दिवस असे की…

सन १९७८ मधला तो दिवस मला आजही आठवतो, शाळेच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत मी पहिल्यांदा हिमालयात गेलो होतो. पहिल्या भेटीतच मी हिमालयाचा झालो होतो.
Himalaya
HimalayaSakal
Summary

सन १९७८ मधला तो दिवस मला आजही आठवतो, शाळेच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत मी पहिल्यांदा हिमालयात गेलो होतो. पहिल्या भेटीतच मी हिमालयाचा झालो होतो.

सन १९७८ मधला तो दिवस मला आजही आठवतो, शाळेच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत मी पहिल्यांदा हिमालयात गेलो होतो. पहिल्या भेटीतच मी हिमालयाचा झालो होतो. मी अगदी ९-१० वर्षांचा असताना माझं मातृछत्र हरवलं. त्यामुळं आईचं प्रेम तेवढंस अनुभवलं नव्हतं. मात्र, हिमालयात बागडताना, तेथील निसर्ग न्याहाळताना, डोंगरदऱ्यात पायपीट करताना, रात्री दमून हिमालयाच्या कुशीतच झोपताना आईच्या कुशीत झोपण्याचा भास झाला. अगदी पहिल्या दिवसापासूनच हिमालयानं मला आपलंस केलं होतं. पहिला ट्रेक संपवून मी जेव्हा परतीच्या वाटेला लागलो, तेव्हाच पुन्हा पुन्हा मी हिमालयात येईल, हे मनाशी पक्के ठरवलं होतं.

जसजसं मोठं होतं गेलो, तसतसं हिमालयाची विविध रूपं मला उलगडत गेली. आईचे प्रेम देणारा हिमालय हा कधीकधी बापाप्रमाणे कणखर आणि करारी असल्याचं जाणवत असं. हिमालयात गेल्यावर मला जीवनाचा अर्थ उलगडला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

हिमाचा आलय म्हणजे हिमाचे माहेरघर अशी ओळखच असलेल्या हिमालयानंच मला पाण्याचे महत्त्व पटवून दिले. भारत, नेपाळ, बांगलादेश या देशांत वास्तव्यास असलेली तब्बल ५० कोटी लोकसंख्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे हिमालयातील नद्यांचे निसर्ग चक्र अविरत चालू राहिले तरच मानवी जीवन टिकू शकेल, जगू शकेल हे मला हिमालयामुळंच समजू शकले. हिमालयातील भटकंती, गिर्यारोहण मोहिमा करत असताना अनेकदा साधं एक ग्लास पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तासंतास बर्फ वितळावा लागायचा. यामुळं पाणी किती अमूल्य आहे, हे अनुभवलं.

मानवी जीवनात पाण्याला जेवढे महत्त्व आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्व प्राणवायू अर्थात ऑक्सिजनला आहे. ऑक्सिजन नसेल तर मानवी जीवन हे शून्य आहे, याचा प्रत्यय देखील मला हिमालयातच आला. जेव्हा एव्हरेस्ट शिखराच्या मोहिमेनिमित्त माझ्या संघ सहकाऱ्यांसोबत साऊथ कोल या ८ हजार मीटरहून अधिक उंच ठिकाणी असलेल्या डेथ झोनमध्ये होतो, तेव्हा हवेतील प्राणवायूचे प्रमाण हे अत्यंत विरळ होते. अशा ठिकाणी फार वेळ थांबणे धोकादायक ठरू शकते. मात्र, आम्हाला हवामान बिघडल्यामुळे तब्बल ३६ पेक्षा जास्त तास एकाच ठिकाणी तंबूत बसून काढावे लागले. बाहेर ताशी शंभर किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, या वादळात आम्ही काहीही करू शकत नव्हतो. प्रसंग बाका होता. सतत कृत्रिम प्राणवायूच्या आधारानेच एक एक मिनिट कसा बसा आम्ही जगत होतो. तेव्हा प्राणवायूचे खरे महत्त्व कळून चुकलं.

