हिमालयातले ‘कठीण’ दिवस

माझी २०१० या वर्षापासून खूपच दगदग सुरू होती. ‘प्री-एव्हरेस्ट एक्स्पिडिशन’, ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, २०१२ मधली एव्हरेस्ट मोहीम व नंतरच्या ‘ल्होत्से’, ‘मकालू’ मोहिमांनंतर २०१५ मध्ये थोडी विश्रांती घ्यावी, असा विचार मी केला होता.
हिमालयातले ‘कठीण’ दिवस
Summary

माझी २०१० या वर्षापासून खूपच दगदग सुरू होती. ‘प्री-एव्हरेस्ट एक्स्पिडिशन’, ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, २०१२ मधली एव्हरेस्ट मोहीम व नंतरच्या ‘ल्होत्से’, ‘मकालू’ मोहिमांनंतर २०१५ मध्ये थोडी विश्रांती घ्यावी, असा विचार मी केला होता.

माझी २०१० या वर्षापासून खूपच दगदग सुरू होती. ‘प्री-एव्हरेस्ट एक्स्पिडिशन’, ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, २०१२ मधली एव्हरेस्ट मोहीम व नंतरच्या ‘ल्होत्से’, ‘मकालू’ मोहिमांनंतर २०१५ मध्ये थोडी विश्रांती घ्यावी, असा विचार मी केला होता. त्यानुसार संपूर्ण मे महिना कुटुंबासमवेत कुठंतरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा, असं मी ठरविलं होतं. अर्थातच, अनेक वर्षं मला साद घालणारा हिमालय व त्याला आपल्या पाल्याप्रमाणे जपणारा नेपाळ, याहून चांगलं ठिकाण माझ्या मनात आलंच नाही. माझी बायको अंजू व मुलगा यश यांच्यासमवेत मी २०१५ च्या २४ एप्रिलला नेपाळमध्ये दाखल झालो.

२५ एप्रिलचा सूर्य नेहमीप्रमाणेच उजाडला; पण तो नेहमीप्रमाणे मावळणार नाही, याची तसूभरही कल्पना आम्हा कोणाच्याही ध्यानीमनी नव्हती. सकाळी पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन काठमांडूमधील बौद्धा या भागामध्ये माझा जवळचा मित्र पसांग शेर्पा याच्या घरी आम्ही गेलो. पुण्याहून नेलेली मिठाई त्याला देऊन, पसांगच्या कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी केल्या. पसांगच्या घरून आम्ही थेट विमानतळावर जाणार होतो. नेपाळमधील एका ट्रेकसाठी पुण्याहून आशिष माने २० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येणार होता. या ग्रुपला घेण्यासाठी आम्ही विमानतळावर जाणार होतो.

पसांगच्या घरून टॅक्सीनं विमानतळाकडं जात असताना अचानक खूप मोठा आवाज झाला. गाडीचा टायर फुटला असं वाटलं, म्हणून मी ड्रायव्हरवर चक्क ओरडलोच. टायर तर फुटला नव्हता, मात्र आमची गाडी खवळलेल्या समुद्रात एखादं जहाज कसं हेलकावे खातं, अगदी तशीच हेलकावे खात होती. गाडीच्या बाहेर नजर टाकली, तर लोक जिवाच्या आकांतानं अक्षरशः सैरावैरा पळत होते. समोरच्या इमारती कधीही कोसळू शकतील, इतक्या हलत होत्या. नेमकं काय होतंय, हे कळतच नव्हतं. आम्ही मोठ्या मुश्किलीनं गाडीबाहेर पडलो. सुदैवानं जवळच एक मैदान होतं, तिथं प्रचंड गर्दी जमत होती. आम्ही कसंबसं त्या मैदानावर पोहोचलो. क्षणभर थांबल्यावर असं जाणवलं की, काठमांडूत प्रचंड मोठा भूकंप झाला आहे. जमिनीचा कंप अजूनही जाणवतच होता. असा अक्षरशः जमीन हादरवणारा भूकंप आम्ही कोणीही, कधीही अनुभवलाच नव्हता. अतिशय भयभीत करणारे ते क्षण होते.

