

India economy crisis
esakal
अमेरिका -इराण युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आलाय. ४० दिवसांच्या युद्धामुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर काय मार्ग काढता येईल व सरकारचे काय प्रयत्न आहेत याचा वेध...
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यामधील २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले आखाती युद्ध ७ एप्रिल रोजी दोन आठवड्यांचा युद्धविराम यावर एकमत होऊन थांबले, परंतु हा युद्धविराम अस्वस्थ आणि धुमसता ठरला आहे. ९ एप्रिलला इस्राईलने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आणि त्यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या घटनेला इराणने प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे आणि जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांतून युद्धविरामाच्या घोषणेनंतर ९० डॉलर्स प्रती बॅरेल या पातळीवर घसरलेला ब्रेंट कच्च्या तेलाचा दर पुन्हा ९६ डॉलर्सच्या वर गेला आहे. परंतु हे युद्ध पुन्हा भडकू नये म्हणून मध्यस्थीद्वारे चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने इस्राईलच्या साथीने हे सुरू केलेले युद्ध मुळातच अविचारी आहे. इराणने अमेरिका आणि इस्राईल याच्या दुहेरी हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धाने इराणच्या हातामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे कच्चे तेल, एलपीजी इत्यादींच्या व्यापाराचा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचे, तसेच त्यातून जाणाऱ्या जहाजांवर टोल बसवण्याचे आयतेच कोलीत मिळाले आहे.