राऊत बखर: आलमगीराच्या दक्षिण दिग्विजयास पायबंद

Narendra Modi and Uddhav Thackeray
Narendra Modi and Uddhav Thackeray

आलमगीर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी निघालेल्याला दोन हुन अधिक वरीस उलटून गेले होते. सालीना लाखो होन उत्पन्न देणारे कसब्या पुण्यासारखे मोक्याचे प्रदेश मुघली फौजांनी घशात घातले होते. दिवसेंदिवस जनता जिझीया कर लावून नागवली जात होती. व्यापारी नवनव्या करांनी हवालदील झाले होते.शेतकरी देशोधडीला लागले होते. सौराष्ट्रातून आलेल्या गुर्जर व्यापाऱ्यांना मात्र या सगळ्यातून सवलत होती त्यामुळे ते दिवसेंदिवस गब्बर होत चालले होते. 

सुलतानी फौजांना जिथं जिथं मुलुख मारता येत नव्हता तिथे स्थानिक बंडखोरांना जहागीरची, वतनदारीची लालूच दाखवून पुंडावा माजवला होता. नुकतेच त्याच्या गळाला सावंतवाडीचा वतनदार खेम नारोजी लागला होता. दादर परगण्यात राहणारा थोरल्या धन्यांचा चुलत भाऊ मंबाजी( जगदंब, जगदंब ) देखिल आलमगीराशी आतून संधान बांधून आहे व त्याबदल्यात बादशहाने 'काही प्रदेशात चौथाई वसूलीचे अधिकार तुला बहाल केले जातील' असे वचन दिले आहे अशी दबक्या आवाजात मराठा सैन्यात चर्चा होती. 

दिवसेंदिवस परिस्थिती चहुबाजुने बिकट होत चालली होती पण थोरल्या धन्यानी धीर सोडला नव्हता. धाकल्या धन्यांबरोबर हिंदुस्थानचा पट मांडून तासंनतास त्यांच्या चर्चा चालत.जोडीला दर्यासारंग नार्वेकर देखिल असत. सुलतानाचा वरवंटा फक्त दख्खनेतच नव्हे तर हजारो मैल लांब सिंध मध्ये राज्य करणाऱ्या म्लेंच्छ पंजाबी राजांवर सुद्धा अध्येमध्ये फिरत होता.आलमगीरास संपवायचे तर दक्षिणेतीलच काय पण अखंड हिंदुस्थानातील छोट्या छोट्या राजांनी एकत्र आले पाहिजे हे थोरल्या धन्यांनी बरोबर ओळखले होते. व त्याप्रमाणे कधी उघड तर कधी आतून संधान बांधून औरंगजेबास मोका मिळेल तिथे जेरिला आणण्याचे कार्य सुरु केले होते. 

बारामतीचा आदिलशहा, हैद्राबादचा निजामशहा, दिल्लीचा बेबंदशहा, कलकत्त्याची बडी बेगम या सगळ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार, सलामसलत सुरूच होती. थोरल्या धन्यांचे पिताश्री आदिलशाही दरबारीच कामाला होते त्यामुळे त्यांचा पिता पुत्रवतच स्नेह होता. ७५ च्या दशकातील आणीबाणी सारखी परिस्थिती आली तर वेळप्रसंगी एकत्र येऊन तुर्का विरुद्ध मोठा उठाव करता येईल का याची देखिल चाचपणी सुरू होती. 

त्या दिवशी दुपारच्या प्रहरी जेवणखाण करून झाल्यावर थोरलं धनी अस्वस्थपणे चौसोप्यात फेऱ्या घालत होते. काहीतरी मोठी भानगड असेल आणि वेळ आल्यावर आपल्याला कळेलच या विचाराने मी आपला चंचीला हात घातला. खास निपानीहुन मागवलेल्या व गुलाबजलात भिजवलेल्या तंबाखूवर लोणी मिसळलेला चुना मळून मी ब्रम्हानंदी टाळी लावली. घटकाभर गेला असेल व किल्ल्याचा पुर्वेकडचा दरवाजा उघडल्याचा मोठा आवाज आला. 

मी डोकावून पाहिले तर घोड्यावर स्वार असलेला एक जासूद घामाने निथळत वाऱ्याच्या वेगाने आत आला. कदाचित तो विसाव्यासाठी देखिल कुठे थांबला नसावा. (आदेशानुसार ) राजांच्या कपाळावर चिंतेचे जाळे अधिक दाट झाले. जासूदाने आपला घोडा मोतद्दाराकडे सुपुर्द केला असावा. धाडधाड लाकडी पायऱ्यांचा आवाज करत तो वर आला. थोरल्या धन्यांना आणि त्यांच्या मांडीवर बसून गंजिफा खेळणाऱ्या बाळ राजांना मुजरा घालून त्याने कमरेचा मोहोरबंद लखोटा धन्यांकडे अदबीने सुपुर्द केला. 