आम्ही सुदैवानं मोकळ्या मैदानावर होतो. इथं इमारत कोसळण्याचा धोका नव्हता, मात्र आसपासची परिस्थिती ही धडकी भरवणारी अन् मन हेलावून टाकणारी होती. लहान मुलं, स्त्रिया, अनेक प्रौढ माणसं भीतीनं गलितगात्र होऊन किंचाळत होती. आहे त्या कपड्यावर, आहे त्या परिस्थितीत लोकांनी मैदान गाठलं होतं. जीव वाचला यातच काय ते समाधान होतं.

प्रसंग बाका होता. आपण काही वेळापूर्वी ७.५ ते ८ रिश्टर स्केलच्या महाकाय भूकंपातून वाचलो आहोत, यावर विश्वास बसत नव्हता. या गदारोळातच २० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आशिष काठमांडूत उतरला असेल, हे लक्षात आलं. हे सर्वजण नेमक्या कोणत्या अडचणीत असतील, याची कल्पना देखील करवत नव्हती. काहीही करून या मुला-मुलींना भेटलं पाहिजे, हाच विचार माझ्या मनात आला. आमच्या जवळ विमानतळावर जाण्याचं कोणतंही साधन नव्हतं. वीज नव्हती, फोन बंद पडले होते. कोणाशीही संपर्क होत नव्हता. त्यामुळं ३-४ किलोमीटर लांब असलेल्या विमानतळावर मी, यश आणि अंजू अक्षरशः धावत पळत निघालो. दरम्यान, विमानतळावर सर्वत्र गोंधळ माजला होता.

अनेकांना नेमकं काय झालं आहे हेदेखील समजत नव्हतं. प्रत्येकाला काहीही करून नेपाळ सोडायचं होतं. सर्वत्र तोबा गर्दी होती. यांतून आशिष आणि मुलांना शोधणं हे मोठं आव्हानच होतं. गर्दीतून मार्ग काढत कसंबसं मुलांना व आशिषला आम्ही शोधून काढलं. मुलांचा जीव कावराबावरा झाला होता. काय झालं आहे, तेच त्यांना कळत नव्हतं. सर्वांना घेऊन आम्ही पुन्हा मोकळ्या मैदानावर दाखल झालो. मुलांचं सामान विमानतळावरच अडकलं होतं. अंगावरच्या कपड्यांवर, आहे त्या अवस्थेत पुढचे काही दिवस आम्हा सर्वांना काढावे लागणार होते. दरम्यान, भूकंपाचे छोटे-मोठे धक्के जाणवतच होते.

विमानतळावरील परिस्थिती बघता हवाईमार्गे भारतात जाण्याचा पर्याय बंद झाला होता. रस्त्याच्या मार्गानं जायचं असेल तर सगळी जुळवाजुळव करायला वेळ लागणार होता. काठमांडूत मुक्कामाची सोय करावी लागणार होती. इकडं मात्र, शहरातील घरं, दुकानं, हॉटेल्स ओस पडली होती. छताखाली जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. यातच तुफान पाऊस सुरू झाल्यानं सगळ्यांच्याच अडचणींत आणखी भर पडली. आम्हा सर्वांच्या मुक्कामासाठी मी ‘पीक प्रमोशन’ या नेपाळमधील आमच्या एजन्सीचे प्रमुख केशव पौडीयाल यांना तंबूसाठी विचारणा केली. त्यांच्याकडं काम करणाऱ्या माणसानं मोठ्या हिमतीनं इमारतीत जाऊन आमच्यासाठी तंबूची सोय केली. अतिउंचीवर, हिमाच्छादित प्रदेशात वापरण्यात येणारे तंबू आम्ही मैदानावर उभे करून त्यातच दोन रात्री काढल्या. या दरम्यान खाण्यापिण्याचे आम्हा सर्वांचेच हाल होते. मिळेल ते बिस्कीट खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढावे लागत होते. शाळकरी मुलामुलींना याची सवय नव्हती, मात्र सर्वांनीच कसलीही तक्रार न करता अगदी समंजसपणे आहे त्या परिस्थितीला तोंड दिलं. रस्त्यावाटे भारतीय सीमा गाठण्यासाठी गाड्यांची कशीबशी जुळवाजुळव करून आम्ही काठमांडूतून सोनौली सीमेच्या दिशेनं निघालो. रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. सर्व जण मिळेल त्या वाहनानं प्रवास करीत होते. त्यामुळं ८ ते १० तासांच्या प्रवासाला आम्हाला तब्बल २२ तास लागले. शेवटी आम्ही गोरखपूरला पोहचलो. गोरखपूरहून लखनौ व लखनौहून विमानानं २८ एप्रिलला पुण्यात पोहोचलो. सर्व मुलामुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

