

Battle of Umberkhind History January 1661
esakal
ऑगस्ट १६६०पर्यंत भिमा ते नीरा नदीच्या दरम्यानचा शिवाजीराजांचा बहुतांश भूप्रदेश ताब्यात आल्यानंतर, जानेवारी १६६१च्या सुमारास शायिस्ताखानाने उत्तर कोकण जिंकण्यासाठी उझबेग वंशाच्या कार्तलबखानास रवाना केले.
सैन्याचा मार्ग ः कार्तलबखानासोबत कछवाह, (चतुर्भुज) चौहान, अमरसिंह (चंद्रावत), मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, जसवंतराव कोकाटे, जाधवराव व रायबाघन यांचेही सैन्य पाठविले. १० हजार स्वार, २० हजार पायदळ व मुबलक शस्त्रसामग्री देऊन त्यांना प्रथम पेण गाठण्याचा आदेश देण्यात आला. तिथून दक्षिणेचे नागोठणे व चौल तर उत्तरेचे पनवेल, कल्याण व भिवंडी (भिमपुरी) जिंकण्याची त्यांची मनिषा होती. हे मुघली सैन्य पुण्याहून बोर घाटाने कोकणात उतरण्यासाठी लोणावळेला पोहोचले. मात्र बोरघाटात शिवाजीराजांचे सैन्य असल्याची बातमी कळताच, कुरवंडा घाटाने उतरण्याचा खानाने निर्णय घेतला. हा घाटरस्ता कुरवंडे गावातून खाली कोकणात चावणी व पुढे उंबरे गावात उतरतो. त्यानुसार मुघल सैन्य लोणावळ्याहून ६ कि.मी. नैऋत्येस कुरवंडे गावात येऊन, कुरवंडा (उंबरखिंड/उदुंबरखंड) घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले.
नोव्हेंबर १६६०मध्ये मुघलांशी बोलणी फिसकटल्याने त्यांना एक तडाखा द्यायचाच होता. सहजरित्या मैदानी प्रदेश जिंकल्यानंतर सह्याद्रीमार्गे कोकणविजयाची स्वप्नं पाहणाऱ्या मुघलांच्या या मोहिमेची बातमी राजांना समजली. बोरघाटापेक्षा कुरवंड्या घाटात आपण मुघलांची कोंडी करू शकू, हे हेरून राजांनी (बोर घाटात मुघली टेहळ्यांना शिवसैन्य दिसेल असे ठेऊन) मुघली सेनासागर कुरवंड्याकडे वळविला. आणि १५ हजार पायदळ व १० हजार घोडेस्वार सोबत घेऊन जानेवारी १६६१च्या सुमारास राजांनी राजगडाहून उंबरखिंड गाठली.
बंदुकीच्या नळीप्रमाणे (नलिकायंत्र) अरुंद असलेल्या या खिंडीतील रस्ता दोन्ही बाजूंनी घनदाट झाडांनी वेढलेला होता. तीव्र घळीतून उतरत जाणाऱ्या या मार्गावर दोन्ही बाजूंना उंचच उंच डोंगर होते. मागचा व पुढचा मार्ग अडविल्यास मध्ये अडकून पडलेल्या सैन्यास शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. याउलट झाडाझुडुंपात लपून राहून अगदी कमी सैन्याच्या साहाय्याने मराठे त्यांच्यावर हल्ला करू शकत होते. मुघलांचा अजस्त्र तोफखाना, उच्चतम घोडदळ, शस्त्रसाठा, विपुल संपत्ती, अतुलनीय शौर्य सामर्थ्याचा या भौगोलिक रचनेपुढे बिलकूल टिकाव लागणार नव्हता. थोडक्यात, हा एक प्रकारचा मृत्यूचा सापळाच होता. अखेर कार्तलबखान या सापळ्यात शिरला! शत्रूसैन्य पूर्णपणे जाळ्यात आल्याची खात्री झाल्यावर अचानक अरण्यातील शांतता मराठ्यांच्या युद्धघोषणांनी व नगाऱ्यांच्या भीषण निनादाने भंग पावली. शत्रूला काही कळायच्या आत या आवाजांमागोमाग बाणांचा आणि बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. अचानक झालेल्या या हल्यामुळे मुघली सैन्यात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला. मित्रसेन आणि अमरसिंह यांनी काही काळ या पळापळीला आवर घालून प्रतिहल्ला करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु मुघली शूरवीरांची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली होती आणि त्यात भर म्हणून शिवाजीराजांच्या तेजोवलयासोबतच दुपारच्या प्रखर उन्हाचा तडाखा त्यांना सोसावा लागत होता. अशा अत्यंत बिकट पेचात सापडलेल्या रायबाघिन हिने कार्तलबखानाला या सापळ्यात ओढून आणल्याबद्दल दोष दिला आणि शिवाजीराजाला शरण जाऊन प्राण वाचवण्याचा सल्ला दिला. खानाने तत्क्षणी शत्रूशी वाटाघाटी करण्यासाठी आपला एक दूत पाठवला. राजांनी खानाची विनंती मान्य करत मुघलांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना जिवंत परत जाऊ दिले. आणि सेनापती नेतोजींना मुघलांवर पाळत ठेवण्यासाठी तिथेच थांबवून, राजांनी स्वतः कोकण विजयासाठी कूच केले.