esakal | मराठवाड्याची लेक
sakal

बोलून बातमी शोधा

Tina Dharamsey

मराठवाड्याची लेक

sakal_logo
By
संदीप काळे

मराठवाड्याची लेक

त्यादिवशी मी आणि जय मिजगर अंधेरीला भेटलो. जय म्हणाला, मुंबईमध्ये मराठवाड्याची खूप कर्तबगार माणसं आहेत. मी आज टीना धरमसी यांना भेटलो. टीना ह्या औरंगाबादच्या आहेत. चित्रपट, वाहिन्यांवरील मालिकांमध्ये लागणारे सेट बनविण्याचे काम त्या करतात. सामाजिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योग्यदान आहे. टीना यांच्या वडिलांचं औरंगाबादला ‘औरंगाबाद बुक डेपो’ नावाचं पुस्तकांचे मोठे दुकान आहे. एका छोट्या व्यवसायिकाची मुलगी आज मुंबईच्या चित्रपटसृष्टीत टॉपच्या दहा लोकांमध्ये आहे. जयकडून औरंगाबाद बुक डेपोचं नाव ऐकताच मी २००४ मध्ये गेलो. मी तेव्हा औरंगाबाद विद्यापीठामध्ये शिकायला होतो. तंत्रज्ञानाची प्रगती जेमतेम सुरू झाली होती.

कुठलंही पुस्तक हवं असेल तर, ‘औरंगाबाद बुक डेपो’ हेच नाव पुढं यायचं. त्या बुक सेंटरचे मालक नूतनकुमार तेजपाल लोडाया काका यांच्याशी पुस्तकाच्या देवाणघेवाणीवरून मैत्री झाली होती. त्या मैत्रीला अजून एक कारण होतं, ते म्हणजे माझे गुरुवर्य प्रा. सुरेश पुरीसर. त्या बुक सेंटरवर पुरीसर हे नेहमी बसलेले असायचे. मी अनेक वेळा त्यांना घ्यायला जायचो. आता नूतनकुमार काका नाहीत. त्यांच्या मुलींविषयी ऐकून खूप आनंद वाटला. जय मला टीना यांनी उभं केलेलं सामाजिक काम, त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमधील काम वेगवेगळ्या ऐतिहासिक वारशाला दिलेले अत्याधुनिक रूप, मागच्या १० वर्षांत मराठवाड्यातल्या चार हजार तरुणाईच्या त्यांनी हाताला दिलेले काम, त्यांची असलेली सतत सेवाभावी वृत्ती याविषयी, जय मला भरभरून सांगत होता.

मी जयला म्हणालो, आपण जमलं तर त्यांना नक्की भेटूया. जय म्हणाला, त्यात काय, आताच जाऊया त्यांच्याकडे. जयने टीना यांना फोन केला. आम्ही त्यांच्या भेटीसाठी निघालो. अंधेरीच्या लक्ष्मी बिजनेस पार्क भागामध्ये असणाऱ्या टीना यांच्या कार्यालयामध्ये आम्ही पोहोचलो. त्यांचे कार्यालय एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखे होते. जय यांनी मला सांगितलं होतं, तारक मेहता का उल्टा चश्मा, बालिकावधू, बिग बॉस, राम गोपाल वर्मा यांचा शोले टू यासारखा चित्रपट, मालिका यासाठी मोठे सेट टीना यांनी उभे केले. पटकथेला चित्र, देखाव्याच्या स्वरूपात उतरवणे यामध्ये टीना यांचा हातखंडा आहे.

२००२ मध्ये लग्न करून टीना मुंबईमध्ये आल्या. देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या पुरातन वास्तूला नवीन रूप देणे, चित्रीकरणाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास उभा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. आम्ही टीना यांच्याशी बोलत असताना त्यांच्या कामांचा लेखाजोखा फोटोज, व्हिडीओ, बातम्यांद्वारे पाहत होतो. खूप मोठे काम त्यांनी उभं केलं होतं. मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या मुलींच्या हातांना काम देण्यासाठी टीना यांनी पुढाकार घेतला. तसे आमचे नाते मित्रत्वाच्या बंधनात लवकर बांधले गेले. त्याचे कारण ‘औरंगाबाद बुक डेपो’ होते. त्यावर आम्ही खूप बोललो. टीना यांचे आजोबा तेजपाल खिमजी लोडाया स्वातंत्र्यसैनिक होते. टीनाचे वडील नूतन लोडाया हे व्यापारी. टीना धरमसी (९८२०५६७७८९) म्हणाल्या, मी मराठवाड्याची लेक आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या माणसांविषयी मला अभिमान आहे.

औरंगाबाद बुक डेपो म्हणजे त्या वेळी औरंगाबादमधले एक चळवळीचं केंद्र होतं. माझी आजी लक्ष्मी, माझी पहिली शिक्षिका. धाडस, नम्रपणा, व्यावसायिक दृष्टिकोन, हे मी आजीकडून शिकले. आमच्या घरात पस्तीस सदस्य होते. त्यांचे सर्व मॅनेजमेंट माझी आई विनिता करायची. आईकडून मॅनेजमेंटचे गुण माझ्यात आले. कॉलेजमध्ये वास्तुकलेचा इतिहास शिकविणाऱ्या प्रा. माया वैद्य मॅडमनी वास्तुकलेचे प्रेम, ज्ञान माझ्या मनात प्रचंड रुजविले. जेव्हा सासरी आले, तेव्हा सासुबाई मधू हुकूमचंद धरमसी यांनी मला पहिल्या दिवशी सांगितले, तू या घराची मुलगी आहेस. सासूबाईंनी मला पाठबळ, स्वातंत्र्य दिले. दिवसभर काम केल्यावर, मी जेव्हा थकूनभागून घरी येते, तेव्हा माझी मुलगी रीत, तनिष्का माझ्या समोर चहाचा कप ठेवत म्हणतात, ‘आई, तू जेवायला बस. आम्ही तुला जेवायला वाढतो.’ असे प्रेम पाहून एका मिनिटात कामाचा थकवा निघून जातो.

