esakal | पवित्र नंदादेवी... | Nandadevi
sakal

बोलून बातमी शोधा

Nandadevi and Sunandadevi Mountain
पवित्र नंदादेवी...

पवित्र नंदादेवी...

sakal_logo
By
उमेश झिरपे

हिमालयात देवतांचा अधिवास आहे, अशी स्थानिकांची व बाहेरच्याही लोकांची ठाम समजूत आहे. हिमालयातील विविध शिखरे ही देवी-देवतांच्याच नावाने ओळखली जातात. अगदी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखराला देखील देवासमानच मानतात. नेपाळमधील स्थानिक लोक एव्हरेस्ट चोमोलुंग्मा किंवा सगरमाथा असे संबोधतात. याचा अर्थ एव्हरेस्ट म्हणजे जगन्माता असा होतो. भारतीय बाजुला तर अशी अनेक शिखरे आहेत, ज्यांचा पुराणात संदर्भ आढळतो. यातीलच एक शिखर म्हणजे माउंट नंदादेवी.

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात ऋषीगंगा व्हॅलीत नंदादेवी शिखर समूह आहे. यात दोन शिखरांचा समावेश होतो, एक नंदादेवी तर दुसरे सुनंदादेवी. नंदादेवी शिखराची उंची ही ७ हजार ८१६ मीटर असून सुनंदादेवी या शिखराची उंची ७ हजार ४३४ मीटर आहे. सुनंदादेवी या शिखराची ओळख नंदादेवी-पूर्व शिखर अशी देखील आहे.

या दोन्ही शिखरांचा संदर्भ भगवतगीतेत आढळतो. या दोन्ही शिखरांवर नंदा व सुनंदा देवींचा अधिवास आहे, असे मानले जाते. त्यामुळे स्थानिक या दोन्ही शिखरांना अतिशय पवित्र मानतात.

नंदादेवी शिखर समूह हा गिर्यारोहकांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. सध्या उंचीनुसार जगातील २३ व्या क्रमांकाचे असलेले नंदादेवी शिखर १८०० मध्ये जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जात होते. पुढे इतर शिखरांचा शोध लागल्यावर नंदादेवी शिखराचा उंचीनुसार क्रमांक खाली येत गेला. उंची कमी असली तरी येथील आव्हाने ही भेदक आहेत. या दोन्ही शिखरांचे कडे हे अतिशय उंच व तीव्र आहेत, येथे चढाई करावयाची असल्यास अक्षरशः काटकोनातील हिमभिंतीवर चढाई करावी लागते. १९३६ मध्ये पहिल्यांदा नंदादेवी शिखर चढाई यशस्वी झाली. नोएल ओडेल व बिल टिलमन यांनी नंदादेवी शिखरमाथा गाठण्यात यश मिळविले. त्यानंतर अनेक वर्षे कित्येक दिग्गज गिर्यारोहक या शिखरावर चढाई करण्यासाठी झटत राहिले, मात्र कोणालाही यश मिळाले नाही.

भारतीय सैन्यदलाने १९५७ व १९६१ असे दोन असफल प्रयत्न केले. शेवटी १९६४ मध्ये कर्नल नरेंद्र कुमारांच्या नेतृत्वाखाली पहिली भारतीय व शिखरावरील दुसरी मोहीम यशस्वी झाली. १९५१ मध्ये फ्रेंच संघातील गिर्यारोहकांनी नंदादेवी व सुनंदादेवी या दोन शिखरांना जोडणाऱ्या रिजने चढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यात अपघात होऊन दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला व पुढे मोहीम अर्धवट राहिली. या मोहिमेत दिग्गज गिर्यारोहक व एडमंड हिलरींच्या साथीने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम चढाई करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे मदतनीस सदस्य म्हणून सहभागी झाले होते. पुढे अनेक वर्षांनी आठवणींना उजाळा देताना तेनसिंग नोर्गे सांगायचे कि नंदा-सुनंदादेवी या जोड पर्वत शिखरांवरील मोहीम ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण गिर्यारोहण मोहीम होती, अगदी एव्हरेस्टपेक्षाही कठीण. येथे असणाऱ्या आव्हानांची सर कोणत्याच दुसऱ्या शिखरांना येणार नाही, असेही ते सांगायचे.

