एव्हरेस्ट मॅरेथॉन!

पुणे मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन या मोठ्या स्पर्धांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्रातच नव्हे तर, भारतभर भरत असतात.
Mount Everest
Mount EverestSakal

नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या थंडीच्या दिवसांत आपल्याकडे मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या संख्येनं असतात.

पुणे मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन या मोठ्या स्पर्धांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्रातच नव्हे तर, भारतभर भरत असतात. कधी निधी-उभारणीसाठी, कधी निसर्गाच्या रक्षणासाठी, तर कधी समाजातील विविध घटकांना सामावून घेण्यासाठी नानाविध मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येतात. जगभरात या मॅरेथॉन स्पर्धांचं प्रचंड वेड आहे. अशाच एका अनोख्या मॅरेथॉन स्पर्धेचा अनुभव मला घेता आला, तेही जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’च्या पायथ्याशी. ता. २९ मे १९५३ रोजी सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’वर पहिलं पाऊल ठेवलं व इतिहास घडवला. ता. २९ मे हा ऐतिहासिक दिवस जगभरात ‘एव्हरेस्ट डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर एक अनोखी मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते. ६० किलोमीटरची अल्ट्रामॅरेथॉन, ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन अशा तीन विभागांत ही स्पर्धा होते. कोणत्याही वयोगटातील सुदृढ व्यक्ती या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊ शकते.

नेपाळ सरकारची अधिकृत मान्यता असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा ५३६४ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पहून सुरू होते व खुम्बू खोऱ्यातील शेर्पांच्या पारंपरिक चढाई-पायवाटांवरून मार्गक्रमण करत तिची सांगता होते. जगातील कठीण मॅरेथॉन स्पर्धांच्या यादीत ‘एव्हरेस्ट मॅरेथॉन’ बरीच वर आहे. हिमवृष्टी होणाऱ्या खुम्बू आईसफॉलसारख्या कठीण भौगोलिक प्रदेशातून सुरू होणारी मॅरेथॉन वरच्या उंचीवर सुरू होऊन खालच्या उंचीवर संपते. सन २००३ पासून ही मॅरेथॉन दरवर्षी आयोजिली जाते. स्थानिक शेर्पा या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात. इतर ठिकाणी होणाऱ्या ४२ किलोमीटरच्या नेहमीच्या मॅरेथॉनपेक्षा एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी तुलनेनं अधिक कालावधी लागतो. दरवर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जशी एव्हरेस्ट शिखरचढाई करणाऱ्या गिर्यारोहकांची लगबग असते अगदी तशीच लगबग ‘एव्हरेस्ट डे’जवळ येताच देशा-विदेशातील मॅरेथॉनर्सची दिसून येते. मॅरेथॉनच्या आधी परिपूर्ण तयारी करण्यासाठी, अती उंचीवरील हवामानाशी एकरूप होण्यासाठी अनेक धावपटू सराव करण्यासाठी खुम्बू खोरं पालथं घालतात. या मॅरेथॉनशी संबंधित एक विलक्षण आठवण आहे.

सन २०१२ मध्ये ‘गिरिप्रेमी’च्या आठ गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’वर तिरंगा फडकवला व भारतीय गिर्यारोहणाच्या इतिहासातील नवीन अध्याय घडवला. या वेळी ‘गिरिप्रेमी’च्या संघातील तीन आघाडीच्या गिर्यारोहकांना काही ना काही कारणामुळे शिखरचढाई करण्यात यश आलं नव्हतं. या तिघांना घेऊन मी पुन्हा एकदा २०१३ मध्ये एव्हरेस्टचं स्वप्न उराशी बाळगून बेस कॅम्पला आलो होतो.

सन २०१२ मध्ये ज्यांना शिखरचढाई करण्यात यश आलं नव्हतं, त्यात भूषण हर्षे याचाही समावेश होता. सुमारे ६४०० मीटर उंचीवर असलेल्या ‘कॅम्प २’च्या वर गेल्यावर भूषणच्या छातीत दुखत असे. या छातीच्या दुखण्यामुळे व छोटासा अपघात झाल्यानं त्याला २०१२ मध्ये मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. अती उंचीवर गेल्यावर त्याची छाती दुखण्याचं निदान करण्याचा प्रयत्न पुणे व दिल्ली इथं आम्ही या मोहिमेनंतर वर्षभर केला. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं; पण तरीसुद्धा अती उंचीवर गेल्यावर भूषणच्या छातीत का दुखतं याचं ठोस निदान झालं नाही.

पुण्यात असताना मात्र छाती दुखण्याचा कुठलाच त्रास त्याला होत नव्हता. त्याचे सगळे वैद्यकीय अहवाल चांगले येत असत.

