दक्षिणा म्हणून देण्यासाठी हरिश्चंद्राकडं काहीही उरलं नव्हतं. त्यानं त्यांच्याकडं महिनाभराची मुदत मागितली आणि म्हणाला, ‘‘तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडं अजिबात संपत्ती उरलेली नाही. त्यामुळं तुम्ही मला कृपया आतापुरती जाण्याची परवानगी द्यावी.’’

विश्वामित्र म्हणाले, ‘‘हे महान राजा ! तू जा. जा आणि स्वधर्माचे रक्षण कर. काळ तुला अनुकूल ठरो आणि तुझ्या मार्गात कोणतेही अडथळे न येवोत.’’ अशी परवानगी मिळाल्यावर राजा तिथून निघून जाऊ लागला.

त्याचं ज्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे, असे त्याचे कुटुंबीय जमिनीवरून चालण्याची इच्छा नसतानाही त्याच्यामागून चालू लागले. आपली पत्नी आणि मुलाला घेऊन तो नगराबाहेर पडू लागला, तेव्हा नगरजनांनी आक्रोश केला व ते राजामागून जाऊ लागले.

ते म्हणाले, ‘‘हे प्रजापालका ! हाय ! तू आम्हाला का सोडून चाललास ? आम्ही पीडित आणि अडचणीत असताना हे राजा, तू नेहमीच धर्माचं पालन करत तुझ्या प्रजेवर कृपा केलेली आहेस. हे राजयोगी !

तू जर खऱ्या धर्माचं पालन करणार असशील, तर आम्हालाही तुझ्याबरोबर ने. हे राजेन्द्रा ! जरा थांब, मधमाश्या ज्याप्रमाणं फुलांचा आस्वाद घेतात, त्याचप्रमाणं तुझा कमलपुष्पासारखा चेहरा आमच्या डोळ्यांत साठवून ठेवू दे. आम्हाला तू पुन्हा कधी दिसशील?

एरवी, तू रस्त्यानं जात असताना इतर राजे तुझ्या मागं-पुढं अदबीनं चालतात; आज केवळ तुझी पत्नी बाळाला घेऊन तुझ्यामागं चालत आहे. एरवी, तू मार्गस्थ होत असताना हत्तींवर स्वार झालेले सैनिकांचं पथक तुझ्या पुढं असते; आज मात्र हे राजेन्द्रा, हे हरिश्चंद्रा, तू अनवाणी चालत आहेस. ही कोणती दैवगती आहे ? हे राजा !

तू अत्यंत सुकुमार आहेस. रेखीव भुवया, तेजस्वी कांती आणि सरळ, टोकदार नाक यामुळं तुझा चेहरा प्रभावशाली दिसत आहे. रस्त्यावरची धूळ त्यावर बसली तर या चेहऱ्याचं काय होईल? थांब, हे नृपेंद्रा! तू स्वधर्माचं पालन कर.

अहिंसा हा परमोच्च धर्म आहे आणि क्षत्रियांनी तर त्याचं अवश्य पालन करावे. तू आमचा त्याग करतो आहेस, ही एकप्रकारची हिंसा आणि क्रूरताच आहे. हे रक्षणकर्त्या! आम्ही आता आमच्या पत्नी, मुले, समृद्धी आणि धान्य जवळ ठेवून काय करू? ’’ प्रजेचे असे शब्द कानावर पडताच राजाला दुःखावेग अनावर झाला. प्रजेवरील अपार मायेपोटी तो रस्त्यावर तसाच उभा राहिला.

प्रजेच्या शब्दांमुळं राजा विचलित झाल्याचं विश्वामित्रांनी पाहिलं. हा प्रकार सहन न होऊन त्यांचे डोळे क्रोधानं लालबुंद झाले. ते राजाच्या जवळ गेले आणि ओरडले, ‘‘तुला लाज वाटायला हवी. तू लबाडी करत आहेस. तू माझ्याशी खोटे आणि कपटी बोललास.

मला राज्य सोपविल्यानंतरही तुला आता ते परत मिळविण्याची इच्छा निर्माण झाली आहे.’’ अशा कठोर शब्दांचा आघात झाल्यामुळे खचून गेलेला राजाने ‘आम्ही जातो,’ इतकेच म्हटले आणि तो मुलगा व पत्नीला हाताने ओढतच तातडीने तिथून निघून जाऊ लागला.

