‘ओटीटी ’ला पर्याय नाही

उदय कुलकर्णी udaykd@gmail.com
Sunday, 24 January 2021

विरुपेरी
हे नवं वर्षं म्हणजे जगात सार्वजनिक पातळीवर चित्रपटप्रदर्शन सुरू झाल्याच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानंतरचं वर्ष, तर ‘इफ्फी’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चं ५१ वं वर्ष. असा हा आगळा योग असताना सगळं कसं धूमधडाक्यात होणार असं वाटत असतानाच सन २०२० नं मोठाच तडाखा दिला.

हे नवं वर्षं म्हणजे जगात सार्वजनिक पातळीवर चित्रपटप्रदर्शन सुरू झाल्याच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानंतरचं वर्ष, तर ‘इफ्फी’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चं ५१ वं वर्ष. असा हा आगळा योग असताना सगळं कसं धूमधडाक्यात होणार असं वाटत असतानाच सन २०२० नं मोठाच तडाखा दिला. सार्वजनिक चित्रपटप्रदर्शनाची सव्वाशे वर्षांची परंपरा कायमचीच खंडित होते की काय अशी स्थिती कोरोनामुळं जगभर निर्माण झाली. नोव्हेंबर २०२० नंतर भारतात कोरोनाला थोडासा उतार पडला आणि त्यामुळं गोव्यात ‘इफ्फी’च्या आयोजनाचा (ता. १४ ते १९ जानेवारी) मुहूर्त ठरला. मुहूर्त ठरला तरी जानेवारी महिन्याच्या मध्यावर कोरोनाचं स्वरूप नेमकं कसं आणि किती प्रमाणात असेल याचा अंदाज नव्हता आणि त्यामुळं गोव्यातल्या महोत्सवाला प्रत्यक्ष किती प्रतिनिधी उपस्थित राहतील याविषयीही केवळ अंदाज बांधणं सुरू होतं. नाइलाजानं मधला मार्ग म्हणून ‘इफ्फी’ ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी घेण्याचा विचार झाला. त्याला किती आणि कसा प्रतिसाद मिळाला हे आता आपल्यासमोर आलं आहे.

जगभरातलं चित्रपटप्रदर्शन सुरू होऊन सव्वाशे वर्षं झाली. त्या कालावधीत सिनेमाची वाटचाल कशी झाली आणि त्यात भारत नेमका कुठं आहे हेही आता तपासून पाहायला हवं. तर सुरुवात सार्वजनिक चित्रपटप्रदर्शन कसं सुरू झालं इथूनच करू या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ता. २८ डिसेंबर १८९५
पॅरिसमधल्या ‘द ग्रॅंड कॅफे’मध्ये ल्युमिए बंधूंनी ‘सिनेमॅटोग्राफ’ या स्वत:च विकसित केलेल्या उपकरणाचा उपयोग करत, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्याया कामगारांचं चित्रीकरण मोठ्या पडद्यावर लोकांना दाखवलं. ही हलती चित्रं पाहून लोक थक्क झाले. मार्च १८९५ मध्ये आपल्याच कारखान्यातल्या एका बैठकीसाठी जमलेले कामगार बाहेर पडतानाची दृश्यं ल्युमिए बंधूंनी चित्रित केली होती. खासगी स्वरूपात हे चित्रीकरण त्यांनी अनेकांना दाखवलंही होतं; पण या व इतर चित्रीकरणाचे पैसे घेऊन जाहीरपणे प्रदर्शन ता. २८ डिसेंबर १८९५ ला पहिल्यांदा करण्यात आलं. यामुळेच हा दिवस म्हणजे जगातल्या चित्रपटप्रदर्शनाच्या परंपरेचा जन्मदिवस मानण्यात येतो. याचाच अर्थ असा की जगातील चित्रपटांच्या प्रदर्शनाची परंपरा सव्वाशे वर्षांची झाली आहे. 

सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

फ्रान्समधील लुईस व ऑगस्ट ल्युमिए या बंधूंचे वडील अंतोन हे मूळचे पोर्ट्रेट्स करणारे चित्रकार; पण काळाच्या ओघात ते फोटोग्राफीकडं वळले. त्या काळी फिल्म डेव्हलप करायला प्लेट्स वापराव्या लागत. अंतोन यांनी हळूहळू त्या प्लेट्सचं उत्पादनही सुरू केलं. वडिलांना त्यांच्या कामात मदत करता करता अवघ्या सतरा वर्षांच्या लुईसनं फिल्म डेव्हलप करण्यासाठी नवं ‘ड्राय प्लेट’ तंत्र शोधलं. या तंत्रामुळं ल्युमिए यांचा फोटोसाठी प्लेट्स बनवण्याचा कारखाना एकदम भरभराटीला आला. सन १८९४ मध्ये तर या कारखान्यात तब्बल पंधरा दशलक्ष प्लेट्सची निर्मिती करावी लागली होती. याच दरम्यान थॉमस एडिसन या संशोधकानं ‘किनेटोग्राफ’ नावाचं उपकरण तयार करून त्यातून हलती चित्रं लोकांना दाखवायला सुरुवात केली होती. अंतोन यांनी ते पाहिलं आणि ‘अशी हलती चित्रं मोठ्या पडद्यावर अनेक लोकांना एकावेळी पाहता येतील असं तंत्र शोधायला हवं,’ असं आपल्या मुलांना सांगितलं.

एडिसनच्या ‘किनेटोग्राफ’मधून एकावेळी एकच माणूस हलती चित्रं पाहू शकत असे. ल्युमिए बंधूंनी ‘सिनेमॅटोग्राफ’ विकसित केला. केवळ पाच किलो वजनाच्या या उपकरणाचा उपयोग करून छायाचित्रण करता येत होतं व एक दांडा हातानं फिरवून चित्रं मोठ्या पडद्यावर दाखवताही येत होती. 

‘सिनेमॅटोग्राफ’मधली अडचण अशी होती की एडिसनच्या उपकरणातून सेकंदाला अठ्ठेचाळीस फ्रेम्स दाखवता येत होत्या, तर ल्युमिए बंधूंच्या उपकरणातून सेकंदाला सोळा फ्रेम्स दाखवणं शक्य होत होतं. छायाचित्रण व प्रदर्शनाच्या वेळी फिल्म स्थिर असावी यासाठी लुईसनं जे तंत्र ‘सिनेमॅटोग्राफ’मध्ये वापरलं ते खूप महत्त्वाचं ठरलं. शिवणयंत्र कसं काम करतं ते पाहून लुईसला हे तंत्र सुचलं. सन १८९६ मध्ये ल्युमिए बंधूंनी फ्रेंच माणसाच्या रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी, तसंच एक वृत्तचित्र अशा चाळीस फिल्म्स बनवून लंडन, ब्रुसेल्स, बेल्जियम, न्यूयॉर्क आदी ठिकाणी ‘सिनेमॅटोग्राफ थिएटर्स’ सुरू केली. याच थिएटर्सना ‘सिनेमा’ अशी ओळख जगभर मिळाली. सन १८९६ मध्येच ‘व्हिटास्कोप हॉल’ हे अमेरिकेतलं पहिलं चित्रपटगृह न्यू ऑर्लिन्स इथं सुरू झालं. अमेरिकेत चित्रपट-उद्योगानं मूळ धरलं. सन १९०९ मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं डी. डब्ल्यू, ग्रिफिथ यांच्या सिनेमाचं परीक्षण छापलं. सन १९११ मध्ये हॉलिवूडमध्ये पहिला फिल्म स्टुडिओ सुरू झाला, तर सन १९१४ मध्ये चार्ली चॅप्लिन रुपेरी पडद्यावर अवतरले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकपदाचा मान दादासाहेब फाळके यांना दिला जातो; पण हा मान खरं तर सावेदादांना म्हणजेच हरिश्र्चंद्र सखाराम भाटवडेकर यांना द्यायला हवा असं मानणारे अनेकजण आहेत. तीच स्थिती म्हटलं तर जागतिक सिनेमाच्या जनकपदाबद्दलही आहे. काहीजण ल्युमिए बंधूंच्या आधी थॉमस अल्वा एडिसननं पहिलं पब्लिक स्क्रीनिंग केल्याचा दावा करतात, तर सन २०१५ मध्ये ‘सीबीएस न्यूज’नं दिलेल्या एका बातमीनुसार, इंग्लंडमधल्या लीड्स इथं काम करणारा फ्रेंच अभियंता लुईस ले प्रिन्स यानं सन १८८८ मध्येच एकच भिंग असणाऱ्या कॅमेऱ्याचं पेटंट घेतलं होतं आणि त्या कॅमेऱ्यानं त्यानं ब्रिटिश वॉटरवेज बिल्डिंगवरून लीड्स ब्रीजचं चित्रीकरणही केलं होतं. जगातलं हे पहिलं चलच्चित्रण मानायला हवं! 