थोरल्या धन्यांनी लखोटा फोडून वाचायला सुरुवात केली आणि ................ ! 

कपाळावर असलेल्या चिंतेच्या आठ्या जाऊन त्याची जागा हर्षोल्लासाने घेतली. एकदा दोनदा तर त्यांनी खुशीत येत हवेतच मुठीचा प्रहार केला. वाचून झाल्यावर काहीतरी त्यांच्या लक्षात आले व दर्यासारंगाच्या कडोसरीची थैली उघडून त्यातून बरोबर एकच सोन्याचा होन (तंगीमुळे) काढून जासूदाच्या हातावर ठेवला व त्यास जाण्याचा इशारा केला त्याबरोबर तो संतोषाने निघून गेला. 

" काय झालं धनी? एवढी खुशी कशापायी?" मी अधिरतेने विचारले

" नेताजी राऊत, आज कितीतरी दिवसांनी मनाला संतोषजनक घटना घडली आहे. " थोरलं धनी 

" पर नेमकं झालं तरी काय धनी ?" मी 

" काय झालं म्हणून काय पुसता सरनौबत, त्या तिकडं उगवतीला नांदेडात मोहम्मद बिन तुघलकाचा दख्खनी सुबेदार अशोकराज चौहान याने तुर्काच्या फौजेला खिंडीत गाठून त्यांचा सपशेल पराभव केला" 

" पर राजं तो मुलुख तर अशोकराजाचा वालीद शंकरदेव चौहान यांच्या काळापासून त्यांच्याच ताब्यात होता ना?" मी 

" खरं आहे राऊत पण काळ असा गनीम झाला आहे कि जो मुलुख आपला आहे म्हणून आपण भ्रमात राहतोय तिथं तिथं जनता मुघली फौजांच स्वागत करतेय, अर्थात यामागे लालूच, भेदाभेद, थापा, धाकदपटशा आहे यात आम्हाला शंका नाही. " थोरलं धनी खंत व्यक्त करत बोलले

गुदस्ता साली साष्टीच्या बेटावर झालेल्या तुंबळ लढाईत आलमगीराचा सुबेदार मिर्झाराजे फडणवीस याच्या बरोबर कराव्या लागलेल्या मानहानीकारक तहाचा सल अद्याप थोरल्या धन्यांच्या मनातून गेलेला नव्हता.

" म्हणजे धनी, नांदेडच्या सुबेदारांनी मोठीच कामगिरी बजावली म्हणायची" मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला 

" अर्थात , या नांदेडाच्या लढाईत आपले सगळे सिंह कामी आले पण बेत ठरल्या प्रमाणे गड मात्र भुमिपुत्राच्या ताब्यात राहिला याचा आम्हाला अधिक आनंद आहे. या विजयामुळे मरगळ आलेल्या मराठा सैन्याला देखिल नवसंजीवनी मिळेल व त्या दुप्पट जोमाने कामाला लागतील यात शंका नाही. बघाच तुम्ही" 

" याची खूशी मराठी मुलखात जाहीर केली पाहिजे धनी" मी 

"माझ्या मनातील गोष्ट बोललात राऊत, आलमगीराविरुद्ध हिंमत व नेटाने मिळवलेल्या विजयाबद्दल आम्ही मराठा रियासतीतर्फे अशोकराजांना सोन्याचे कडे व "आदर्शराऊ" हा खिताब जाहीर करतो. पंत, आदर्शराऊंचे अभिनंदन करणारा लखोटा टाकोटाक नांदेडास रवाना करा" थोरलं धनी खुशीतच बोलले

" हे मात्र झ्याक केलं धनी" मी देखिल आनंद व्यक्त केला 

"आणि तुम्ही का थांबलात दर्यासारंग, तोफांना बत्ती द्या , बारा मावळात गुढ्या उभारा. मराठी तट्टांनी सुरतेचं पाणी प्यालेल्याला बराच काळ उलटून गेला आहे.लवकरच ऐंशी ऐंशी कोट सोन्याच्या होनांचा व्यापार करणाऱ्या जय शहाच्या सुरतेला पुन्हा एकदा बदसुरत करण्याची वेळ देखिल येईलच. बस आई जगदंबेचा कौल आला कि आम्ही निघालोच म्हणून समजा." थोरलं धनी खुशीतच उद्गारले 

" जगदंब , जगदंब " मी अनुमोदन दिले 

संदर्भ : राऊत बखर ( आधुनिक भारताचा आधुनिक इतिहास संशोधन मंडळ ) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com