

Deadly Infectious Diseases in Africa Pandemic Threat
esakal
इबोला विषाणू व त्याच्या प्रसाराची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. आताचा उद्रेक बुंडिबुग्यो या उपप्रकारामुळे उद््भवलेला आहे. या विषाणू प्रकाराविरुद्ध कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कांगोच्या उत्तरेकडील इटुरा या प्रांतात या उद्रेकाची सुरुवात झालेली आहे. हा प्रांत युगांडा, सुदान या देशांचा सीमावर्ती भाग असल्याने हा संसर्ग नव्या देशांमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.
आफ्रिकेतील अनेक देश पुन्हा एकदा प्राणघातक इबोला विषाणूच्या धोक्याला सामोरे जात आहेत. २०२६ मध्ये काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडा येथे आढळलेल्या ‘बुंडिबुग्यो’ प्रकारातील इबोलाच्या नव्या उद्रेकामुळे जगभरात गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच.ओ) या परिस्थितीला ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे. हजारो संशयित रुग्णांची नोंद आधीच झाली आहे.
इबोला हा जगातील सर्वांत धोकादायक संसर्गजन्य आजारांपैकी एक मानला जातो, जरी तो कोव्हिड-१९ इतका वेगाने पसरणारा नसला तरीही धोका आहेच. इबोलामुळे मृत्यूदर २५ ते ९० टक्क्यांपर्यत जाऊ शकतो. हे प्रमाण विषाणूच्या प्रकारावर आणि आरोग्यसेवेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप, अशक्तपणा, उलट्या, जुलाब, स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा. वेळेवर उपचार न झाल्यास गंभीर अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्राव आणि अनेक अवयव निकामी होण्याची शक्यता असते.