पर्वतांबद्दल कृतज्ञता हवी...!

पर्वत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मानव प्रजातीच नव्हे जणू सर्व सजीव सृष्टी या ना त्या कारणानं या पर्वतांवर अवलंबून आहे.
mountain
mountainsakal

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा

हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य

स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या ‘कुमारसंभव’ या महाकाव्याची सुरुवात होते देशातील एका पर्वताच्या वर्णनानं आणि तो म्हणजे अर्थातच आपला हिमालय. सर्व पर्वतांचा जणू काही राजा असा हा हिमालय उत्तर दिशेला स्थित आहे. प्राचीन काळापासून पाण्याचा मोठा साठा असलेला हा पर्वत म्हणजे पृथ्वीचा जणू मानदंड आहे, अशा शब्दात कालिदासानं त्याचं वर्णन केलंय.

पर्वत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मानव प्रजातीच नव्हे जणू सर्व सजीव सृष्टी या ना त्या कारणानं या पर्वतांवर अवलंबून आहे. या पर्वतांशी माझा अगदी जवळचा संबंध. गिर्यारोहक म्हणून पर्वतरांगांच्या सान्निध्यात वेळ घालवत असताना पर्वतांशी ऋणानुबंध जोडला गेला तो कायमचाच. अशा पर्वतांचं योगदान साजरा करण्याचा हा दिवस.

११ डिसेंबर म्हणजे जागतिक पर्वत दिन. जगभरात विविध ठिकाणी विस्तीर्ण व विशाल पर्वतांप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी २३ टक्के भूभाग हा पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. तसेच जगातील अंदाजे १५ टक्के लोकसंख्या याच पर्वतांच्या प्रदेशात राहते. उर्वरित ८५ टक्के लोकसंख्या नैसर्गिक स्रोतांसाठी पर्वतांवर अवलंबून आहे. पर्वत, विस्तीर्ण डोंगररांगा या पाणी, ऊर्जा व अन्न यांचे नैसर्गिक स्रोत म्हणून ओळखले जातात, ज्यांवर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे.

या सर्वांचा विचार करता, पर्वतांचं जतन करण्यासाठी, येणाऱ्या काळात त्यांची होणारी हानी टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं २००३ पासून ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करण्याचं ठरविलं. संयुक्त राष्ट्रसंघाचा अन्न व कृषी संघटन विभाग हा दिवस मोठ्या उत्साहात जगभरात साजरा करतो. यासाठी दरवर्षी एक विषय निवडला जातो व त्याच्या आधारे पर्वतांप्रती ऋण व्यक्त केलं जातं.

आम्ही गिर्यारोहक, ज्यांच्यासाठी पर्वत ही कर्मभूमी आहे, जिवाभावाचा सखा आहे, पर्वत दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, हा दिवस मर्यादित समूहांपर्यंत न राहता सर्वव्यापी होणं, ही काळाची गरज आहे. याच प्रेरणेनं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघदेखील संलग्न ३५ हून अधिक जिल्हा संघटनांच्या माध्यमातून, सदस्य क्लबच्या माध्यमातून पर्वत पूजन करून व विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून या वर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करत आहे.

सध्या जगभरामध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हे दिवस साजरे करण्यामागं संबंधित विषयांबाबतीत जागरूकता वाढवणं हा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचं उद्दिष्ट देखील याहून काही वेगळं नाही. या आधी म्हटल्याप्रमाणे पर्वतरांगांवर, तिथं उपलब्ध असलेल्या किंवा त्यातून उगम पावणाऱ्या विविध नैसर्गिक स्रोतांवर जीवनसृष्टी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

या पर्वतरांगांचं संवर्धन करणं, त्याविषयी अधिक जागरूक होणं ही काळाची गरज होत आहे. म्हणूनच ज्यांच्या निसर्गाप्रती जाणिवा- नेणिवा जिवंत आहेत, अशा सर्वांनी पर्वतांप्रती असणारी आस्था जपली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे, किंबहुना त्याचा योग्य प्रसार केला पाहिजे.

डोंगरांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र याची जाण आपल्याला जेवढी असायला हवी तेवढी नाही असं खेदानं सांगावं लागतंय. डोंगर परिसरात मात्र अगदी या उलट भावना आहे. इथं राहणारे नागरिक डोंगरांना देवासमान मानतात. मी हिमालयामध्ये जेवढ्या मोहिमा केल्या आहेत, अगदी ‘माउंट एव्हरेस्ट’वरील मोहीम असो किंवा इतर कोणतीही मोहीम, सर्व मोहिमांची सुरुवात करण्याआधी पर्वतदेवाची, त्या पर्वतांवर असलेल्या देवाची पूजा करून, त्यांचे स्मरण करून, त्यांची माफी मागूनच सर्व मोहिमा सुरू झाल्या आहेत.

