माउंट मेरूचं आव्हान पेलताना!

गिरिप्रेमीच्या संघानं माउंट मेरू शिखराच्या पश्चिम बाजूनं शिखर चढाई करण्याचा जगातील पहिला प्रयत्न केला त्याची ही कहाणी.
Mount Meru
Mount MeruSakal

गिरिप्रेमीच्या संघानं माउंट मेरू शिखराच्या पश्चिम बाजूनं शिखर चढाई करण्याचा जगातील पहिला प्रयत्न केला त्याची ही कहाणी. गढवाल हिमालय म्हणजे राकट, रांगडा अन् तेवढाच मनमोहक. इथं शिवलिंग, सतोपंथ, केदारडोम, चौखंबा, थलाई सागर, भ्रिगू पर्वत, मेरू, सुदर्शन, वासुकी, सतोपंथसारखी दिसायला नितांतसुंदर; पण चढाईसाठी तेवढीच अवघड शिखरं आहेत.

गिरिप्रेमीच्या चार दशकांच्या प्रवासामध्ये गढवाल हिमालयातील गिरिशिखरांनी नेहमीच भुरळ घातली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गिर्यारोहकांनी शिवलिंगसारख्या तांत्रिकदृष्ट्या अवघड शिखरावर चढाई केली. तसंच सुदर्शन व मंदा-१ या शिखरांवरदेखील आरोहण केलं. माउंट मंदा शिखर चढाईचं स्वप्न तर आम्ही तीन दशकं उराशी बाळगलं.

१९८९ व १९९१ या दोन वर्षी मंदा शिखर मोहीम केली, मात्र म्हणावं तसं यश आलं नाही. शेवटी २०२१ मध्ये गिरिप्रेमीच्या तरुण व कसलेल्या गिर्यारोहकांनी मंदा शिखरावर तिरंगा फडकावला व मंदा-१ शिखराच्या ईशान्य धारेनं चढाई करणारा भारतातील पहिला संघ हा मानदेखील मिळविला.

माउंट मंदा-१ची यशस्वी चढाई म्हणजे गिरिप्रेमीच्या निष्णात गिर्यारोहकांच्या गिर्यारोहण कौशल्यांवर झालेलं शिक्कामोर्तब होतं. चढाई कितीही कठीण असो, योग्य तयारी, आत्मविश्वास व नेमकं कुठं थांबलं पाहिजे याची जाण असली की, कोणतंही मोठं आव्हान यशस्वीरीत्या पेललं जाऊ शकतं, हेच मंदा मोहिमेचं सार होतं. एव्हरेस्ट, ल्होत्से, कांचनजुंगा, मकालू, धौलागिरी, ल्होत्से, मनासलू, अन्नपूर्णा या अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्याचा अनुभव होताच, मंदा मोहिमेमुळे आमच्या गिर्यारोहकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. याचाच परिपाक म्हणजे माउंट मेरू मोहीम.

माउंट मेरूचा उल्लेख पुराणांमध्ये करण्यात आला आहे. स्कंद पुराणामध्ये अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथनाचं जे वर्णन करण्यात आलं आहे, त्यात समुद्र घुसळण्यासाठी रवी म्हणून वापरण्यात आला तो मेरूदंड म्हणजे हा मेरू पर्वत. संस्कृत भाषेमध्ये पर्वताला मेरू असंच संबोधतात, त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून हिमालयातील शिखरांचं महत्त्व मोठं आहे.

गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात तपोवन भागामध्ये शिवलिंग, थलाई सागर, भ्रिगू पर्वत यांच्या साथीनं माउंट मेरूचं भव्यदिव्य रूप उठून दिसतं. मेरू पर्वत शिखराची ख्याती अभेद्य अशी आहे. येथील चढाई ही एव्हरेस्टच काय, इतर अनेक अष्टहजारी शिखरांपेक्षा कैक पटीनं आव्हानात्मक आहे.

तीन शिखरांचा समूह असलेल्या मेरू इथं दक्षिण शिखर ६६६० मीटर उंच आहे, मध्य शिखर ६३१० मीटर उंच आहे, तर उत्तर शिखर ६४५० मीटर उंच आहे. तुलनेनं उंची जरी कमी असली तरी येथील आव्हानं इतकी खडतर आहेत की, अनुभवी गिर्यारोहकदेखील फार काही मेरूच्या वाटेला जात नाही. अर्थातच यात भारतीयांचं प्रमाणदेखील नगण्य आहे. त्यामुळे आमच्यासाठी माउंट मेरू मोहीम सर्वार्थानं नवी असणार होती. त्यात आम्ही दक्षिण शिखरावर पश्चिम बाजूनं चढाई करणार होतो. याआधी पश्चिम बाजूनं मेरू शिखरावर कधीही चढाई झाली नव्हती.