माझा नंदादेवी पर्वत शिखराचा पहिला संबंध आला बेसिक माउंटनियरिंग कोर्सच्या वेळी. उत्तरकाशी येथे असलेल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग येथे माझा कोर्स होता. १९८५ चे वर्ष होते. मी २० वर्षांचा तरुण व नवोदित गिर्यारोहक होतो. त्यामुळे हिमालयातील मोहिमांचे मला आकर्षण होते. त्यावेळी रतनसिंग चौहान हे आमचे प्रशिक्षक होते. १९८० मध्ये त्यांनी नंदादेवी शिखरावर यशस्वी चढाई केली होती. मोहिमेतील साधे पोर्टर ते भारतातील ख्यातनाम गिर्यारोहक असा लौकिक त्यांनी कमावला होता. ते नंदादेवी शिखर मोहिमेचे किस्से आम्हाला रंगवून सांगत असत. शिखर चढाईच्या शेवटच्या टप्प्यात अगदी घोड्यावर बसल्याप्रमाणे रिजच्या दोन्ही बाजूने पाय सोडून त्यांना चढाई करावी लागली. त्यात मानसिक व शारीरिक कस तर लागलाच सोबतीला दोन्ही मांड्या अक्षरशः सोलून निघाल्या, असे रतनसिंग आम्हाला सांगत असत. त्यांची सांगण्याची पद्धत इतकी रंजक व वेधक होती की एखादा किस्सा पुन्हा सांगितला तरी तेवढाच रंजक वाटायचा. त्यांच्या सांगण्यातून माझ्या डोळ्यासमोर नंदादेवी पर्वत शिखर समूह अक्षरशः उभा राहत असे. या शिखरावर एकदा तरी मोहीम करायला मिळावी, असे माझे स्वप्न होते, मात्र ते काही पूर्ण झाले नाही. येणाऱ्या काळात गिरिप्रेमीचे शिलेदार नंदादेवीचे आव्हान स्वीकारतील व यशस्वी होतील, असा विश्वास आहे.

नंदादेवी शिखर समूहाशी आणखी एक रंजक कथा जोडल्या गेली आहे. भारताचे गुप्तचर खाते व अमेरिकेची संस्था सीआयए यांनी संयुक्त विद्यमाने न्यूक्लियर पॉवर्ड टेलिमेट्री रिले लिसनिंग डिव्हाईस नंदादेवी शिखरमाथ्यावर बसविण्यासाठी १९६५ ते १९६८ अशी तीन वर्षे कसून प्रयत्न केले. चीनच्या शिंजियांग प्रांतात चालू असलेल्या मिसाईल टेस्टिंगची माहिती मिळविण्यासाठी हे डिव्हाईस बसविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय खराब हवामान व नंदादेवी पर्वत शिखरावरील आव्हाने यांमुळे ते डिव्हाईस शिखरमाथ्याच्या जवळ सोडण्यात आले. पुढे त्या डिव्हाईसशी संपर्क होऊ न शकल्याने त्याचा शोध घेण्याची मोहीम आखण्यात आली, ज्यात यश आले नाही. या कारणामुळे नंदादेवी शिखर समूहाच्या पायथ्याशी असलेले नंदादेवी अभयारण्य सर्वांसाठीच अनेक वर्ष बंद होते.

नंदादेवी- सुनंदादेवी या पर्वत शिखरांना स्थानिक लोक अतिशय पवित्र मानतात. नवरात्री उत्सवात या देवतांचे विशेष पूजन देखील केले जाते. या दोन्ही देवता कडक असून मानवाच्या चुकांची शिक्षा प्रकोपातून देतात, अशी स्थानिकांची गाढ श्रद्धा आहे. याच वर्षी नंदादेवी शिखर परिसरातील हिमनदीचे प्रसारण पावल्याने धौलीगंगा व ऋषीगंगा नद्यांना महापूर आला, ज्यामध्ये धौलीगंगा नदीवरील रेनी गावात असलेले जलविद्युत केंद्र वाहून गेले, तसेच १४० हुन अधिक लोकांचा यात मृत्यू झाला. या घटनांमध्ये देवीचा प्रकोप होता, असे स्थानिकांना वाटते.

नंदादेवी व सुनंदादेवी पर्वत शिखरे ही नितांत सुंदर आहेत. तेथे देवीचा अधिवास असतो... यावर मतमतांतरे असतीलही.. मात्र ही दोन्ही शिखरे त्यांच्या नावाप्रमाणे व ओळखीप्रमाणे अतिशय आनंद व समृद्ध करणारी शिखरे आहेत.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत. )

loading image
go to top