
विवेक जाधव - Jadhavkalpana45@gmail.com
कोकण म्हटलं की, आपल्या नजरेसमोर येतो अथांग निळाशार समुद्र. कोकणच्या चिंचोळ्या प्रदेशाच्या पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला सह्याद्री पर्वताचा वेढा आहे. त्यामुळे कोकण हा प्रदेश जैवविविधता, निसर्गसंपन्नतेने समृद्ध असा प्रदेश आहे. अरबी समुद्र अन् सह्याद्री पर्वत याच्या मधोमध असलेल्या ४० ते ६० किलोमीटरच्या प्रदेशात अनेक नद्या वाहतात. त्यातील महत्त्वाची नदी म्हणजे उल्हास नदी होय. उल्हास नदीचा उगम राजमाची टेकड्यांवर होतो. पुढे ती वाहत जाऊन वसईच्या खाडीला मिळते. याच नदीला भातसा, काळू, मुरबाडी, पेज, पोशीर, शिलार, भिवपुरी आदी उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे उल्हास नदीच्या खोऱ्याला भौगोलिक विशेष महत्त्व प्राप्त होते. उल्हास नदीच्या खोऱ्याला लागूनच कर्जत, बदलापूरसारखी ऐतिहासिक महत्त्व असलेली शहरे आहेत. त्याचबरोबर उल्हास नदीच्या खोऱ्यात सह्याद्रीचाच भाग असलेली माथेरान डोंगररांग आहे.