मेरू मोहिमेची तयारी आम्ही वर्षभर आधीपासून करत होतो. कसलेल्या व अनुभवी गिर्यारोहकांचा संघ जोमानं शारीरिक व मानसिक तंदरुस्तीच्या तयारीला लागला होता. मात्र, खरं आव्हान होतं सामानाची जुळवाजुळव आणि त्याचं दळणवळण. आम्ही मेरू शिखराच्या मागच्या बाजूनं, म्हणजे पश्चिम बाजूनं चढाई करणार होतो. कीर्ती बमक ग्लेशियरच्या बाजूनं ही चढाई होणार होती.

अतिशय दुर्गम भागांतून आम्ही चढाई करणार होतो. या बाजूला मानवाचा पदस्पर्श तसा कमीच आहे, गेली अनेक वर्षं अगदी बोटांवर मोजण्याइतक्या व्यक्तींशिवाय कुणी इकडं फिरकलंदेखील नसेल, याची प्रचिती येत होती. अशा ठिकाणी सामान पोहोचवणं म्हणजे दिव्यच होतं. बरं, हा आमच्या मोहिमेचा अर्धा भाग होता.

पश्चिम बाजूनं चढाई झाल्यावर आम्ही पूर्व बाजूनं शांग्रीला मार्गाच्या डावीकडील मार्गानं मेरू शिखर समूहापैकी दक्षिण शिखर गाठणार होतो, त्यामुळे आम्हाला लॉजिस्टिकची खूप मोठी तयारी करावी लागणार होती. गिर्यारोहणाचं उत्तम दर्जाचं साहित्य विदेशातून आणण्याची हालचाल सुरू होती.

सोबतीला अन्नधान्य व इतर सामान यांचीदेखील सोय करावी लागणार होती. यासाठी लागणारा आर्थिक निधी हा लाखोंच्या घरात होता. या वेळी गिरिप्रेमीचे पाठीराखे व हितचिंतक तर धावून आलेच, सोबतीला ‘पी क्यूब इंटरप्राइजेस’, ‘परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन’, ‘वर्ल्ड ऑइलफिल्ड मशिन’, मुंबईचे हावरे बिल्डर्स यांनी आर्थिक डोलारा सांभाळला.

आम्ही या वेळी भारतीय बनावटीचे दोरखंड मोठ्या प्रमाणात वापरले. ‘नमः रोप्स’ यांनी बनविलेले दोरखंड हे आंतरराष्ट्रीय प्रतीच्या दोरखंडाइतकेच मजबूत व टिकाऊ होते, हे मला विशेष नमूद करावंसं वाटतं. तब्बल ७ हजार मीटर लांबीचा दोरखंड आम्हाला आवश्यक होता. हे सर्व सामान आम्ही उत्तरकाशी - गंगोत्रीला पुण्यातून पाठवलं.

आम्हाला मोहिमेत सपोर्ट करणारी ‘व्हाइट मॅजिक ॲडव्हेंचर्स’ या संस्थेनं तब्बल १७०० किलो सामान पश्चिम व पूर्व बाजूच्या बेस कॅम्पवर पोहोचविण्यात मदत केली. यात आमच्या सगळ्या पोर्टर्सने घेतलेले कष्ट शब्दातीत आहेत. ४० हून अधिक पोर्टर्सनी हे सामान बेस कॅम्पवर पोहोचवण्यात मदत केली.

आम्ही मोहिमेवर असतानादेखील गंगोत्रीपासून बेस कॅम्पपर्यंत सामानाची ने-आण नियमित सुरू होती. कीर्ती बमक ग्लेशियर, जिथं आमचा बेस कॅम्प होता, ती जागा अत्यंत दुर्गम आहे. या ठिकाणी सामानाची ने-आण करणं म्हणजे मोठं दिव्यच आहे. बेस कॅम्पची दुर्गमता बघून आणि तिथं पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट बघता सुरुवातीला पोर्टर्सचा नकारात्मक सूर होता.

आम्ही त्यांची भावना समजू शकत होतो, कारण पाठीवर सामान घेऊन दुर्गम भागात ट्रेक करणं तसं अवघडच होतं. मात्र, मी त्यांना भावनात्मक साद घातली. ‘‘मेरूच्या पश्चिम बाजूनं होणारी चढाई ही भारतातूनच नव्हे, तर जगातून होणारी पहिली चढाई आहे, हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्हाला तुमचाही सहभाग महत्त्वाचा आहे,’’ असं म्हटल्यावर पोर्टर्सदेखील कुठलीही द्विधा मनात न ठेवता मोहिमेत सहभागी झाले.

