

National School of Drama (NSD)
esakal
नगरच्या फलाट क्रमांक दोनवरून गाडी निघाली. आई-वडील दोघं लहान-लहान होत गेले. हळूहळू दिसेनासे झाले, मग लुप्त झाले. मग स्टेशन धूसर होत गेलं. मग नगर शहर मागे पडलं. तोवर अंधार दाटून आला होता. अंधार माजला. सगळं शहर डोळ्यात साठवत, पापण्या बंद झाल्या. त्या सकाळी जेव्हा उघडल्या, तेव्हा चार-पाच राज्य कापून मी दिल्लीला रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. सगळंच नवीन, अनोळखी, परकं. फलाटवर यशराज दिसला. तोही गाडीत आहे हे मला माहीत नव्हतं. तो असल्याने एनएसडीकडे जाण्याचा माझा प्रवास पुन्हा एकदा सोपा केला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली.) त्या गेटपर्यंत तो माझ्यासोबत होता. नंतर अचानक नाहीसा झाला आणि एका वेगळ्या कळपात सामील झाला. मला आणखीनच वेगळं वाटू लागलं. नवीन चेहरे, काही रागाने बघणारे, काही खेकसणारे, काही टोचून बोलणारे. मग लक्षात आलं, हे रॅगिंग आहे. घाबरलोच! आणि आत्तापर्यंत रॅगिंगबाबतीत जे जे ऐकलं होतं, ते डोळ्यासमोर उभं राहू लागलं.