

Collaborative Theatre
esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
सहयोग नेहमीच सहज किंवा सोपा असत नाही. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं, त्यांचे अहंकार आणि स्वतंत्र दृष्टी एकत्र येते तेव्हा मतभेद अपरिहार्य असतात. अशा वेळी, सहयोग म्हणजे केवळ एकत्र येऊन काहीतरी बनवणं नाही, तर त्यामागची विचारप्रक्रिया आणि आपण जे करतो ते कुणासाठी करतो याबाबतची जागरूकता महत्त्वाची ठरते. तसेच, अर्थपूर्ण, विचारी आणि सुंदर काही घडवायचं असेल, तर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून समोरच्याचं ऐकून घ्यावं लागतं, याचं भानही सहयोगासाठी उपयुक्त ठरतं.
नाटक ही अशी एक अद्भुत आणि जिवंत कला आहे, जी एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते. कवी कविता लिहितो, चित्रकार चित्र काढतो, कादंबरी एकटा लेखक रचतो. इथे कलाकाराचा एक स्वतंत्र, वैयक्तिक अवकाश असतो. पण नाटकाचं तसं नसतं. नाटककार एकट्याने नाटक लिहितो, पण त्याचं रंगमंचीय रूप सादर होताना मात्र एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असतो. एकल नाट्यातही एकटा कलाकार रंगमंचावर असला, तरी त्याच्या मागे लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, संगीतकार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक असतात. थोझडक्यात, नाटक म्हणजे अनेक माणसांनी एकमेकांच्या सोबतीने, वेगवेगळ्या विचारांचा आणि भावनांचा एकत्रितपणे घडवलेला एक जिवंत आविष्कार. हे जे एकत्र येणं आहे, हा सहयोग - कोलॅबोरेशन - नाटकाचा गाभा असतो.