

- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com
'ट्वेल्व्ह फेल’ हा चित्रपट गेल्या काही दिवसात चांगलाच गाजला, यातलं मुख्य पात्र जेव्हा मुलाखतीसाठी जातं, तेव्हा त्याच्या तोंडी एक संवाद दाखवला आहे, की कॉपी करतो म्हणजे आम्ही काही चूक करतोय हे आम्हाला तेव्हा माहितीच नव्हतं. आमचे मास्तरच आम्हाला कॉपी करायला मदत करायचे.
हा संवाद आजच्या शैक्षणिक परिस्थितीची दाहकता जाणवून देणारा संवाद आहे. ‘ट्वेल्व्ह फेल’ ही तर एका यशस्वी आयएएस अधिकाऱ्याची कथा आहे. ज्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक कळला आणि तो मोठा सरकारी अधिकारी झाला, पण आज वास्तव हे आहे की योग्य आणि अयोग्य यातील फरक न कळणारे जत्थेच्या जत्थे, आता आपल्या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडत आहेत आणि मोठ्या शहरातल्या काचेच्या इमारती आणि रात्रीच्या रोषणाईला भुलून पुण्या-मुंबईसारख्या शहरांवर रोजच्या रोज जाऊन आदळत आहेत.
सध्याची शिक्षण पद्धती वाईट नक्कीच नाहीय पण नैतिकतेच्या कवच कुंडलांशिवाय आणि आर्थिक घोटाळ्यांशी लढायला लागणाऱ्या शस्त्रांस्त्रांशिवाय ही मंडळी नोकरीधंद्याच्या लढाईत उतरत आहेत. अशा परिस्थितीत ते तरी घोटाळ्याची शिकार होऊन जातात किंवा कळत नकळत एखाद्या आर्थिक षडयंत्राचा भाग होऊन बसतात.
जगात कोणीच कोणाला फुकट काहीच देत नाही, नोकरीसाठी नियोक्त्याला पैसे द्यायला लागत नाहीत किंवा पैसे बॅंकेतून घेण्यासाठी ओटीपी द्यावा लागत नाही, या काही मूलभूत आर्थिक साक्षरतेच्या गोष्टी आहेत पण या गोष्टी अभ्यासक्रमात शिकवल्या जात नाहीत. आज अनेक तरुण विविध आर्थिक घोटाळ्यांची शिकार होताना दिसत आहेत. आम्ही या सदरातून लिहायला लागल्यापासून किमान शंभर जणांनी तरी आम्हाला त्यांना कशा पद्धतीनं फसवलं याची माहिती दिली.
केवळ महाराष्ट्रात इतक्या वेगळ्या वेगळ्या योजना असतात, की कोणत्याही एका माणसाला अथवा सरकारी संस्थेला त्याची पूर्ण माहिती असणं शक्य नसतं. कोणी वर्षभरात दामदुप्पट करून देतो तर कोणी दोन वर्षांत, कोणी कडकनाथ कोंबडी विकतो तर कोणी इव्ही चार्जिंग स्टेशन. गेल्या काही महिन्यांत भारतात ऑनलाइन घोटाळ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. करिअरमध्ये काही कारणानं ब्रेक घेतलेल्या लोकांना हेरून वर्क फ्रॉम होम किंवा टास्क घोटाळ्यांचा भाग बनवलं जातं.
रजिस्ट्रेशनच्या पहिल्या पायरीपासून ते कामाच्या नावाखाली छोटे छोटे टास्क देऊन मध्येच काही रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंट्समध्ये वेगवेगळ्या प्रसंगी भरायची मागणी होते, तुमच्याच नावाचं व्हर्च्युअल बँक अकाउंट उघडून तिथेच ही रक्कम जमा होतीय असंही दाखवलं जातं, पैसे काढून घ्यायची वेळ आली, की तुमच्या अकाउंटमधल्या पैशांवर टॅक्स आलाय.
तो भरला की प्रॉब्लेम मिटून जाईल आणि पैसे काढता येतील सांगितलं जातं, या टप्प्यावर संशय यायला सुरुवात होऊन सुद्धा लोकांना काहीच करता येत नाही कारण हे गुन्हेगार कुठं आहेत, आपले पैसे कुठं गेलेत या प्रश्नांच्या पलीकडं ही गोष्ट गेलेली असते.
