सजग हिमप्रहरींची कहाणी

उदय हर्डीकर
रविवार, 29 एप्रिल 2018

त्या भागाची उंची आहे सरासरी सहा हजार मीटर (19,700 फूट). पारा असतो उणे 20 ते 55 अंश सेल्सिअस. सर्वत्र शुभ्र बर्फाचं साम्राज्य पसरलेलं असतं. विलक्षण एकांत आणि अतिउंचीच्या या परिसरात भर पडते वेगवान वाऱ्याची. समोर असतात दोन शत्रू. एक मानवी असतो, त्याच्याबरोबर मुकाबला करता येतो; पण लहरी आणि बलवान निसर्गाबरोबर सामना करण्याला मर्यादा असतात. कधी त्याची लहर सांभाळत, तर कधी त्याला आव्हान देत टिकून राहावं लागतं. अशा वातावरणात जाण्याचं सोडाच; पण तसा विचार करणंही आपल्याला शक्‍य नाही. मात्र, इथंही माणसं राहतात.

त्या भागाची उंची आहे सरासरी सहा हजार मीटर (19,700 फूट). पारा असतो उणे 20 ते 55 अंश सेल्सिअस. सर्वत्र शुभ्र बर्फाचं साम्राज्य पसरलेलं असतं. विलक्षण एकांत आणि अतिउंचीच्या या परिसरात भर पडते वेगवान वाऱ्याची. समोर असतात दोन शत्रू. एक मानवी असतो, त्याच्याबरोबर मुकाबला करता येतो; पण लहरी आणि बलवान निसर्गाबरोबर सामना करण्याला मर्यादा असतात. कधी त्याची लहर सांभाळत, तर कधी त्याला आव्हान देत टिकून राहावं लागतं. अशा वातावरणात जाण्याचं सोडाच; पण तसा विचार करणंही आपल्याला शक्‍य नाही. मात्र, इथंही माणसं राहतात. ही माणसं साधीसुधी नसतात, तर कडक शिस्तीत तावूनसुलाखून निघालेली, आपल्या वरिष्ठांच्या आज्ञांचं पालन करणारी आणि भारतमातेसाठी प्राणार्पणही करणारी...

हे असतात लष्कराचे जवान. "जगातली सर्वांत उंच युद्धभूमी' असा उल्लेख केल्या जाणाऱ्या सियाचिनमधील ही स्थिती आहे. सियाचिननं कायमच कुतूहल निर्माण केलं आहे. मानवी वसाहतीला सर्वस्वी अयोग्य असलेल्या या प्रदेशात आपली पाकिस्तानबरोबरची सरहद्द आहे आणि सरहद्द म्हटल्यावर तिच्या रक्षणाची जबाबदारी आलीच. हे काम आपले जवान करतात. त्यांना मोलाची मदत असते हवाई दलाची, त्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमानांची. "सफारी' या गुजराती मासिकाचे संपादक हर्षल पुष्कर्णा यांनी लिहिलेलं "हे आहे सिआचेन' हे पुस्तक (मूळ गुजराती पुस्तक आ छे सिआचेन) आपल्याला सियाचिनच्या खडतर आणि आव्हान देणाऱ्या भूमीत घेऊन जातं. संजय बच्छाव यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. स्वत: पुष्कर्णा यांनी सियाचिन बेसकॅम्पला जाऊन हे पुस्तक लिहिलं असल्यामुळं त्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली आहे.

सियाचिन हे जगातलं सर्वांत आव्हानात्मक युद्धक्षेत्र म्हणावं लागेल. सियाचिन हिमनदी सुमारे 5500 ते 6400 मीटर (18 हजार ते 21 हजार फूट) उंचावर आहे. सियाचिनचं हवामान जीवघेणं आहे. हिवाळ्यात इथलं तापमान उणे 55 अंशांपर्यंत जातं, तर उन्हाळ्यात ते शून्याखाली 20 ते 30 अंशांवर असतं. यापेक्षाही धोकादायक आहे ती अतिउंचीवरची विरळ हवा. या हवेत पुरेसा प्राणवायू नसतो. दीर्घकाळानंतर मेंदू आणि फुफ्फुसांमध्ये पाणी होऊ लागतं. याशिवाय हिमदंशाचा धोकाही असतोच. त्यावर वेळेत उपचार न झाल्यास, संबंधित अवयव गमावण्याची वेळ येते. अशा घटना घडतही असतात. हे सगळे धोके असूनही आपले निधड्या छातीचे जवान आणि त्यांचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी या बर्फाळ एकांतात आपलं कर्तव्य बजावत असतात...
अतिखडतर असलेल्या या प्रदेशात सर्वांना जाणं शक्‍यच नसतं. कारण सियाचिनमध्ये जायचं असेल, तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शंभर टक्के नव्हे, त्यापेक्षाही जास्त तंदुरस्त असावे लागता. आधी बेस कॅम्पवर खडतर प्रशिक्षण आणि नंतर ठाण्याकडे (पोस्ट) वाटचाल असं करावं लागतं. प्रशिक्षण अर्थातच कडक, तुमची कसोटी पाहणारं असतं आणि त्यात सूट नसते. पोस्टवरचा कालावधी खूप मोठा नसला, तरी काही वेळा ठाण्यावर बदली होऊन येणारे जवान वेळेत पोचू न शकणं, हवामान खराब होणं वगैरे अडचणी येऊ शकतात. पोस्ट तर मोकळी ठेवणं शक्‍य नसतं. मग दुसरे जवान येईपर्यंत आधीच्यांना तिथंच राहावं लागतं. अत्यंत प्रतिकूल वातावरणात मानसिक स्वस्थ्य टिकवणं ही फार मोठी कसोटी असते.

