esakal | भीषण आणि भयावह
sakal

बोलून बातमी शोधा

Everest

भीषण आणि भयावह

sakal_logo
By
उमेश झिरपे

हिमालयाची रूपं अनेक आहेत. यातील काहीसं रूक्ष, काहीसं भीतीदायक रूप हे सामान्य जनतेला काहीसं अपरिचितच आहे. स्थानिक लोकं आणि हिमालयात काळ- वेळ- ऋतू न पाहता भटकंती करणार्‍या लोकांना मात्र हे रुक्ष व भीतीदायक रूप अनेकवेळा बघायला मिळते.

हिमालयात असणारे ऋतू हे मानवाला अचंबित करतात. येथील उन्हाळा हा अतिशय प्रसन्न व विलोभनीय असतो, अन हिवाळा तेवढाच रुक्ष व एकसूरी. डिसेंबर- जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात हिमालयात होणारी हिमवृष्टी ही इतकी प्रचंड असते की नवीन माणसाला धडकी भरेल. 

हिवाळ्यातील तीन महिन्यात येथील वातावरण अतिशय त्रासिक असते. डोंगराळ भागात राहणाऱ्या अनेक लोकांची दोन घरे आहेत, नऊ महिने ते डोंगरात राहतात आणि हिवाळ्याचे तीन महिने खालच्या भागात उभारलेल्या घरात. बरं पायथ्याशी घर असलं म्हणजे सर्व काही सुरळीत असं देखील नसतं.

या तीन महिन्याच्या रेशन - इंधनाची सोय हिवाळ्याच्या सुरवातीलाच लावावी लागते. चुकून जरी त्याचे नियोजन बिघडले तर खाण्यापिण्याचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यात संपर्क यंत्रणा चालू असेलच याची खात्री नसते. हिमाचल प्रदेशच्या मनालीजवळील प्रिनी गावात आमचा खेमराज ठाकूर नावाचा आमचा एक गिर्यारोहक मित्र वास्तव्यास आहे. डिसेंबरमध्ये तो जेव्हा पुण्यात येतो तेव्हा येथील हवामान- जीवनमान बघून दरवेळी म्हणतो, “तुम्ही खूप भाग्यवान आहात, आम्हाला तर पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते.” मी देखील ही परिस्थिती अनुभवली आहे. काही वेळा हिवाळी दिवसात हिमालयात गेलो असता तेथील लोक जगण्याच्या प्राथमिक गोष्टींसाठी झगडताना मी पाहिले आहे. असं कष्टप्रद जगणं या लोकांनी अंगीकारलं असून येथून पुढच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे, असेच ते म्हणतात.

मी जेव्हा हिवाळ्यातील हिमालय पहिल्यांदा अनुभवला होता तेव्हा अंगावर काटा आला होता. इतरवेळी मनमोहक अन सुंदर दिसणारा हिमालय एकसूरी, सगळीकडे हिमच हिम आणि त्यात मिट्ट अंधार बघून काहीशी भीती वाटली. निसर्गाच्या अशा दोन टोकांच्या रूपांचा अनुभव मनावर खोल रूजला आहे. हिमालयाच्या अशा एकांगीपणाचा मला काही वेळा सामना करावा लागला. त्यातील सर्वांत आठवणीत राहणारा क्षण म्हणजे २०१३ ची एव्हरेस्ट मोहीम.

२०१२ च्या ‘एव्हरेस्ट’ यशानंतर गिरिप्रेमीच्या तीन बिनीच्या शिलेदारांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा २०१३ ला एव्हरेस्टचे आव्हान स्वीकारले होते. या तिन्ही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टचे स्वप्न काहींना काही कारणामुळे २०१२ मध्ये पूर्ण झाले नव्हते. मला देखील अनेक वर्षांचे एव्हरेस्टचे स्वप्न पूर्ण करायचे होते. संपूर्ण मोहीम सुरळीत पार पडत होती. अंतिम शिखर चढाईला निघाल्यानंतर कॅम्प ३ च्या पुढे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग जो ताशी ४० ते ५० किलोमीटर असतो तो ८०-१०० च्या पुढे सरकला होता. वाऱ्याशी झुंजत आम्ही कसेबसे ८ हजार मीटर उंचीवर असलेल्या कॅम्प ४ ला पोहोचलो. साऊथ कोल नावाच्या जागेवर वसलेला कॅम्प ४ हा डेथ झोन म्हणूनच ओळखला जातो.

