‘तीर्थयात्रा’ भौतिक ते आत्मिक प्रेमाची

एक ‘काफिला’ निघाला आहे...‘काफिला’ आहे कोल्हापुरातील तरुण मुला-मुलींचा. त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी खूप काही सांगणारं.
Jiyarat
Jiyaratsakal

एक ‘काफिला’ निघाला आहे...‘काफिला’ आहे कोल्हापुरातील तरुण मुला-मुलींचा. त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी खूप काही सांगणारं ‘गगन दमामा बाज्यो’ हे नाटक मराठीत अनुवादित करून रंगभूमीवर आणलं. ‘गगन दमामा बाज्यो’चे मूळ लेखक आहेत पियूष मिश्रा.

देशाला जात, धर्म यांत गुरफटवून ठेवण्याचा प्रयत्न होत असताना आणि त्या नावावर दंगे घडले-घडवले जात असताना भगतसिंग व त्यांच्या साथींना देशाचं स्वातंत्र्य कसं आणि कशासाठी अपेक्षित होतं हे दमाम्याच्या, म्हणजेच मोठ्या नगाऱ्याच्या, दणदणाटासह पुन्हा सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

याबाबत कोणताच अभिनिवेश न बाळगता चौदा जोशपूर्ण गाण्यांसह ‘काफिला’चं ‘गगन दमामा बाज्यो’ रंगमंचावर आलं. त्यानं अनेक स्पर्धा तर गाजवल्याच; पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पंचवीसहून अधिक प्रयोग करत दाद मिळवली. खुद्द पियूष मिश्रा यांनीही ‘काफिला’चा हा प्रयत्न पाहिला आणि नावाजला.

‘दमामा’नं ‘काफिला’चं नाव महाराष्ट्रभर पोहोचवलं. दरम्यान, रसिकांबरोबरच खुद्द ‘काफिला’च्याही स्वत:कडून अपेक्षा वाढल्या होत्या. रसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करायची म्हणून नव्हे; पण रसिकांसाठी काही वेगळं द्यायचं म्हणून उर्दू-मराठी-हिंदी कविता, गाणी, गझल, कव्वाली आणि शेरोशायरी यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेल्या आकृतिबंधातील कलाकृती सादर करायची ठरली.

ज्यानं ‘गगन दमामा बाज्यो’ मराठीत आणलं आणि भगतसिंगांची प्रमुख भूमिका ज्यानं केली त्या सतीश तांदळे यानंच नव्या कार्यक्रमाची संहिता करावी असं ठरलं. संगीतही अर्थात् ‘गगन....’मधील गाणी लक्ष्यवेधी बनवणाऱ्या हृषीकेश देशमाने याचंच असणार हे पक्कं ठरलेलं होतं.

हृषीकेशचं वैशिष्ट्य असं की, लहानपणी वडिलांबरोबर भजनी मंडळातजाणाऱ्या हृषीकेशनं पुढं लोकसंगीताचा ध्यास घेतला. लुप्त होणाऱ्या लोककला आणि लोकसंगीत यांचा शास्त्रीय संगीतावर असलेला प्रभाव हाही त्याच्या अभ्यासाचा विषय. हृषीकेशचं लोककला व लोकवाद्य यांचं वेड असं की, आज त्याच्या व्यक्तिगत संग्रहात देशभरातील दीडशेहून अधिक लोकवाद्यं आहेत. पंजाबी संगीतातील टप्पा हा त्याच्या आवडीचा प्रकार.

‘गगन दमामा बाज्यो’मधील काही गाणी पूर्वी वेगवेगळ्या मान्यवरांनी चाली लावलेली आहेत. त्या चालींचा ठसा पुसून आपण बांधलेल्या चाली रसिकांच्या मनावर ठसवायच्या हे ‘गगन’च्या वेळी हृषीकेशसमोर असलेलं आव्हान होतं. हृषीकेशनं ते समर्थपणानं पेललं आणि त्याच वेळी ‘काफिला’च्या सूत्रधारांनी ठरवलं, संगीताला प्राधान्य असलेला वेगळ्या आकृतिबंधाचा कार्यक्रम करायचा तर त्याचं संगीतसंयोजन हे हृषीकेशनंच करायचं!

आकृतिबंध ठरला; पण या आकृतिबंधातील वेगवेगळ्या गोष्टी एकत्र गुंफायच्या तर तितकंच दमदार सूत्र हवं. एक दिवस सतीश तांदळे याच्या वाचनात ‘सेव्हन स्टेजेस ऑफ लव्ह’ हे पुस्तक आलं. सूफी तत्त्वज्ञानात प्रेमाचे सात टप्पे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे संतसाहित्यातही साकाराकडून निराकाराकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे प्रेमाचा प्रवास कसा होऊ शकतो याचं वर्णन आलेलं आहे. सतीश तांदळे याला वाटलं की, आज विकृतीलाच प्रेम समजलं जातंय.

जिच्यावर आपण प्रेम केलं ती व्यक्ती आपल्याला मिळाली नाही तर तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकणं याला प्रेम म्हणतात? आपल्याच प्रेयसीनं एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली तर तिचे तुकडे तुकडे करून फ्रिजमध्ये भरून ठेवणं हे प्रेम असू शकतं? माणसातला हैवान जागं करणारं प्रेम हे कधी खरं प्रेम नसतं. ती असते फक्त वासना आणि विकृती!

एकीकडे ‘प्रेम आहे’ म्हणायचं आणि दुसरीकडे ‘तुला माझ्याशी लग्न करायचं तर माझा धर्म स्वीकारावा लागेल’ असंही म्हणायचं या प्रकाराला प्रेम म्हणता येत नाही. प्रेम हा खरं तर वैश्विक धर्म आहे.