हिमालयातील अतिउंचीवरील शिखरांच्या मोहिमेत तंबूत राहताना, तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर चढवलेल्या अतिजाड कपड्यांमध्ये वावरताना, दुरून पाहिल्यावर मनमोहक दिसणारे हिम, जेव्हा चहूकडे पसरते आणि पांढऱ्या हिमाशिवाय दुसरे काहीच आजूबाजूला दिसत नाही, तेव्हा एकसुरी वातावरणाचा नको असलेला अनुभव घेताना आपले रोजचे आयुष्य किती सुखवस्तू आहे, हेच जाणवत होते. हिमालयात सफर करत असताना भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना देखील करावा लागला. यांमुळे आपले आयुष्य किती क्षणभंगुर असू शकते हे जाणवले. हे सर्व अनुभव मला ‘हिमालयातील दिवसां’त आले, ज्यांनी माझा जगण्याचा दृष्टिकोन बदलला.

हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांसोबतच मी मनसोक्त पायपीट देखील केली आहे. या प्रवासात भेट दिलेली मंदिरे, आश्रम, भेटलेले तपस्वी योगी यांमुळे माझ्यातील श्रद्धा जागृत राहिली. येथे मिळणारे आध्यात्मिक समाधान

शब्दातीत आहे. हिमालयात असलेल्या निसर्गामुळे नेहमीच हरखून गेलो आहे. प्रत्येक भेटीत मला हिमालय वेगळा वाटला आहे, आपला वाटला आहे. कित्येकदा माझ्या मनात चालू असलेला कोलाहल हिमालयाच्या एका भेटीने शांत झाला आहे. आयुष्यात न उलगडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे हिमालयात गेल्यावर आपसूक मिळाली आहेत. हे असे का होत असेल, याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला जाणवले, हिमालयाने मला माझ्याशी संवाद साधण्याचे कसब आत्मसात करण्यास मदत केली. अगदी पहिल्या भेटीपासून हिमालयात गेल्यावर मी माझ्यातील ‘मी’ला मोकळं सोडतो, म्हणूनच मला ‘मी’ गवसतो.

हिमालयानं मला अनेक अवलिया माणसं दिली, ज्यांना मी आज माझं कुटुंब म्हणू शकतो. हिमालयानं मला अनेक मित्र दिले. विविध वयाचे, विविध पार्श्वभूमीतून आलेले, वैविध्यपूर्ण संस्कृतीचा भाग असलेले अनेकांशी माझा स्नेह जोडला गेला, तो फक्त हिमालयामुळंच. आमच्यात काही एक साम्य असलं, तर ते म्हणजे केवळ हिमालयावर असलेलं प्रेम. हिमालयात राहणाऱ्या, हिमालयाचे पुत्र असलेल्या शेर्पा बांधवांनी मला नव्या संस्कृतीची ओळख करून दिली.

हिमालयात भेटलेल्या ‘पहाडी’ लोकांनी हिमालयाएवढं भरभरून प्रेम दिलं. हिमालय आहे, गिर्यारोहण आहे म्हणूनच मी गिरिप्रेमी परिवाराचा भाग होऊ शकलो. आज माझ्यासाठी गिरिप्रेमी हे एक खूप मोठे कुटुंब आहे. हिमालयाशी माझी नाळ जोडल्या गेली नसती तर कदाचित मी कधीच ‘गिरीप्रेमी’ होऊ शकलो नसतो. हिमालयामुळं मला समाजाचं, लोकांचं प्रेम मिळालं. हिमालय जर नसता तर माझे आयुष्य नक्कीच वेगळे असते. त्यामुळे हिमालयाचा मी कायम ऋणी असेल.

आज हे सगळे मांडण्याचे कारण म्हणजे ‘हिमालयातील दिवस’ आपल्या समोर उलगडण्याचा या टप्प्यातील हा शेवटचा लेख. गेल्या मे महिन्यात ‘एव्हरेस्ट दिना’च्या निमित्ताने ‘हिमालयातील दिवसां’ची सफर सुरु झाली ती आता वर्षाअखेरीस थांबते आहे. सकाळ परिवाराने दिलेल्या या संधीमुळे माझे आयुष्य बदलवणारा, माझे आयुष्य घडविणारा हिमालय, या हिमालयातील विविध अनुभव वाचकांसमोर मांडू शकलो. आपला हा ऋणानुबंध यापुढेही असाच राहील.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com