भारतातून इंडियात (देशाचा ग्रामीण भाग म्हणजे भारत आणि महानगरांचा व शहरी भाग म्हणजे इंडिया हे इथं लक्षात घेतलं पाहिजे.) प्रवेश करू इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक कारस्थानाचा भाग करून घेण्यासाठी चढाओढ चालू आहे. दिवाळखोरीकडं वाटचाल करणाऱ्या बायजूज कंपनीचं उदाहरण या बाबतीत फार बोलकं आहे.
शिक्षण पद्धतीतले कच्चे दुवे हेरून ते अवघी शिक्षण पद्धतीच बदलायला निघालेल्या या कंपनीनं पालकांना आकर्षित करायला एक मोठी विक्रेत्यांची फौज उभी केली होती. नैतिकता आणि आर्थिक घोटाळे यांची काहीच माहिती नसलेले अनेक तरुण चांगला पगार मिळेल, विक्रीवर इन्सेन्टिव्ह मिळेल म्हणून या कंपनीत रुजू झाले.
याच मंडळींनी पालकांना हे पटवून द्यायला सुरुवात केली की तुमचा पाल्य कसा ‘ढ’ आहे, त्याचं भविष्य कसं अवघड आहे आणि त्याला इंडियात जायचं असेल, तर अभ्यास करायची कशी गरज आहे आणि त्याला कोणतीही शिक्षण पद्धती हुशार बनवू शकत नाही. त्याला फक्त बायजूजच वाचवू शकेल कारण आमच्याकडे एक जादूची कांडी आहे, त्याचं नाव आहे टॅब. हा विकत घेतला की तुमचा पाल्य एकदम हुशार बनणार, नावारूपाला येणार आहे. आणि आज कोणत्या पालकांना आपला पाल्य यशस्वी व्हायला नकोय?
भारतातल्या पालकांच्या भावनेला अशाप्रकारे साद घातली गेली आणि अनेक लोकांनी या बायजूजचे टॅब कर्ज काढून काढून विकत घेतले. पाल्य तर कधी हुशार झालाच नाही पण ज्या मंडळींनी हे पालक गळाला लावले त्यांच्या वाटेला पण अवहेलनाच आली, यातल्या काही मंडळींना कंपनीनं काढून टाकले, काहींचे पगार दिले नाहीत तर काही जणांच्या मागं चौकशीचा ससेमिरा लागला. अशा प्रकारची अनेक आर्थिक कारस्थानं आपल्या आजूबाजूला चालू असतात. भारतात घडलेल्या कोणत्याही मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अशी अनेक उदाहरणं सापडतात.
सध्या इंडियाचा दबदबा जगभर वाढतोय. इंडियाला भुलून केवळ भारतातलीच मंडळी फसतात असं नाही तर परदेशात राहणारे भारतीय देखील आकर्षित होतात. काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या घोटाळ्यातली एक गोष्ट आहे. एक उच्चशिक्षित सीए अमेरिकेला शिकायला गेला होता, एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करायचा पण देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून परतला.
एका खूप मोठ्या आयटी कंपनीत नोकरी करायला लागला, कंपनी नोंदणीकृत होती आणि नोकरी कसली तर प्रवर्तकांच्या कुटुंबातील मंडळींचे समभाग आणि त्यातील व्यवहार याचं व्यवस्थापन करायचं. यात खरं चूक काहीच नव्हतं पण त्यासाठी हा नवीन नवीन कंपन्या चालू करायचा, पहिले त्या कंपन्या प्रवर्तकाच्या नातेवाइकांच्या नावाने असायच्या नंतर हळूहळू या तरुणाचं नाव संचालक म्हणून येऊ लागलं.
या सगळ्या कंपन्या शेल होत्या, एक दिवस फुगा फुटला, कंपनीचा प्रवर्तक जाऊन पोलिसांकडं स्वतःहून स्वाधीन झाला आणि इन्सायडर ट्रेडिंग, अकाउंटिंग फ्रॉड अशा सगळ्या कुकृत्यांची माहिती स्वतःच दिली मग सरकारी एजन्सीच्या चौकशीत या तरुणाचं नाव देखील आलं, तो संचालक होता इन्सायडर ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्यांचा - त्यामुळं साहजिकच त्याला अटक केली गेली.
तो या षडयंत्राचा भाग कसा बनत गेला, त्याला कधी कळलंच नाही. अशी अनेक उदाहरणं रोज आजूबाजूला दिसायला लागली आहेत. मित्रांनो, भारतातून इंडियामध्ये नक्की जा पण आपला विवेक जागा असू द्या. कष्टाला पर्याय नसतो हे कायम लक्षात राहू द्या.
(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटीमनी लँडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.