अशी खरी-खोटी खूप माहिती यापुढच्या काळातही पुढं येत राहील; पण वस्तुस्थिती ही, की जगातल्या सिनेमानं एव्हाना शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल केली आहे. सव्वाशे वर्षांच्या काळात जगात अनेक संघर्ष झाले, अनेक आपत्ती ओढवल्या, राजकीय सत्तापालट होत गेल्यानं कधी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली. या सगळ्याचा परिणाम जगभरातल्या चित्रपट-उद्योगावर आणि सिनेमावर होत राहिला; पण सिनेमाची वाटचाल थांबली नाही. आपत्तींनी सिनेमॅटिक अभिव्यक्तीला सर्जनाचे नवे धुमारे फुटत राहिले. 

गेल्या सव्वाशे वर्षांत जगभरात निर्माण झालेल्या चित्रपटांची संख्या साडेपाच लाखांहून अधिक असावी असा अंदाज आहे. या चित्रपटांपैकी सार्वकालिक उत्कृष्ट अशा शंभर चित्रपटांची यादी जगभरातल्या मान्यवर समीक्षकांना करायला सांगितली तर त्यामध्ये समाविष्ट होतील अशा भारतीय चित्रपटांची संख्याही अतिशय मोजकी आहे. बहुतेक समीक्षकांच्या यादीत ‘टोकिओ स्टोरी’, ‘मॅन विथ अ मूव्ही कॅमेरा‘, ‘द पॅशन ऑफ जॉन ऑफ आर्क’, ‘अ‍ॅटलांटे’, ‘सेव्हन समुराई’, ‘ब्रेथलेस’, ‘सिंगिंग इन द रेन’, ‘अव्हेंचुरा’, ‘बायसिकल थीव्हज्’, ‘बॅटलशिप पोटम्किन्’, ‘राशोमान’, ‘परसोना’, ‘द गॉडफादर’, ‘मेट्रोपोलिस’, ‘२००१ अ स्पेस ओडिसी’, ‘सायको’, ‘द बॅटल ऑफ अल्जायर्स’, ‘नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट’, ‘सिटी लाईट्‌स’, ‘मॉडर्न टाईम्स’, ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज्’, ‘रिअर विंडो’ अशा काही चित्रपटांचा हमखास समावेश आढळतो. भारतीय चित्रपट म्हटलं की मात्र सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’चा समावेश मुख्यतः समीक्षकांच्या यादीत पाहायला मिळतो. मुद्दा असा की आपल्याकडे चित्रपटांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर झाली, महसुलाच्या दृष्टीनं चित्रपट-उद्योगासाठी भारत दुसऱ्याया क्रमांकावर राहिला. हे सगळं खरं असलं तरी बहुसंख्य भारतीय चित्रपटांचा दर्जा सुमार होता. 

गेल्या वर्षभरात कोरोनानं जो कहर केला त्याच्या तडाख्यातून जगभरातलं चित्रपटविश्व आणि भारतीय  चित्रपटविश्र्व‍ही अजून सावरलेलं नाही. सार्वजनिक चित्रपटगृहांतून चित्रपट प्रदर्शित करणं शक्य होईना तेव्हा त्याला पर्याय म्हणून गेल्या वर्षभरात ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधण्यात आला. अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स यावर आणि काही टीव्ही चॅनेल्सवर थेट चित्रपट रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. आपत्तीमुळं अडथळा आला तरी चित्रपटविश्वासाठी हा अडथळा म्हणजे पूर्णविराम ठरू नये असे प्रयत्न कमी-अधिक प्रमाणात होत राहिले. यापुढंही ते होत राहतीलच. माणसाला गोष्ट आवडते, दुसऱ्याच्या सुख-दुःखात आणि साहसात भावनिकदृष्ट्या सहभागी होणं आवडतं किंवा विचारांना नवी दिशा मिळेल-नवे धुमारे फुटतील असं अभिव्यक्त होणं आवडतं. हे जोवर घडतंय तोपर्यंत सिनेमा निर्माण होत राहणार यात शंका नाही. प्रश्न आहे तो पूर्वीप्रमाणं समाजाच्या विविध स्तरांतले लोक एकत्र येऊन चित्रपटाचा आस्वाद यापुढं घेऊ शकणार का? की चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आणि आस्वाद घेण्याच्या पद्धती अधिक व्यक्तिगत रूप धारण करणार? चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनाला १२५ वर्षं पूर्ण झाल्यानंतर कोरोनानं चित्रपटविश्वासमोर उभा केलेला यक्ष प्रश्‍न आहे तो हा!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Kulkarni Writes about OTT has no alternative