अशा मोहिमांमध्ये सहभागी असणारे स्थानिक लोकं पर्वत शिखराची पूजा न करणं अशुभ मानतात. त्यांच्या या प्रथेमागं श्रद्धा जरी धार्मिक असली, तरी त्याचं मूळ हे त्या पर्वतांचं जतन-संवर्धन करणं हेच आहे. हिमालयात असणारी ही प्रथा सह्याद्री पर्वतरांगेला देखील लागू होते.

तुम्ही जर निरखून अभ्यास केला, तर असं लक्षात येईल की सह्याद्रीत देखील कळसूबाई, काळूबाई, चकदेव, भीमाशंकर, सप्तशृंगी, ज्योतिबा आदी अशी अनेक मंदिरं डोंगरात वसलेली आहेत. या मंदिरांचे, पर्यायानं त्या डोंगर परिसराचं पावित्र्य राखणं, याबाबत स्थानिक लोक अत्यंत आग्रही असतात. त्यांचा यामागचा उद्देश हा वरकरणी धार्मिक दिसत असला, तरी ज्या डोंगरांवर आपलं संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे, त्या डोंगरांचं जतन करणं हाच मुख्य उद्देश यातून अधोरेखित होतो.

पर्वतांमुळं आपलं जीवन खूप समृद्ध झालं आहे. मनुष्याच्या विकासात पर्वतांचं खूप मोठं स्थान आहे. आपल्या जगण्यामध्ये पर्वतांचा खूप मोठा वाटा नक्कीच आहे. सध्याच्या युगात तर पर्वतरांगांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गिर्यारोहण, ट्रेकिंग सारखे क्रीडाप्रकार तर फक्त पर्वतांवरच करता येतात. तसेच विविध साहसी खेळांचे नैसर्गिक क्रीडांगण हे पर्वतच आहेत. नेपाळसारख्या देशाची तर संपूर्ण अर्थव्यवस्था फक्त आणि फक्त पर्वतांशीच निगडित आहे. त्यामुळे पर्वतांना आणखी आपलंस करण्याची वेळ आता आली आहे.

मानवानं आपल्या फायद्यासाठी अनेक डोंगर-पर्वत फोडले, त्यातून रस्ते निर्माण केले, तिथल्या खनिज संपत्तीची राजरोसपणे लूट केली. त्यासाठी अक्षरशः डोंगरच्या डोंगर सपाट झालेले आपण बघत आलो आहोत. हिरवेगार पर्वत उघडे बोडके दिसू लागले, भरभरून वाहत असलेल्या नद्या प्लास्टिक आणि अन्य अविघटनशील वस्तूंना कवेत घेऊन वाहू लागल्या, त्यामुळं प्रवाहात अडथळे आले, पाणी दूषित झालं.

जलचर अस्वस्थ झाले आणि किनारे अस्वच्छ होऊ लागले. हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे. पर्वत हा निसर्गाचा खजिना आहे, त्यांचा वापर नक्कीच केला पाहिजे, पण त्याकरिता आपण नेमकं कुठं थांबलं पाहिजे, याची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. पर्वतांसंबंधी आणखी अभ्यास झाला पाहिजे, इथं असणाऱ्या प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल संशोधन झालं पाहिजे, पर्वत हे फक्त उपभोगाचं साधन न राहता आपल्या आयुष्याचा भाग बनविणं आवश्यक आहे.

खरंतर आपल्या नकळत्या वयातच आपली पर्वताशी ओळख होते. इयत्ता दुसरी- तिसरीमध्ये असताना आपण काढलेलं निसर्गचित्र तुम्हाला आठवतं का ? त्यात असतात त्रिकोणी पर्वतरांगा, त्यामधून डोकावणारा उगवता सूर्य, पर्वतावरून वाहणारी नदी, आकाशात उडणारे पक्षी, पायथ्याशी झोपड्या, शेती आणि झाडं. या चित्रात या परिसरात राहणारी माणसंही आपण दाखवतो.

म्हणजे आपल्याला हे आधीपासूनच माहिती आहे की या साऱ्या गोष्टींचा पर्वत या संकल्पनेशी जवळचा संबंध आहे. पण आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण स्वार्थी होतो आणि त्यातून आपला हा बालपणीचा पर्वत मित्र आपणच दूषित करतो. हे थांबलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वतांचं संवर्धन हा पण आपण केला पाहिजे.

यासाठी आवश्यक कृती आपण लवकरात लवकर केली पाहिजे, याची सुरुवात करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठलाच नाही. चला तर मग, पर्वतांना वाचवू, पर्वतांना जगवू, पर्वतांबाबत ऋण व्यक्त करू. उद्याच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com