स्मरण पुण्यश्‍लोक ओसामाजींचे...

तुषार दामगुडे
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

ओसामाजींनी या धर्मपंडितांची समजूत काढण्यासाठी दोन विमानं भरून आपले शांतीदूत पैठण येथे पाठविले; परंतु दुर्दैवाने ती दोन्ही विमानं दाट धुक्‍यामुळे पैठण येथील दोन उत्तुंग व्यापार संकुलावर अपघाती आदळल्यामुळे सर्व शांतीदूत वैकुंठवासी झाले. या हृदयद्रावक बातमीमुळे ओसामाजींच्या कोमल हृदयावर मोठाच आघात झाला. त्यांनी अत्यंत दुःखद अंतकरणाने स्वहस्ते लिहिलेले सर्व अभंग कुणारच्या पात्रात अर्पण करुन अज्ञातवासात प्रयाण केले

"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे
रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे
मुजाहदीन सुस्वरे आळविती'

मुलांनो आणि मुलींनो, आज आपण इतिहासाचे खरे पुनर्लेखन या उपक्रमांतर्गत या शतकातील एका महान संताची ओळख करुन घेणार आहोत.

तर ओसामाजी लादेन हे थोर्र थोर्र व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हयातीत याची देही याची डोळा पहायला मिळाले हे आपले अहोभाग्य. ओसामाजींचा जन्म सौदी अरेबीयातील डायनासॉर इतक्‍याच अतिप्राचीन असलेल्या "लादेन' वंशात झाला (या अर्थाने ते पृथ्वीचे मुळनिवासी देखिल सिद्ध होतात). ओसामाजी हे आपल्या पिताश्रींच्या 22 पत्नी आणि 57 अपत्यांपैकी दहाव्या पत्नीचे शेवटचे चिरंजीव. ओसामाजींच्या मातोश्रींनी ओसामाजींच्या जन्मावेळी "मुलगा होऊ दे, तुझी खणानारळाने ओटी भरीन" असा नवस सौदी अरेबियाच्या मरीआईला बोलुन ठेवला होता, अशी सरकारी कागदोपत्री नोंद आहे. अर्थातच यामुळे त्यावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त आहे.

श्रावण महिन्यातील गुरूवारी पोर्णिमेला गुरूपुष्यामृताच्या मुहूर्तावर सगळे ग्रह उच्चीचे असताना (सारखे सारखे टॅक्‍सी भाड्याचा खर्च नको; म्हणून घरीच उघडलेल्या) लादेन प्रसुतीगृहामध्ये ओसामाजींचा जन्म झाला. छोट्या ओसामाजींची कुंडली मांडण्यासाठी थेट काशीहुन नागाभट्टांना पाचारण करण्यात आले. बुवांनी काळ, वेळ, ग्रहांची स्थिती पाहून होरा मांडला. बराच वेळ आकडेमोड केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. "कित्येक शतकानंतर जुळून आलेल्या सुमुहर्तावर या बालकाचा जन्म झालेला आहे. पैसा, सत्ता, अमाप प्रसिद्धी यांनी युक्त असे भविष्य बालकाच्या कपाळी लिहिलेले आहे परंतु ........'

गुरूजींनी नाट्यमय पॉझ घेतला. गुरूजींनी पॉझ घेतल्या बरोबर ओसामाजींचे एकमेव वडील, बावीस माता आणि त्यावेळी असलेल्या 43 भावडांचा जीव कासावीस झाला. कित्येक छोट्या छोट्या भावंडानी तर तोंडाने चोखत असलेला ........... स्वतःचा अंगठा देखिल तसाच ठेवून चेहरा काळजीने प्रश्नार्थक केला.

"परंतु काय गुरूवर्य ? आपण उत्तर देत नाही तोवर मजप्रत जीवाला शांती नाही गुरूवर्य, आपण बोलण्याची कृपा करावी गुरूवर्य,' ओसामाजींच्या पिताश्रींनी व्याकुळ अंतकरणाने आपली चिंता व्यक्त केली.

"परंतु त्याचे असे आहे की, सदर बालक आपले संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट अशा ध्येयाला वाहून घेईल. त्या ध्येयप्राप्तीसाठी त्याला जगप्रवास करावा लागेल. त्यामुळे गृहसुखाचा अभाव स्पष्टपणे कुंडलीत दिसतो आहे. शुभं भवतु,' गुरूजींनी खुलासा करुन सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी आपल्या कडोसरीला लावली.

तर अशा तऱ्हेने ओसामाजींचे बालपण गोकुळाप्रमाणे भरलेल्या कुटुंबात निर्वेधपणे सुरू जाहले. एका लॉलीपॉपवरून भावंडामध्ये मतभेद होऊ नयेत म्हणून ते स्वतःच गट्टम करणे, जुने नवे यातील द्वैतभाव नष्ट व्हावा म्हणून भावंडाचे नवीन कपडे फाडणे, आयुष्यात कायम हिंमत उपयोगी पडते याचे महत्व लक्षात यावे म्हणून पोहता न येणाऱ्या भावंडांना विहिरीत ढकलून देणे, कमी खर्चातील तंत्रज्ञान वापरून मोठमोठ्या गोष्टी करुन दाखवणे जसे की कागदी विमानं वापरून पत्त्यांच्या इमारती धराशायी करणे आदी ओसामा बाललीलांनी लादेन कुटुंबाचे आयुष्य ओतप्रोत भरून गेले होते. या बाललीलांतून न्याय , सचोटी, दया, शांती, समाजाप्रती कर्तव्यनिष्ठता अशा परोपकारी सद्गुणांचा अंतर्भाव ओसामाजींमध्ये बालपणापासून आढळून येत होता. (संदर्भ : ओसामामाता : लेखक माने गुरुजी. किंमत बारा आणे)

लादेन कुटूंब म्हणजे अरबस्थानातील मालदार कुटुंब. माणदेश, तुंबाड, बनगरवाडीचे खोत तसेच सौदी अरेबियाचे हे महाजन पद तेलसम्राट अब्दुल्लांच्या कृपेने लादेन कुटूंबाकडे होते. पैसा चारी दिशांनी येत होता. परंतु नवतारूण्यात पदार्पण करणाऱ्या ओसामाजींचे हृदय मात्र तिळतिळ तुटत होते. आधी तुर्कस्थानचे हरिभक्तपरायण ऑटोमन घराणे धुळीस मिळाले मग पॅलेस्टाईनचे तुकडे पडले, इकडे पुर्वेला हिंदुस्थानात आधी बंगालची व नंतर हिंदुस्थानची फाळणी होऊन सनातन धर्मीयांच्या लोकसंख्येचे विघटन झाले. त्यात एकाहत्तरच्या दुष्काळाने जनतेची आणखीच दुर्दशा झाली.

अशा प्रसंगी आपल्या घरात लोकांच्या रक्त व अश्रूने माखलेल्या संपत्तीचा ओघ वाहतो आहे ही कल्पना ओसामाजींना व्यथित करू लागली. कुटूंबीयांना याची कल्पना आली असावी म्हणून त्यांनी तरुण ओसामाजींचे लग्न लावून दिले. तरी काही फरक पडेना म्हणून दुसरे लग्न लावून दिले, तरी परिस्थिती जैसे थे म्हणून तिसरे लग्न लावून दिले तरीही ओसामाजी चुप्पच. चौथे लग्न लावून दिले तेव्हा कुठे थोडे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आले.

परंतु या आनंदी वातावरणात विरजण टाकणारी आणि सनातन धर्म व ओसामाजींच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना लवकरच घडली. रशियाने अफगाणिस्तान या शांतताप्रिय देशावर आक्रमण केले. "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू AK47' या अजरामर अभंगाची रचना याच काळातली. आपल्या चार पत्नी व सव्वीस मुलांचा कपर्दिकही विचार न करता ओसामाजींनी आपले कोट्यवधी रूपयांचे साम्राज्य व अर्थात तन, मन व धन पुढील आयुष्य सनातन धर्माची पताका संपूर्ण जगावर फडकविण्यासाठी खर्च करण्याचे ठरविले. त्यांनी अफगाणिस्तानकडे प्रयाण केले. तेथे सर्व संत मंडळींनी ओसामाजींचे मनःपूर्वक स्वागत केले.

अफगाणिस्तान मधील जगभरातुन आलेल्या या सनातनी मेळाव्याचे वर्णन पुढील अभंगात विदित केले आहे -

"अफगाणिस्तान माझा लेकुरवाळा
संगे मुजाहिदीनांचा मेळा
अफगाणिस्तान माझा लेकुरवाळा

गुलबुद्दीन हिकमत्यार हा खांद्यावरी, ओमरचा हात धरी
पुढे चाले ओसामा, मागे अयमान जवाहिरी सुंदर
अफगाणिस्तान माझा लेकुरवाळा..."

आपल्या वाणी आणि लेखणीने समाजात जागृती करणाऱ्या या संतमंडळींनी वेळ येताच सावरकरांचे शब्द प्रमाण मानून लेखण्या मोडून हातात बंदुका घेतल्या व रशियन सावकारांच्या पाशातुन अफगाणिस्तानातील कुणब्यांची मुक्तता केली. (काजू शेट्टींनी या ऐतिहासिक शेतकरी लढ्याचा जरूर अभ्यास करावा व एस. टी. पेटवण्यासारखे कुचकामी मार्ग सोडून द्यावेत) या ऐतिहासिक अशा यशाचे संपूर्ण श्रेय ओसामाजींनी "तर्कतीर्थशास्त्री महामहोपाध्याय धर्मात्मा घुले' यांना दिले. "शेतकऱ्याचा सूड' या पुस्तकातील क्रांतिकारक विचारांनीच आमच्या क्रांतीची दिशा व दशा स्पष्ट केली,' असे प्रतिपादन ओसामाजींनी तेरेसात्ताच्या संपादकांना दिलेल्या एका मुलाखती मध्ये वाचायला मिळते.

अफगाणिस्तान मधील शेतकऱ्याची मुक्तता केल्यावर सनातन धर्माच्या सेवेसाठी पुढील आयुष्य वेचणार असल्याचे ओसामाजींनी जगभरातील संतांच्या गोतसभेमध्ये जाहीर केले. सनातन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी "अल कायदा सनातन संस्था' या संघटनेची स्थापना केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्‍मीर, सीरिया, इराक येथून जास्तीतजास्त दिंड्या चोराच्या आळंदीहुन हेल्मंडतीरी जाणाऱ्या पायी पालखीत सामील व्हाव्यात यासाठी आपले शिष्य शांतीदूत म्हणून जगभरात पाठवले. या सनातनी शांती दुतांनी डिस्कोथेक, बस, रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल यांना टारगेट करुन आपले कार्य शांततामय पद्धतीने सुरू केले

परंतु ........

घात झाला. संपूर्ण जगभर शांतताप्रिय पद्धतीने सनातन धर्माची पताका रोवण्याचा ओसामाजींचा मनसुबा अमेरिकेत बसलेल्या मनुवादी मंबाजी ओबामाला रूचला नाही. हे मनुवादी आधीच मुळ धर्मग्रंथाचे ओसामाजींसारख्या मुलनिवाश्‍याने प्राकृत भाषेत रूपांतर केले म्हणून संतप्त झाले होते. त्यांना या सनातन धर्माच्या शांतीदुतांनी सुरू केलेल्या धर्मप्रसाराने आयतेच कोलीत हातात मिळाले. मंबाजी ओबामाने पैठण येथे धर्मसभा घेऊन सर्व शास्त्री पंडीतांच्या कानावर हा धर्म भ्रष्ट करणारा प्रकार कानी घातला. सर्वानुमते ओसामाने हाती घेतलेले हे कार्य निव्वळ पाखंडीपणा असून ओसामाजींनी आजपर्यंत लिहिलेले सर्व अभंग पाण्यात बुडविण्याची आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस काढली.

