New Marathi Book
esakal
New Marathi Book : विज्ञान साहित्यविश्वाचा दिशादर्शक आलेख
संपदा सोवनी- sampada.sovani@esakal.com
विज्ञान साहित्य - आजच्या भाषेत ‘साय-फाय’- हा लेखनासह दृकश्राव्य कलाकृतींमध्येही जगभर गाजलेला आकृतीबंध आहे. इंग्लिश भाषेत त्यावर विपुल लेखन झाले आहेच, पण त्या लेखनातील वेचक कथा चित्रपटांतून आणखी व्यापक समूहापर्यंत पोहोचल्या आहेत. मराठी साहित्यातील अनेक लोकप्रिय विज्ञानकथांमध्येही परदेशी वळणाचे संदर्भ येतात आणि काही वेळा संपूर्ण कथाच परदेशी साहित्यातून जशीच्या तशी आल्याचे सापडते. त्यामुळे मराठीतील विज्ञान साहित्याचे वाचन नुकतेच करू लागलेल्या मंडळींचा असा समज होऊ शकतो, की हे साहित्य बऱ्याच अंशी इंग्रजी साहित्यावर अवलंबून असावे. वाचन वाढत जाते, तसा हा समज मोडीत निघत जातो. अस्सल आणि प्रतिभासंपन्न ‘साय-फाय’ साहित्याची निर्मिती करण्यात मराठी लेखक-कवी मागे राहिलेले नाहीत हा साक्षात्कार होण्यासाठी उत्तमोत्तम विज्ञान साहित्य वाचावे लागते. साहित्यवाचनाच्या या सफरीला एक निश्चित दिशा देणारे पुस्तक आहे- ‘मराठी विज्ञान साहित्य- संकल्पना, स्वरूप आणि प्रवाह’.