या परतीच्या संपूर्ण प्रवासादरम्यान माझं मन मात्र नेपाळला सोडवत नव्हतं. हिमालयाच्या अनेक मोहिमा करताना, आमचं एक वेगळं नातं, या देशाची जोडलं गेलं आहे. आमचे अनेक डोंगरमित्र इथं राहतात, अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकट आल्यानंतर आपण आपल्यापरीनं काहीतरी करावं, हा विचार मनात सतत घोळत होता. म्हणूनच मी संपूर्ण प्रवासादरम्यान आमच्या पुण्यातील ‘गिरिप्रेमीं’च्या सहकाऱ्यांशी संपर्कात होतो. भूषण हर्षे, रूपेश खोपडे व इतर १० जणांचा गट, मी पुण्यात दाखल होण्याआधीच कामाला लागला होता. मी २८ एप्रिलला पुण्यात दाखल झालो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिलला आम्ही नेपाळच्या दिशेनं रवाना झालो. ३० एप्रिलला सकाळी, आमचा १० जणांचा गट तंबू, ‘वॉकीटॉकी’, ‘जीपीएस’ व मेडिकल किट घेऊन काठमांडूमध्ये दाखल झाला. या गटातील सर्वच जण कसलेले गिर्यारोहक होते. त्याचबरोबर त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं रीतसर प्रशिक्षणही घेतलेलं होतं. तसंच, ‘रेडक्रॉस’ या जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रथमोपचाराचं प्रशिक्षणदेखील घेतलं होतं. याआधी याच गटानं २०१३ मध्ये उत्तराखंड महाप्रलयात आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलं होतं.

नेपाळमध्ये परत जाताना काही उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवली होती. नेपाळमधील लोकांना या महाभयंकर आपत्तीतून सावरण्यासाठी धीर देणं, आरोग्य शिबिरं, दवाखान्यांना भेटी देऊन काही रक्ताची आवश्यकता असल्यास त्याची पूर्तता करणं, अजूनही याठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करणं आणि नेपाळच्या ज्या दुर्गम भागामध्ये या भूकंपाचा परिणाम अधिक झाला आहे, तिथं मदत पोहोचविणं. कारण या भागामध्ये जाण्यासाठी ट्रेकिंग करत जावं लागतं, त्यासाठी आमच्या या गटाचा उपयोग जास्त होणार होता. याचबरोबर पुण्यातील एक गट आमच्या मदतीसाठी सज्ज होता. यामध्ये निरंजन पळसुळे, गणेश मोरे आदी लोक आमच्या कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी पुण्यातील बाजू सांभाळत होते.

काठमांडूमध्ये दाखल झाल्यानंतर आम्ही काही भागांची पाहणी केली. यामध्ये ‘धाधिंग’ या अतिदुर्गम व डोंगराळ भागामध्ये काम करण्याची गरज असल्याचं जाणवलं. त्याचबरोबर नेपाळमधील लोकांना सध्या अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे निवारा. त्यासाठी आम्ही ‘टोर्पेलीन’चे तंबू उभारण्यास सुरुवात केली. दुर्गम भागातील लोकांना तात्पुरती राहण्यासाठी व्यवस्था करून दिली. सोबतीला अन्नधान्य आणि खाद्यपदार्थदेखील घेतले. गिरिप्रेमीचा दिनेश कोतकर काही शे किलो सामानाचा ट्रक घेऊन लखनौहून नेपाळमध्ये दाखल झाला होता. आपल्या नेपाळी बांधवांचं आयुष्य पुन्हा एकदा उभारण्यासाठी आम्ही झटलो. नेपाळ ही आम्हा गिर्यारोहकांसाठी कर्मभूमी. इथं आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आम्ही जमेल त्या प्रमाणात अविरत मदतकार्य त्या दिवसांत केलं. आमच्यासारखे अनेक जण कृतज्ञभावनेनं काम करताना आम्हाला भेटले. भूकंपानंतर काही काळानं नेपाळ यातून हळूहळू सावरला. मात्र, ते काही आठवडे अतिशय कठीण आणि आव्हानात्मक होते. माझ्या हिमालयातील काही कठीण दिवसांपैकीच काही दिवस.. ज्यांची आठवण येताच आजही अंगावर शहारे उभे राहतात.

(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com