इथे हवेतील प्राणवायूचे प्रमाण १-२ टक्के इतके कमी असते. तापमान उणे ४० ते उणे ६० अंश सेल्सियस इतके कमी असते. त्यामुळे येथे असणारी थंडी ही हाडे गोठवणारी असते. त्यात वाऱ्याचा वेग ठीक असेल तर गिर्यारोहक कॅम्प ४ ला काही तास विश्रांती घेऊन पुढे अंतिम शिखर चढाईला जातात. आमचीही योजना अशीच होती. मात्र कॅम्प ४ ला पोहोचल्यावर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. आम्ही चौघे व आमचे शेर्पा साथीदार कसेबसे आपापल्या तंबूत विसावलो. वाऱ्यामुळे तंबू इतका फडफडत होता की आम्हाला शेजारी बसलेल्या व्यक्तीचे ऐकू येत नव्हते. त्यात जर वाऱ्याच्या वेगाने तंबू फाटला तर आम्ही उघड्यावर पडलो असतो आणि नक्कीच हिमसमाधी मिळाली असती. अशा वातावरणात आम्हाला रात्र काढावी लागली.

प्रत्येक क्षणाला १९९६ च्या अपघाताची आठवण येत होती. त्यावेळी याच साऊथ कोलला असेच ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहणारे हिमवादळ आल्याने दिग्गज गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.  आमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आम्हाला देवाचा धावा करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एव्हरेस्ट शिखर दृष्टिक्षेपात होते. मात्र, जवळपास ३६ तास ८ हजार मीटर उंचीवरील डेथ झोनमध्ये काढल्याने कृत्रिम प्राणवायूचा आधार आम्हाला घ्यावा लागला. त्यातून नवीन प्रश्न उभा राहिला. शिखर चढाई यशस्वी करून पुन्हा खाली परत येण्यासाठी आवश्यक सिलेंडर्स पेक्षा आमच्याकडे कमी सिलेंडर्स होते. पुन्हा बेसकॅम्पला जाऊन सिलेंडर्स घेऊन येणे अशक्य होते.

परिस्थितीचा अंदाज घेऊन आमच्या शेर्पा सरदाराने एक पर्याय सुचवला. आमच्या चारपैकी एक जण व त्याचा शेर्पा जोडीदार खाली परत गेला तर इतरांना शिखर चढाई यशस्वी करता येईल. मी क्षणाचाही विलंब न करता खाली जायचे असेल तर मी जाईल असे घोषित केले. मी मोहिमेचा नेता होतो. माझ्या सोबत असलेल्या तरुण गिर्यारोहकांची माझ्यावर जबाबदारी होती. त्यांची शिखर चढाई यशस्वी होणे माझ्यापेक्षा महत्त्वाचे होते. माझ्यासाठी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ होते. त्यामुळे मी एव्हरेस्ट शिखरमाथ्याला नमन करून खाली परतलो. माझ्या साथीदारांनी पुढील काही तासांत एव्हरेस्ट चढाई यशस्वी करत आनंदाची बातमी दिली व मोहीम यशस्वी झाली. 

आठ हजार मीटर उंचीवर काढलेली ती रात्र मात्र आजही डोळ्यासमोर आहेत. आपल्या हिमालयाचे असे भीषण, अंगावर काटे आणणारे रूप पाहून भीती वाटली, वाईट वाटले. आपल्या आवडीचा हिमालय चक्क रूक्ष वाटला . हीच तर हिमालयाची खासियत आहे, तो जेवढा प्रेम करतो, तेवढा रागावतो पण. आपण कळत - नकळत केलेल्या चुकांवर तो रागावला असेल, असा विचार  त्यावेळी करून पुन्हा एकदा नव्याने हिमालयाच्याच कुशीत येण्याचे मनसुबे आखत हिमालयाचा निरोप घेतला.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

loading image
go to top