आम्ही उत्तमप्रकारे अक्लमटाइज होऊन बेस कॅम्पला पोहोचलो होतो. ४४०० मीटर उंचीवर आमचा बेस कॅम्प होता. ५००० मीटरवर ॲडव्हान्स बेस कॅम्प, पुढं ५५०० मीटर कॅम्प-१ व जवळपास ६००० मीटरवर समिट कॅम्प लावण्याचं आमचं नियोजन होतं. आमचा संघ शेर्पांच्या साथीनं शिखरावर रूट ओपन करणार होता. म्हणजे टप्प्याटप्प्यानं शिखरमाथ्यापर्यंत दोरखंड लावणार होता व चढाई करणार होता.

मेरूसारख्या दुर्गम शिखरावर, त्यात पुन्हा संपूर्णपणे नवीन मार्गानं चढाई करताना चढाई मार्ग निश्चित करण्याची जबाबदारी गिर्यारोहकांनाच घ्यावी लागते. एव्हरेस्ट किंवा इतर अष्टहजारी शिखरांवर हा दोरखंड शेर्पांचा संघ मोसमाच्या सुरुवातीलाच लावतो व मार्ग निश्चित करतो. गिर्यारोहकांना या दोरखंडाच्या आधारानं चढाई करायची असते.

इथं मेरूला मात्र मार्गनिश्चितीची जबाबदारी आम्हा गिर्यारोहकांवरच होती. तब्बल २००० मीटरहून अधिक लांबीचा मार्ग आम्हाला निश्चित करावा लागणार होता. त्यासाठी आवश्यक सामान यामध्ये दोरखंड, रॉक पिटॉन्स, आइस पिटॉन्स आणि इतर अनेक तांत्रिक साधनं टप्प्याटप्प्यानं आम्हाला वरच्या कॅम्पवर पोहोचवायचं होतं. यासाठी हाय अल्टिट्यूट पोर्टर्ससोबत आमच्या संघातील सदस्य बेस कॅम्पपासून एक-एक फेऱ्या करत होते. आम्ही सर्वंकष तयारी करून आलो होतो, नियोजनदेखील काटेकोर होतं, मात्र निसर्गाची साथ नव्हती. या वर्षी संपूर्ण हिमालयातच अत्यंत लहरी हवामान बघायला मिळालं.

आमच्या चढाईचं नियोजन दोन टप्प्यांत होतं. संघातील विवेक शिवदे, पवन हडोळे, वरुण भागवत, आशिष माने व सोबतीला मिंग्मा शेर्पा अशी तुकडी पुढं जाऊन दोरखंड लावत असे व त्यांच्या पाठोपाठ कृष्णा ढोकले, हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगचे माजी उपप्राचार्य देविदत्त पंडा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग येथील वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसैन इतर रसद या सदस्यांना पुरवत असत.

आम्हाला २ हजार मीटरहून जास्त लांबीचा दोरखंड लावायचा होता. १०० मीटरच्या दोरखंडाचं वजन पाच- सात किलो होत असे. त्यात हिमवृष्टीमुळे हा दोरखंड ओला झाला तर हेच वजन १०-१२ किलोंच्या घरात जात असे. दोरखंडासोबतच पिटॉन्स व इतर साहित्याचं वजन तर वेगळंच. या वजनासह ३-४ फूट हिमांतून मार्ग काढणं अगदी थकवणारं होतं.

मात्र, आमचा संघ चांगल्या तयारीचा होता. थकवा आला आहे, म्हणून कुणी एकानंही तक्रार केली नाही. एकवेळ तर अशी होती की, आमचा संघ सलग चार रात्री ५५०० मीटर उंचीवरील कॅम्प-१वर होता, कारण हिमवर्षाव थांबण्याचं नाव घेत नव्हता. हिमप्रपाताची भीती तर होतीच, मात्र सोबतीला ब्लू आइसवर साठलेला चार फूट हिमाचा थर आमची भीती वाढवत होता.

जेव्हा जेव्हा आम्ही शिखरमाथ्याच्या मार्गावर दोरखंड बसविण्यासाठी व अँकर लावण्यासाठी टणक भाग शोधात असून, तेव्हा कमीतकमी २-३ फूट हिमांतून मार्ग काढावा लागत असे. त्यातूनही पिटॉन्स टