घरात टीव्ही हवा की नको?

शिवराज गोर्ले
Monday, 8 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..

बालक-पालक

खरंतर टीव्ही हा आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि तरीही घराघरांतील पालकांपुढे प्रश्‍न आहेत, मुलांना टीव्ही पाहू द्यावा की नाही? पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा? त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं? आणि ते जर ठेवता येत नसेल तर घरातच टीव्ही असावा की नाही?

आसपासच्याच नव्हे, जगभरातल्या घराघरांत टीव्ही पोचत असताना शेकडो चॅनेल्स अखंड सेवा पुरवीत असताना आपल्या घरात टीव्ही नको हा विचार आणि निर्णय सोपा निश्‍चित नाही. मुलांना अजिबात टीव्ही बघू न देणं, त्यांना आवडतात ती कार्टून्स बघण्याचा आनंदही नाकारणं, हे कितपत योग्य ठरेल?

तसं करणं खरंच आवश्‍यक आहे काय?

अर्थात हे ही खरं बहुतेक बालमानसतज्ज्ञ, समुपदेशक ‘मुलांचं भलं हवं असेल तर टीव्ही नकोच’ असा सल्ला देत आहेत. घरात टीव्ही असताना मुलं तो पाहिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे घरातच टीव्ही नको हा निर्णय घ्यायचा तर पालकांनीही टीव्ही बघायचा नाही हाच त्याचा अर्थ होतो. पण त्याचाच अर्थ असा होतो की भारत-ऑस्ट्रेलिया वन डे मॅचेस बघायच्या नाहीत.. आयपीएल स्पर्धा पाहायची नाही.. ऑलिंपिक, विम्बल्डन स्पर्धांपासूनही वंचित राहायचं.. वेगवेगळे रिॲलिटी शोज पाहायचे नाहीत.. घरबसल्या चित्रपट पाहायचे नाहीत, फार काय, रोजच्या बातम्याही पाहायच्या नाहीत! टीव्ही नाही म्हणजे नाही! मुलांसाठी नाही, तसा पालकांसाठीही नाही हे स्वीकारणं सोपं नाहीय.. पण काही पालकांनी ते स्वीकारलं आहे. शक्‍य करून दाखवलं आहे. अगदी आजच्या काळातही पुण्या-मुंबईसारख्या शहरांत काही सुशिक्षित, संपन्न घरातील (मोजक्‍या) पालकांनी मुलं मोठी होईपर्यंत घरात टीव्ही न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

अशा निर्णयापर्यंत काही पालक का आले आहेत? ते समजण्यासाठी अर्थातच टीव्ही पाहण्यामुळे नेमके काय काय परिणाम होत आहेत हे समजून घ्यावं लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV in the house yes or no