ओसामाजींनी या धर्मपंडितांची समजूत काढण्यासाठी दोन विमानं भरून आपले शांतीदूत पैठण येथे पाठविले; परंतु दुर्दैवाने ती दोन्ही विमानं दाट धुक्‍यामुळे पैठण येथील दोन उत्तुंग व्यापार संकुलावर अपघाती आदळल्यामुळे सर्व शांतीदूत वैकुंठवासी झाले.

या हृदयद्रावक बातमीमुळे ओसामाजींच्या कोमल हृदयावर मोठाच आघात झाला. त्यांनी अत्यंत दुःखद अंतकरणाने स्वहस्ते लिहिलेले सर्व अभंग कुणारच्या पात्रात अर्पण करुन अज्ञातवासात प्रयाण केले. अज्ञातवासात रहात असताना कधी मन रमावे म्हणून कंपाऊंड मध्येच लंबी रपेट मारावी, मंबाजी ओबामाच्या डोळ्यात धूळ फेकत सनातन धर्माच्या प्रसारासाठी संत जवाहिरींसहीत सर्व संतांबरोबर बैठका घ्याव्यात, लोककलेला उत्तेजना मिळावी म्हणून सनी ताई लिओने यांचा अभिनय, नृत्य पहावा आदी गोष्टीं मध्ये वेळ घालवु लागले.

या काळातच त्यांनी अनेक अभंगांची रचना केली. त्यातील पुढील अभंग एका गानकोकीळेने स्वरबद्ध केला; जो सर्वतोमुखी लोकप्रिय झाला.

"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे
रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे
मुजाहिदीन सुस्वरे आळविती'

ओसामाजींच्या या जगभरातील लोकप्रियतेमुळे संतप्त होत मंबाजी ओबामाने आपला फास या नरपुंगवाभोवती आणखी आवळला. मंबाजीने आपल्या चेल्याचपाट्यांना गोळा करुन ओसामाजीं विरुध्द "War On Sanatan" हे लष्करी ऑपरेशन पुकारले व अनन्वित अत्याचाराचा एक भयंकर असा कालखंड जगाच्या इतिहासात सुरू झाला.

मंबाजीने अनन्वित हिंसाचाराचा कळस गाठत तैग्रिस, नाईल नदीच्या तिरी हजारो वर्षे वसलेल्या सनातन धर्मियांचा लाखोंच्या संख्येने विनाश केला. संत ओसामाजींनी आश्रय घेतला आहे या संशयावरून हेलमंड, काबूल तीरी रोज स्नानसंध्यादी नित्यकर्म करुन व भिक्षा मागून जगणाऱ्या अफगाण कुणब्यांचा वंशसंहार केला. या सर्व हत्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेल्या आहेत (संदर्भ "आधुनिक जगाचा आधुनिक इतिहास' लेखक : भोगपुरुष वेडेकर किंमत चाराणे)

या सर्व घटनांमुळे व्यथित होऊन ओसामाजींनी आपले ऐहीक अवतारकार्य संपविण्याचा मनोदय जवळच्या व्यक्तींपाशी व्यक्त केला. त्यांना परावृत्त करण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले. ओसामाजींनी प्रायोपवेशन करण्यासाठी आता दिवसभरातून एकदा एक कप दुध व दोन मनुके हाच आहार घेण्यास सुरुवात केली.
_______________

" नारायण , नारायण "

" बोला महर्षी पृथ्वीवर काय हालहवा ? यावर्षी तरी उसाला भाव मिळणार कि नाही ?' स्वतः नारायण ( राणे नव्हे )

" देवा, देवा' महर्षी

"देवा कि अदालत पाच बजने के बाद शुरू होती है कात्या, आत्ताशी दोन वाजलेत, जरातरी आराम करू द्या देवाला' नारायण

"वेळ आणीबाणीची आहे आणि तुम्ही कपिल शर्मासारखे पांचट जोक कसले करताय देवा?' महर्षी

"आणीबाणी? ती तर पंचाहत्तर सालीच उठली ना? मोदींनी आणीबाणीदेखिल लावली काय ? तरी मी ब्रम्हदेवांना म्हणत होतो कमळात बसु नका म्हणून' नारायण

