एकाकी बेटांची अद्भुत सफर... (उदय हर्डीकर)

book review
book review

प्रवासाचा मूळ हेतू असतो नेहमीच्या वातावरणापासून दूर जाणं, रोजच्या आयुष्यात थोडा बदल करणं. अर्थात, त्यापलीकडेही प्रवास असू शकतो. कामानिमित्तचे दौरे, शिक्षणासाठीचा प्रवास आदी; पण खरा हेतू असतो तो बदलाचा. सध्या निसर्गपर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. रोजच्या कृत्रिम जगण्याला कंटाळलेली माणसं निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास उत्सुक होऊ लागली आहेत; पण निसर्गपर्यटन म्हणजे केवळ वाघ-हरणं नव्हेत. ते त्यापेक्षाही खूप व्यापक स्वरूपाचं आहे. निसर्ग म्हणजे केवळ घनदाट जंगल आणि दऱ्या-खोरी, पाण्याचे प्रवाहही नव्हेत. रूक्ष भासणारं निष्पर्ण वाळवंटही निसर्गाचाच भाग आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळांना भेटी देणं, मौज-मजा करणं वेगळे आणि जरा हट के स्थळांना जाणं फारच वेगळं. नेहमीच्या ठिकाणी काही वेगळं नसतं. वातावरणातला बदल एवढाच फरक. बाकी सारं तेच ते आणि तेच ते; पण हट के असलेली ठिकाणं वेगळी असतात. तिथं पर्यटकांवर बरेच निर्बंध असतात. तिथं मनमौजीपणे वागता येत नाही. त्यातही ते स्थळ पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असेल, तर मग नियम जास्त कडक होतात. मात्र, असं असलं तरी या जागी जाण्याचा आनंद वेगळाच. अम्लान निसर्गाच्या सहवासात राहणं आणि तिथली निरीक्षणं करणं हा फार मोलाचा अनुभव ठरतो.

आपल्या पृथ्वीवर अशी एक जागा अद्याप आहे. ती आहेत गालापागोस बेटं. आर्किपेलागो डी कोलोन म्हणजे कोलंबस द्वीपसमूह. "गालापागोस' हे नावच मोठं अर्थवाही आहे. त्याचा अर्थ होतो मोठं कासव. ही बेटं पृथ्वीवरची सर्वांत तरुण बेटं आहेत (निर्मिती 40 लाख वर्षांपूर्वी). अथांग, अफाट पसरलेल्या प्रशांत महासागरातील या एकाकी बेटांवरची जीवसृष्टी वेगळी, तिथला निसर्ग वेगळा, तिथलं पर्यावरण वेगळं. एकूण काय, तर सारं काही वेगळं आणि भारीच. जगापासून दूरवर असलेल्या या बेटांना भेट देण्याचं भाग्य फार थोड्यांच्या वाट्याला येत असेल. भारतातून तर फार कमी पर्यटक तिकडं जात असावेत. डॉ. संदीप श्रोत्री यांनी मात्र या बेटांचा अतिदूरचा प्रवास उत्साहानं केला आणि त्यावर आधारित "कासवांचे बेट': "गालापागोस' बेटांची अद्भुत सफर हे सुरेख पुस्तक लिहिलं गालापागोस बेटांचं महत्त्व केवळ वेगळेपणासाठी नाही. उत्क्रांतिवादाचे जनक मानल्या जाणाऱ्या चार्ल्स डार्विन यांनी या बेटांना प्रख्यात "बिगल' जहाजातून भेट दिली तेव्हा तिथली अद्भुत जीवसृष्टी पाहून ते चकित झाले. "ओरिजिन ऑफ स्पेसिज्‌' या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाची कल्पना त्यांना इथंच सुचल्याचं मानलं जातं. गालापागोस प्रसिद्ध आहेत ती महाकाय कासवांसाठी आणि इग्वाना सरड्यांसाठी. हे सरडे फक्त इथंच आढळतात. शिवाय वरून लाल आणि खालून निळा असलेला "सॅली लाईटफूट' हा खेकडा, 500-600 जातींच्या वनस्पती, 181 प्रकारच्या पक्षी-प्रजाती (त्यातल्या 55 स्थानिक), दोन जातींचे पाणसिंह (सी-लायन), दोन जातींची वटवाघळं, चार जातींचे उंदीर, तसंच देवमासे, डॉल्फिन या प्राण्यांमुळे ही बेटं समृद्ध झाली आहेत. दीर्घायुषी असलेली कासवं आजही या बेटांवर सुखेनैव नांदत असून, त्यातल्या काहींनी चार्ल्स डार्विन यांनाही पाहिलं आहे! या बेटांचा शोध लागला तो सन 1532 मध्ये. पनामाचा बिशप थॉमस बारलेंगा प्रथम इथं आला तेव्हा प्रथम ही बेटं जगाच्या नकाशावर आली. दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर या देशाच्या मालकीची ही बेटं असून, निसर्गाच्या संरक्षण-संवर्धनासाठी या बेटांचा तब्बल 97 टक्के भाग राखीव आहे. ही बेटं जगापासून दूर, एकाकी असल्यामुळे तिथला निसर्ग आणि प्राणी एकमेव आहेत. या साखळीत कोणतीही ढवळाढवळ होऊ नये, यासाठी तिथं पर्यटकांवर खूप निर्बंध आहेत. तसं न केल्यास या बेटांवरची निसर्गाची साखळी बिघडू शकते. खुद्द गालोपागोस समूहातल्या बेटांवरची जीवसृष्टीसुद्धा एका बेटापेक्षा दुसऱ्या बेटावर वेगळी आहे. स्थानिक स्थितीनुसार, तिथल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती उत्क्रांत झाल्या आहेत. यासंदर्भात डॉ. श्रोत्री पक्ष्यांच्या चोचींची आणि कासवांच्या पाठीवरच्या कवचांची (ढाल) उदाहरणं देतात. पक्षी-प्रजाती एकच असली तरी अन्न आणि स्थितीच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या चोचींच्या रचना बदलल्या आहेत. "डार्विनच्या चिमण्या' म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिमण्यांची त्यांनी छायाचित्रांसह उदाहरणं दाखवली आहेत.

गालापागोसचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाकाय कासवं. सात-आठ फुटांची ही प्रचंड कासवं दीर्घायुषी असतात. सुरवातीच्या काळात मांसासाठी त्यांची बेफाम कत्तल झाली. या बेटांवर 14 जातींची कासवं होती, आता दहाच जाती उरल्या आहेत. या कासवांची कत्तल किती झाली असावी? 19 व्या शतकाच्या प्रारंभी त्यांची संख्या तीन लाख होती; पण शिकारीमुळे ती तीन हजारांवर आली! या बेटांवरचा निसर्ग वाचवण्याचे प्रयत्न गेल्या 100 वर्षांत खरे सुरू झाले आहेत आणि आता त्यांना यश येऊ लागलं आहे.

गालापागोसचे पक्षीविश्वही वेगळंच आहे. "फ्रिगेट' आणि "बूबी' हे दोन पक्षी त्याची उदाहरणं. "फ्रिगेट'मध्ये निळ्या आणि लाल पायांचे पक्षी आढळतात. त्यांची नावं अर्थपूर्ण आहेत. "फ्रिगेट' म्हणजे चोर. दुसऱ्या पक्ष्यांनी मेहनतीनं मिळवलेल्या भक्ष्यावर डल्ला मारून ते पळवण्याच्या सवयीमुळे या पक्ष्यांना हे "बिरुद' लावण्यात आलं आहे! मात्र, हा दिसायला मोठा देखणा पक्षी आहे. त्याच्या गळ्यापाशी लालभडक रंगाचा फुगा असतो. माद्यांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा पक्षी आहे "बूबी', म्हणजे मूर्ख! माणसांच्या कितीही जवळ हा पक्षी येत असल्यामुळे त्याला हे नाव पडलं! पेंग्विन फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळत नाहीत, तर रूक्ष गालापागोस बेटांवरही ते आहेत. हे आहेत गालापागोस पेंग्विन. शिवाय रात्री शिकार करणारा एकमेव कुरय ऊर्फ लाव्हा गल, चेहऱ्यावर बुरखा घेतल्याप्रमाणे दिसणारा "मास्क्‍ड्‌ बूबी', नावापुरतेच पंख असलेला; पण उडू न शकणारा पाणकावळा (फ्लाइटलेस कॉर्मोरंट), तपकिरी पाणकोळी ऊर्फ झोळीवाला (ब्राउन पेलिकन) आणि देखण्या लाल रंगाचे कॅरेबियन फ्लेमिंगो अर्थात रोहित हे पक्षीही या बेटांवर आहेत.

हे सगळं पुस्तक वाचण्यासारखं आहे आणि देखण्या छायाचित्रांमुळे पाहण्यासारखंही अर्थातच आहे. या पुस्तकात डॉ. श्रोत्री यांनी भरपूर छायाचित्रांबरोबरच नकाशे आणि रेखाटनंही दिल्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय झालं आहे. परिशिष्टांमध्ये बेटांची माहिती, तिथं काय करावं यापेक्षा काय करू नये, याची माहिती असल्यामुळे गालापागोसबाबतचं कुतूहल शमू शकतं. पुस्तकाची निर्मिती राजहंस प्रकाशनाच्या परंपरेला साजेशी उत्तम आहे. या अद्भुत बेटांवर जाणं प्रत्येकालाच शक्‍य नाही; पण किमान या पुस्तकाच्या माध्यमातून या बेटाला भेट देणं मात्र सहज शक्‍य आहे. माफक मूल्य हेही या पुस्तकाचं वैशिष्ट्य. निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि काही वेगळं वाचू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक आवश्‍यकच.

- पुस्तकाचं नाव : कासवांचे बेट "गालापागोस' बेटांची अद्भुत सफर
- लेखक : डॉ. संदीप श्रोत्री
- प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (फोन : 020 - 24473459)
- पृष्ठं : 100 मूल्य : 180 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com