एका महिलेला, अनेक महिलांनी समजून घेऊन, जर उभे केले, तर चिरंतन टिकणारा समाज उभा राहू शकतो, हे टीना यांच्या प्रवासावरून दिसत होते. टीना भरभरून बोलत होत्या. औरंगाबाद बुक डेपो, गुलमंडी, देवगिरी कॉलेज आणि आता मायानगरीच्या सर्व टप्प्यांचा प्रवास मी समजून घेत होतो. मला त्यांचे काम पाहायचे होते आणि त्यांना मला त्यांचे काम दाखवायचे होते. म्हणतात ना, माहेरच्या माणसांविषयी माहेरवाशिणीला अप्रूप असते, तसे काहीसे. आम्ही फिल्मसिटीमध्ये गेलो, त्यांचे तिथे सेट बनविण्याचे काम सुरू होते. तिथे काम करणाऱ्या अनेक मुली, महिलांशी त्यांनी माझा परिचय करून दिला. त्या बहुतांशी मराठवाड्यातल्या दिसत होत्या. टीना यांनी स्वीकारलेल्या पालकत्वावर त्या भरभरून बोलत होत्या.

कामाच्या ठिकाणावरून आम्ही टीना यांच्या घरी पोहचलो. टीना यांनी आईला माझी ओळख दिली. आईला ‘औरंगाबाद बुक डेपो’ची खूणगाठ सांगितल्यावर आईच्या डोळ्यात एकदम चमक दिसली. आम्ही भरभरून बोललो. हे बोलणे सुरू असताना त्या घरातले माणुसकीचे संस्कार अनेक वेळा मध्ये मध्ये डोकावत होते. टीना यांची मुलगी रीत, तनिष्का, टीना यांचे यजमान पुरव हुकूमचंद धरमसी या सर्वांनी आमचे जोरदार स्वागत केले. मराठवाडा-चवीच्या जेवणाच्या मेजवानीला सुरुवात झाली होती. टीना यांची मुलगी रीत सांगत होती, माझी आई माझ्यासाठी आदर्श आहे. तिचे काम, नियोजन, ध्येय तिच्या कष्टापुढे नतमस्तक होते. आईला लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी तू सतत काम करत राहा, असे वरदान मिळाले आहे. मलाही माझ्या आईसारखे ‘उद्योगी’ महिला बनत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांचा ‘आधारवड’ म्हणून काम करायचे आहे.

रीतच्या बोलण्यामध्ये असलेला आत्मविश्वास माझे लक्ष वेधून घेत होता. आई म्हणाल्या, टीनामध्ये तिच्या वडिलांचे सगळे गुण आहेत. वडील गरजूंना, गरिबांना फुकट पुस्तके वाटायचे. तसेच टीनाचे आहे. ती सतत कुणाचे ना कुणाचे पालकत्व स्वीकारण्याच्या भूमिकेत असत. मी जेव्हा टीनाच्या उंच गेलेल्या झेपेकडे पाहते, तेव्हा मला तिच्या वडिलांची आठवण येते. मध्येच वडिलांची आठवण काढून आई भावनिक झाल्या. टीना आपल्या आईला सावरत, जवळ घेत म्हणाल्या, अगं आई, बाबा आपल्याला सोडून गेले कुठे? आपल्यामध्येच आहेत. ते सतत माझ्यासोबत असतात. ते मला सेवाभावी वारसा पुढे चालव, असं सांगतात. माझ्यातली ऊर्जा सतत वाढवत, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी काम करावं, यासाठी मला प्रोत्साहित करत असतात. असं म्हणताना दोघी भावुक झाल्या.

आपल्या देशातील ऐतिहासिक कलाकृती चित्रीकरणाच्या, ‘सेम टू सेम’ देखाव्याच्या माध्यमातून अजरामर व्हावी, यासाठी भविष्यामधले टीना यांनी बनविलेले दोन प्रोजेक्ट खूप मोठे, महत्त्वाचे ठरतील. इतिहास सादर करणे आणि लोकांच्या हाताला काम, हे दोन्ही या प्रोजेक्टमधून साध्य होणार आहे. त्या घरात भावूक वातावरणाचे आम्हीही सदस्य झालो होतो. आईंच्या पायावर डोकं ठेवत आम्ही बाहेर निघालो. स्त्रीशक्तीची ताकत काय असू शकते, हे टीना यांना भेटल्यावर लक्षात आलं. आपल्या माणसांशी, मातीशी ‘इमान’ कसं राखलं पाहिजे? हेही मी अनुभवले होते. अशा अनेक टीना पुढे आल्या पाहिजेत; टीना यांच्यासारख्या नम्र, धाडसी, प्रेरणादायी ‘उद्योगी’ महिलेला सलाम करत मी नवी मुंबईच्या दिशेने निघालो होतो.

loading image
go to top