आम्ही जेव्हा २०१३ मध्ये पुन्हा एकदा एव्हरेस्टच्या चढाईसाठी बेस कॅम्पला आलो तेव्हा परत ‘कॅम्प २’ ला पोहोचल्यावर ‘कॅम्प ३’च्या वाटेवर असताना, छातीमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी खूप दुखत आहे, असं भूषणनं सांगितलं. तेव्हा मात्र मी थोडा घाबरलो. त्याच वेळी बेस कॅम्पवर भारतीय सैन्यदलाचा संघही एव्हरेस्टच्या चढाईसाठी आला होता. या संघातील अनुभवी डॉक्टरांना भेटून भूषणला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना सांगितलं. त्यांनी भूषणची संपूर्ण तपासणी केली. ते म्हणाले, ‘या ठिकाणी कोणतीही वैद्यकीय साधनसामग्री नाही. त्यामुळे ‘असं का होतंय’ याचं नेमकं निदान करणं कठीण आहे.’ तेव्हा, वैद्यकीय सल्ल्यानुसार, मोहीम सोडून परत जाणं हेच त्याच्या तब्येतीसाठी हितावह होतं; परंतु एव्हरेस्टच्या चढाईची त्याची तीव्र इच्छा पाहून डॉक्टरांनी थोडा धोका पत्करून अजब सल्ला दिला. ते भूषणला म्हणाले, ‘तू उद्या सकाळी बेस कॅम्पहून धावायला सुरुवात कर, खालच्या भागात असलेल्या गोरक्षेपपर्यंत जा आणि पुन्हा धावत परत बेस कॅम्पला ये. आमचा एक सैनिक एव्हरेस्ट मॅरेथॉनचा सराव करतो आहे, त्याला बरोबर घेऊन जा; जेणेकरून काही लागलंच तर त्याची मदत होईल.’ डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून मी थोडा चिंतित झालो आणि विचारलं, ‘या धावपळीत भूषणला काही झालं तर?’ त्यावर डॉक्टर उत्तरले, ‘या धावपळीत काही त्रास झाला तर भूषणला मोहीम अर्ध्यावर सोडण्याशिवाय पर्याय नाही अन् त्रास नाही झाला तर एव्हरेस्टच्या चढाईचा त्याचा मार्ग मोकळा!’ सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मी भूषणच्या ‘मॅरेथॉन’ला होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी भूषण व सैन्यदलातील जवान यांनी धावायला सुरुवात केली.

भूषण काही तासांत गोरक्षेपला जाऊन बेस कॅम्पला परतला व डॉक्टरांसमोर उभा राहिला. एव्हरेस्ट मिनी मॅरेथॉनच जणू त्यानं पूर्ण केली होती. भूषणचा वेग बघता डॉक्टरही चकित झाले. बरोबरचा जवान कुठं आहे हे विचारल्यावर ‘तो अजून बराच मागं असेल,’ असं भूषणनं सांगितलं. डॉक्टरांनी सुचवलेली ही अजब ‘मेडिकल टेस्ट’ भूषणनं पूर्ण केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी भूषणला एव्हरेस्टची चढाई करण्याची पूर्ण परवानगी दिली व त्याबरोबरच एक गोळीही हातात ठेवली. मला तर काही उमजलंच नाही.

नेमकं काय झालं आहे असं मी डॉक्टरांना विचारलं. त्यांच्या उत्तरानं मी अवाक् झालो.

ते म्हणाले होते, ‘इतक्या उंचीवर, इतक्या कमी प्राणवायूच्या प्रदेशात जवळजवळ मिनी मॅरेथॉनइतकं अंतर वेगानं पूर्ण करणं कठीण आहे. त्यासाठी पायांत बळ तर असावंच लागतं, त्याशिवाय ‘कार्डिॲक फिटनेस’ही उत्तमच हवा. जर भूषणला काही कार्डिॲक अर्थात् हृदयाचा त्रास असता तर या धावण्यादरम्यान तो कुठं तरी कोसळून पडला असता. असं काही झालं नाही, म्हणजेच एव्हरेस्टच्या चढाईसाठी तो संपूर्णपणे सज्ज आहे.’

डॉक्टरांच्या या स्पष्टीकरणानंतर मला काही क्षण काही सुचलंच नाही. भूषण तंदुरुस्त आहे याचं नक्कीच समाधान वाटलं, तरीही न राहवून मी डॉक्टरांना पुन्हा विचारलं, ‘तो तंदुरुस्त आहे तर मग ती गोळी कशासाठी?’

‘पुढं अती उंचीवर पुन्हा काही त्रास झाला तर जोखीम नको म्हणून ही गोळी!’ डॉक्टरांच्या या वाक्यानं माझ्या मनातील चिंता काही अंशी तशीच राहिली. सुदैवानं काही दिवसांनी भूषण, तसंच आनंद माळी व गणेश मोरे या ‘गिरिप्रेमी’च्या तीन शिलेदारांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा पुन्हा एकदा जगातील सर्वोच्च शिखरमाथ्यावर फडकवला व मोहीम फत्ते केली.

भूषणनं प्रत्यक्षपणे ‘एव्हरेस्ट मॅरेथॉन’मध्ये भाग घेतला नसला तरी ‘एव्हरेस्ट’चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मॅरेथॉनकष्ट’ घेतले एवढं मात्र नक्की.

(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com