हर्षल पुष्कर्णा यांनी हे सगळे बारकावे पुस्तकात अत्यंत खुबीनं टिपले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचा पाकिस्तानबरोबर काश्‍मीरवरून लगेच संघर्ष झाला. सियाचिनवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न तेव्हापासून सुरू आहे; पण कर्नल नरिंदरकुमार यांच्या सजगतेमुळं पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न फसला आणि तेव्हापासून भारताचे जवान डोळ्यांत तेल घालून सियाचिनवर आहेत. सियाचिनला जायचं, तर शारीरिक तंदुरुस्ती कमालीची असावी लागते. त्यासाठी पुष्कर्णा यांनी प्रथम केला चादर ट्रेक. लडाखमधील झंस्कार नदीच्या खोऱ्यातून जाणार हा ट्रेक शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा आहेच. हा ट्रेक त्यांनी केला. नंतर अतिउंचीच्या सरावासाठी त्यांनी निवडलं लडाखमधलंच स्तोक कांगडी हे शिखर. या शिखराची उंची आहे 6153 मीटर किंवा 20 हजार 187 फूट. या शिखराकडे जाताना "साउथ फेस' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भिंतीचं आव्हान होतं; पण महंमद जुमा नावाच्या स्थानिक गाइडच्या मदतीनं पुष्कर्णा यांनी या शिखरावरही पाऊल ठेवलं. आता ते सियाचिन बेस कॅम्पला जायला तयार होते.

या पुस्तकात पुष्कर्णा यांनी सियाचिनचं बहारदार वर्णन केलं आहे. अतिउंचीवर असलेल्या आपल्या चौक्‍यांना अन्नापासून रॉकेलपर्यंतचा पुरवठा तळातून करावा लागतो. त्यासाठी हेलिकॉप्टरची मदत होते; पण अतिवेगवान वारे आणि खराब हवामान असलं, तर वाटही पाहावी लागते. मुळात या प्रदेशात हेलिकॉप्टर किंवा विमानं उडणं हेच मोठं आव्हान असतं; पण आपले शूर वैमानिक रोजच हे आव्हान पेलतात. पोर्टरची मदतही मोलाची ठरते. सियाचिनच्या शिखरांवरील चौक्‍या सतत धोक्‍याच्या छायेत असतात. कधी हिमकडा कोसळेल किंवा कधी जमीन सरकेल, याचा नेम नसतो; पण आपले जवान आणि अधिकारी निडरपणानं या सगळ्याला तोंड देत असतात. कधी खोल हिमखाईत जवान कोसळतात. भाग्यवान असेल, तर त्याला बाहेर काढण्यात यश येतं- अन्यथा त्याचा मृतदेहच बाहेर काढावा लागतो. पाणावल्या डोळ्यांनी आपल्या सहकाऱ्याला कायमचा निरोप देणारे हे जवान तरीही कर्तव्यात कसूर करत नाहीत. पुष्कर्णा यांनी सगळ्यांची नोंद घेतली आहे.

संजय बच्छाव यांनी पुस्तकाचा अनुवाद सरस केला आहे. जागोजागी उत्तम छायाचित्रं, पूरक माहिती त्यांनी दिली आहे. सियाचिनला जाणं आपल्याला शक्‍य नाही; पण या पुस्तकाच्या रूपानं आपण तिथलं खडतर आयुष्य आणि जवानांचं असामान्य धैर्य याचा अनुभव घेऊ शकतो. या पुस्तकाच्या रूपानं मराठी वाचकांना सियाचिनची माहिती मिळते हे पुस्तकाचं यश आहे.

पुस्तकाचं नाव : हे आहे सिआचेन
- लेखक : हर्षल पुष्कर्णा
अनुवाद : संजय बच्छाव
- प्रकाशक : युरेनस बुक्‍स, अहमदाबाद
- पृष्ठं : 230/ मूल्य : 450 रुपये.

Web Title: uday hardikar write book review in saptarang