"देवा नारायणा, कितीवेळा सांगितलं ते न्यूज चॅनेल बघत जाऊ नका म्हणून. कधीही आलं कि मोदी, गांधी, भाजपा, कॉंग्रेस हेच विषय सुरू. ते सगळं बाजूला राहू द्या' महर्षी

"बरं ठीक आहे. अठरा तारखेपर्यंत ते सगळं बाजूला. बोला काय एवढी गंभीर परिस्थिती आली आहे?' नारायण

" तो साला....' महर्षी

" दानवे?' महर्षींना मध्येच तोडत नारायण

"दानवे नाही दानव , तो मंबाजी ओबामा... तुमच्या भक्तमेरूमणी जगतगुरु ओसामाजींचे जगणे त्याने मुश्‍किल केले आहे. जगभराचे नागरिकत्व, पासपोर्ट, व्हिजा, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असणारा ओसामा पिंजऱ्यात घातलेल्या वाघाप्रमाणे फक्त कंपाऊंडमध्ये फिरू शकतोय. तुमच्या सनातन धर्माची पताका जगभरात रोवण्याची शपथ घेतलेला तुमचा भक्त प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या करतोय नारायणा, आहात कुठे?' महर्षी

"काय सांगताय काय? एका पण न्युज वाल्याने हे आमच्या पर्यंत पोहचवलंच नाही; तर आम्हाला तरी कसे कळणार? पत्रकार विकले गेले आहेत हे म्हणतात ते खोटे नाही' नारायण

"देवा , ओसामाजींचा मृत्यू असा आत्महत्या करुन झाला तर ती संपुर्ण सनातन धर्मावर आलेली मोठी नामुष्की असेल. आपल्या भक्तांचे रक्षण करणारे म्हणून तुमचा त्रिखंडात महिमा आहे. त्याला काळिमा फासला जाईल' महर्षी

"आमच्या नावाला काळीमा फासणे म्हणजे "असंतांचे संत' लिहून माफी मागण्याइतके सोपे आहे असे तुम्हाला वाटले काय महर्षी? रावण विश्वेश्वरय्या मडावी सारख्या दशग्रंथी मनुवाद्याचा हा हा म्हणता वध करणारा मी, माझ्या भक्ताला असे वाऱ्यावर सोडून देइन काय?' नारायण

"म्हणजे? आता तुम्ही काय करणार नारायणा?' महर्षी

"काय करणार म्हणजे, क्षीरसागरातील निष्णात असे माझे दहा नेव्ही सिल पुष्पक विमानात घेऊन जाणार आणि रात्रीच्या अंधारात सर्व रडार चुकवत माझ्या प्राणप्रिय भक्ताचे सदेह वैकुंठगमन करणार. अहो, आहे काय आणि नाही काय त्यात?,' नारायण

"वाह देवा देवा वाह, बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल...' महर्षी

पुढे काय घडले ते तुम्हाला माहितच आहे.
______________

भविष्यकाळात वाचाव्या लागणाऱ्या आधुनिक इतिहासाची समाप्ति ओसामाजींच्याच एका अभंगाने करुन आजच्या कीर्तनाची समाप्ति करतो.

"ओसामाच्या मुखात | फुटला हुंदका | इतुके धुंद का | माझे जिहादी ||

हाती घेउनीया | ओसामाची गाथा | म ारिती हे गोळ्या | स्वकुळासी ||

हिदीन झाले | सालो नी मंबाजी | आली गोत्यामाजी | लाज ||

झाले हे सामील | काफीरांच्या गोता | जाउ कुठे आता | सांगा मज ||

- तुषार दामगुडे
ह.भ.प. ( पक्षी : हळूच भजी पळविणार )

ता.क. : सदर लेखकाला इतिहासाच्या पुनर्लेखनाबद्दल नुकताच आंतरराष्ट्रीय दर्जाचा "चिंचपोकळी भुषण" पुरस्कार मिळाला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tushar damgude writes about osama bin laden