प्रेमापेक्षा वरचढ अन्य कोणताही धर्म नाही. प्रेमामध्ये समर्पणाची वृत्ती असते, स्वत्त्वाचा आणि अहंकाराचा लोप अपेक्षित असतो. प्रेमाचा हा जर खरा अर्थ सर्वांनी समजून घेतला तर सारं जग प्रेममय होऊन जाईल.

‘काफिला’चे सतीश तांदळे, शांतनू पाटील आणि साथींनी ठरवलं की प्रेम म्हणजेच ईश्वर, प्रेम म्हणजेच अविचल निष्ठा आणि विश्वास, प्रेम म्हणजेच ‘स्व’चा मृत्यू आणि प्रेमाइतकं पवित्र काहीच नाही असं जे प्रेमाचं स्वरूप आहे तेच आपण या प्रेमाच्या सात पायऱ्यांद्वारे शेरोशायरी, कविता, गाणी यांतून मांडत उलगडत न्यायचं.

या सात पायऱ्यांचा प्रवास म्हणजे एका अर्थी पवित्र प्रेमासाठी करावी लागणारी तीर्थयात्राच. हो, तीर्थयात्रा!....म्हणजेच ‘जियारत’!! एक विशिष्ट सूत्र घेऊन कार्यक्रमाची बांधणी करायची याचा अनुभव ‘काफिला’च्या शिलेदारांना होता तो अभिवाचनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं.

चाळीसगावमध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नावानं अभिवाचनस्पर्धा घेतल्या जात. या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं ठरलं तेव्हा पौगंडावस्थेतील मुला-मुलींना प्रगल्भ बनवणारा क्षण मराठी साहित्यात कसा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडला गेला आहे याचं दर्शन घडवायचं असं शांतनू , सतीश आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ठरवलं. वेचे निवडले, कविता निवडली.

वेच्यांमधील काही भाग महेश एलकुंचवार यांच्या ‘त्रिबंध’मधला होता, काही भाग मनोहर शहाणे यांच्या ‘धाकटं आकाश’मधला होता, एक वेचा सुमित्रा जाधव यांच्या ‘थेंबरेषा’मधला, एक वेचा भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’मधला आणि कविता श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची.

अवघ्या महाराष्ट्रातून स्पर्धक आलेले असताना आसावरी नागवेकर, कृष्णा राजशेखर अशा मुलींची साथ घेत ‘काफिला’नं केवळ चाळीसगावचीच स्पर्धा जिंकली असं नव्हे तर, अभिवाचनक्षेत्रात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं.

साहजिकच ‘जियारत’सारखा कार्यक्रम सूत्रबद्ध करणं आणि रसिकांशी संवाद साधत कार्यक्रम सळसळता ठेवणं हे आव्हान निवेदक व सूत्रसंचालक सतीश तांदळे आणि शांतनू यांच्यासाठी अवघड ठरलं नाही.

‘जियारत’शी रसिकांना बांधून ठेवायचं तर शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व असणाऱ्या गायकांची आणि त्यांना दमदार साथ देऊ शकणाऱ्या वादकांची गरज होती. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी हृषीकेश देशमाने पुढं सरसावला. त्यानं संपदा मानेकडून स्वत: शास्त्रीय संगीताचं आकलन समृद्ध केलेलं होतं.

लोकगीतांचा त्याचा स्वत:चा अभ्यास होता. हृषीकेशनं ‘जियारत’साठी चार वेगळ्या प्रकारची गायकी असणारे चार तरुण गायक निवडले. यातला ओंकार पाटील हा शास्त्रीय बाज व जाण असलेला, कौस्तुभ शिंदे हा भजनं उत्तम गाणारा, कैवल्य पाटीलच्या घरातच गझलगायनाची परंपरा, सूरज कांबळे याचा आवाज सूफी संगीताला साजेसा आणि खूप वरच्या पट्टीतही सुरात राहणारा.

चार पुरुषगायक. चौघांच्याही आवाजाला वेगळं वजन, अशा वेळी संतुलन साधण्यासाठी संगीतातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विनोद ठाकूर-देसाई यांच्या शिष्या हर्षदा परीट व प्रतिक्षा पोवार या कोमल आवाजाच्या मुलींची निवड झाली.

संगीतसाथ करण्यासाठी हृषीकेशनं अभय हावळ, मयूरेश शिखरे व हर्ष जांभळे यांना सोबत घेतलं. सर्व कलाकारांपैकी प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य असलं तरी रसिकांना ‘जियारत’ घडवताना ते सर्व एकमेकांना पूरक ठरतात आणि म्हणूनच ‘जियारत’ हा ‘काफिला’चा कार्यक्रम रसिकांसाठी दीर्घ काळ स्मरणात राहणारा ठरतो.

ही ‘जियारत’ सांगते : ‘प्रेम एक ऐसी यात्रा है जहाँ हम ‘खुद’से ‘खुद’को

मिलाने के लिए दूरी तय करते है.’

प्रेम म्हणजे काय हे ज्याला समजलं तो मरणालाही भीत नाही अन् समर्पणालाही. ईश्वराप्रमाणे चराचरात प्रेम असेल तर अहंकारकशाचा? भ्यायचं कशाला? समजायला एवढंच हवं की, ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!’ कोल्हापुरातून निघालेल्या या ‘काफिला’ला महाराष्ट्रभर भरभरून दाद मिळेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com