टीना धरमसी- स्त्री स्वप्नांचा आधारवड | Tina Dharamsi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tina Dharamsi

टीना धरमसी- स्त्री स्वप्नांचा आधारवड

'जागर सावित्रीचा

'जागर सावित्रीचा' या माझ्या पहिल्या दिवशीच्या लेखमालेत मी टीना धरमसी आणि त्यांच्या कामाची ओळख करून देणार आहे. टीना शहा- धरमसी मूळच्या औरंगाबादच्या. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेमध्ये त्या शिकल्या. टीना यांच्या आजोबांचे औरंगाबादमध्ये पुस्तकाचं दुकान होतं. लहानपणापासून पुस्तकाच्या सहवासात आणि अनेक वाचकांच्या अभ्यासू वातावरणात टीना यांची वैचारिक जडणघडण झाली. लग्नानंतर मुंबईच्या अंधेरी भागात राहणारे पुरव हुकूमचंद धरमसी यांच्याशी टीना यांचा विवाह झाला. त्यानंतर टीना मुंबईत स्थायिक झाल्या. पुरव हे शेअर मार्केटचे अभ्यासक आहेत. टीना यांच्या आई विनिता आणि वडील नूतन यांच्याकडून टीना यांच्याकडे सेवाभावी वसा आला.

त्याला जोड मिळाली ती त्यांच्या शिकाऊ वृत्तीची. औरंगाबाद आणि मुंबईत टीना यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रॉडक्शन डिझायनर, आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरमध्ये आपले नाव केले. आज त्यांचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. भारतासह अनेक देशांत त्यांनी आपले काम सुरू केले. जिद्द, चिकाटी, सेवाभाव आणि लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे ही वृत्ती असेल तर आपण केलेल्या कामाला निश्चितच मोठी पावती मिळते, हेच झालं टीना यांच्या बाबतीत.

टीना सध्या मुंबईतल्या अंधेरी भागात राहतात. मी अंधेरीत टीना यांच्या हरी पोहोचलो. टीना यांची मुलगी रीत, तनिष्का, टीना यांचे यजमान पुरव हुकूमचंद धरमसी या सर्वांनी माझे स्वागत केले. गप्पांमधून टीना यांचा प्रवास, त्यांनी केलेलं काम आणि त्या कामाच्या माध्यमातून टीना यांनी आपल्या शहराच्या, आपल्या विभागाच्या मुलींसाठी केलेले काम, एकूण सेवाभावी कार्याचा केलेला लेखाजोखा माझ्यासमोर ठेवला. टीना यांचे जुने अल्बम, पेपर कात्रण, यावरून हे काम किती खोलवर गेले आहे हे मी अनुभवत होतो. वीसपेक्षा जास्त चित्रपट, शंभरपेक्षा जास्त मालिका, चारशेपेक्षा जास्त सामाजिक कार्यक्रम. बापरे कितीही हे आणि काय काय.

आम्ही सर्वजण जेवत होतो. घरामध्ये एक मुलगी आम्हाला जेवण वाढत होती. तिला मी विचारलं ह्या कोण आहेत? ती म्हणाली, ही औरंगाबादमधून आलेली सुलोचना कदम आहे. माझ्या रविना कांबळे नावाच्या मैत्रिणीने तिला माझ्याकडे पाठवले. ती चार वर्षे झाली माझ्याकडे आहे. डिझायनिंगमधलं शिक्षण घेऊन ती आता कामाला लागली आहे. मी सुलोचनाला विचारलं, सुलोचना तुम्ही आता पुढे काय करणार आहात. सुलोचना पटकन म्हणाली, मी टीना दीदीचा हा वारसा पुढे नेणार आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास पाहून मी एकदम अवाक झालो.

टीना धरमसी (९८२०५६७७८९) मला सांगत होत्या, आपल्या भागात असणाऱ्या मुली आपलं घर, शहर सोडून जायला तयार होत नाहीत. ‘त्या’ मुलींना जर गावकुसातून अगोदर आलेल्या आणि इथे सेटल झालेल्या मुली, महिला यांनी सांगितले तर त्या नक्की ऐकतील. लाजराबुजरा चेहरा घेऊन करिअरच्या रंगमंचावर पाय रोऊन बसणाऱ्या मुलींनी जर आपल्या दोन बहिणींना उभे करण्याचा वारसा पुढे चालवला तर हा इतिहास पुढे जाईल.

तारक मेहता का उल्टा चश्मा, बालिकावधू, बिग बॉस, राम गोपाल वर्मा यांचा शोले टू यांसारखा चित्रपट, मालिका यासाठी मोठे सेट टीना यांनी उभे केले. आपल्या देशातील ऐतिहासिक कलाकृती चित्रीकरणाच्या, ‘सेम टू सेम’ देखाव्याच्या माध्यमातून अजरामर व्हावी, यासाठी भविष्यामधले टीना यांनी बनविलेले दोन प्रोजेक्ट खूप मोठे, महत्त्वाचे ठरतील. ते प्रोजेक्ट कसे आहेत हे मला टीना यांनी सांगितले. इतिहास सादर करणे आणि लोकांच्या हाताला काम, हे दोन्ही या प्रोजेक्टमधून साध्य होणार आहे.

पटकथेला चित्र, देखाव्याच्या स्वरूपात उतरवणे यामध्ये टीना यांचा हातखंडा आहे. देशातल्या सर्व राज्यांत त्यांचे हे काम चालते. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपावर लागते. ती मॅनपावर त्यांनी मराठवाड्यातून घेतली. त्यासाठी मुलींना त्यांनी प्राधान्य दिले. टीना यांनी एक चळवळ उभी केली. ही चळवळ आज एक आदर्श म्हणून समोर आली आहे.

मी टीना यांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत माझ्या मनात विचार येत होते. टीना यांचा वारसा अनेक महिलांनी चालवला तर किती बरे होईल ना..! अशा अनेक टीना आपल्या अवतीभवती असणे गरजेचे आहे. बरोबर ना..!

संदीप काळे

Sandip.kale@esakal.com

9890098868

Web Title: Tina Dharamsi Excellent Work In Film Industry Prepared A Set For Big Boss Tarak Mehta Ka Ulta Chashma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..