

Ethical AI responsibility
esakal
रोहित पांढारकर
एथिकल एआयचे मुख्य पाच स्तंभ मानले जातात. पहिला ‘पारदर्शकता’ : एआयचा निर्णय समजण्याजोगा असावा. दुसरा ‘न्याय आणि भेदभावहीनता’, वंश, लिंग, धर्म यावर आधारित भेदभाव नसावा. तिसरा ‘गोपनीयता’– वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहावा. चौथा ‘जबाबदारी’ : चूक झाल्यास विकासक किंवा कंपनी यांची जबाबदारी निश्चित असावी. पाचवा ‘मानवी नियंत्रण’ : अंतिम निर्णय मानवाच्याच हातात असावा.
आज-काल ‘एथिकल एआय’ याविषयी खूप चर्चा चालू आहे. हे काय प्रकरण आहे, हे समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ असा की, आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा प्रकारे विकसित व्हावा आणि वापरला जावा, जो मानवी मूल्यें, नैतिक तत्वे, न्याय, पारदर्शकता, गोपनीयता आणि जबाबदारी यांचं पालन करेल. थोडक्यात, एआयनं निर्णय घेताना किंवा काम करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये, मानवी हक्कांचं रक्षण करावं आणि त्याचे निर्णय का आणि कसे घेतले गेले, हे समजण्यासारखे स्पष्ट असावेत. एआय आज आपल्या जीवनात स्मार्टफोनमधल्या व्हॉइस असिस्टंटपासून ते बँकिंगमधली फसवणूक शोधण्यापर्यंत आणि वैद्यकीय निदानापासून नोकरीच्या मुलाखतींपर्यंत सर्वत्र पसरला आहे. पण हाच एआय चुकीच्या पद्धतीनं वापरला गेला किंवा त्याचे निर्णय पक्षपाती ठरले तर? हाच विचार म्हणजे ‘एथिकल एआय’चा गाभा आहे.