
लाकूडतोड्याची एक वस्तू फार फार वर्षांपूर्वी पाण्यात पडली आणि कथेच्या रूपाने अजरामर झाली. कोणती बरं? बरोबर ओळखलंत.... कुऱ्हाड! तलवार आणि धनुष्यबाणानंतर फक्त युद्धभूमीतच नाही, तर जनमानसात स्थान मिळवण्याचा मान मिळाला तो कुऱ्हाडीलाच! तसं बघायला गेलं, तर कुऱ्हाड हे सगळ्यात प्राचीन शस्त्रं.
माणूस रानावनात हिंडून, गुहांमध्ये राहून दगडांपासून सुरुवातीला ज्या गोष्टी बनवायला लागला, त्यातलं पहिलं शस्त्र हे कुऱ्हाड होतं, इतकं ते प्राचीन! कुऱ्हाडीला संस्कृतमध्ये परशू, छिदी, वृक्षभिद्, कुठाटङक खनित्र म्हटले गेले आहे. संस्कृतमधली ही नावं म्हणजे फक्त ‘संज्ञा’ नाहीत, तर नावासोबत ते शस्त्रांचं कार्य, अर्थसुद्धा सांगतात. ‘परि’ म्हणजे ‘चारही बाजूंनी’ किंवा ‘संपूर्ण’ आणि ‘श्वध्’ म्हणजे मारणे, संहार करणे. समोरच्याचा संपूर्ण संहार करण्यासाठी वापरली जाणारी ती ‘परश्वध’ - कुऱ्हाड!