ओढत नेले जात असल्यामुळे त्याच्या पत्नीला अत्यंत त्रास झाला आणि तिची अवस्था बिकट झाली. त्यातच विश्वामित्रांनी अचानक तिच्यावर काठीनं प्रहार केला. आपल्या पत्नीला अशा पद्धतीनं मारलं जात असताना पाहून राजाचं हृदय विदीर्ण झालं आणि तो दु:खात बुडाला.

तो फक्त, ‘आम्ही जातोय,’ इतकेच शब्द उच्चारू शकला. त्याची ही अवस्था पाहून पाच मुख्य देवतांना राजाबद्दल अपार करुणा वाटली आणि ते म्हणाले, ‘‘या अत्यंत दुष्ट विश्वामित्राला कोणत्याही लोकात कसा प्रवेश मिळेल ?

आपल्या स्वत:च्याही राज्याचा त्याग करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्याला त्याने उद्ध्वस्त केले. आता महायज्ञांच्या वेळी आम्ही सोमरस प्राशन करण्यापूर्वी तो पवित्र आहे की नाही, मंत्र योग्य रीतीने म्हटले गेले आहेत की नाही, याची विश्‍वासपूर्वक खात्री कोण करणार ?’’

त्यांचे हे शब्द विश्वामित्रांच्या कानावर पडले आणि ते क्रोधाने लालबुंद झाले. त्यांनी देवांना शाप दिला, ‘‘तुम्ही सर्व जण मनुष्ययोनीत जन्माला याल.’’ त्यांचा राग शांत करण्याचा देवांनी प्रयत्न केला, तेव्हा महान विश्वामित्र म्हणाले, ‘‘तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात तरी तुम्ही निपुत्रिक असाल. तुमचा कधीही विवाह होणार नाही आणि तुम्हाला कोणाचाही मत्सर वाटणार नाही. राग-लोभापासून तुम्ही मुक्त असाल आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा देवत्व प्राप्त होईल.’’

अत्यंत बिकट अवस्था झालेला राजा हरिश्चंद्र धिम्या गतीनं मार्गक्रमण करू लागला. त्याच्यामागं त्याची पत्नी शैब्या आणि लहान मुलगा जात होते. राजा दैवी नगर असलेल्या वाराणसीजवळ येऊन पोहोचला.

या नगरीची निर्मिती स्वत: शंकरानं केलेली असल्यानं मनुष्यानं सुखनैव राहावं, असं हे गाव नव्हतं. (आणि म्हणूनच हरिश्चंद्र येथे राहण्यासाठी आला.) राजा आणि त्याची पत्नी अनवाणीच चालत होते. तो नगरीत प्रवेश करणार, इतक्यात त्याला विश्वामित्र तेथे उपस्थित असल्याचे दिसले.

त्यांना तिथं पाहून राजा नम्रतेनं त्यांच्यासमोर झुकला. अत्यंत आदरानं हात जोडत हरिश्चंद्र त्यांना म्हणाला, ‘‘हे महर्षि ! माझं जीवन, माझी पत्नी आणि माझा पुत्र, यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा तातडीने स्वीकार करा.

मी काय करायला हवं, ते करण्याची मला परवानगी द्यावी.’’ विश्वामित्र उत्तरले, ‘‘हे राजर्षि ! एक महिना उलटून गेला आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी तू दिलेलं वचन जर तुला आठवत असेल, तर मला माझी दक्षिणा दे.’’ हरिश्चंद्र म्हणाला, ‘‘हे विप्रवर !

हे तपस्यानिधी ! एक महिन्याचा काळ आज पूर्ण होईल. केवळ अर्धा दिवस प्रतीक्षा करावी. तुम्हाला अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही.’’ विश्वामित्रांनी ते मान्य केले. ते म्हणाले, ‘‘हे महान राजा ! तुझ्या मनासारखे होऊ दे. मात्र, मी पुन्हा येईन आणि दक्षिणा मिळाली नाही तर तुला शापदग्ध करेन.’’ असे म्हणून ते निघून गेले.

पुढील अर्ध्या दिवसात काय घडलं, ते वाचण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. राजा विचार करू लागला : ‘‘मान्य केलेली दक्षिणा मी कशी देऊ? मला कोणी समृद्ध मित्र आहेत का? मला आता संपत्ती कोठून मिळेल?’’

अनुवाद : सारंग खानापूरकर

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणे आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com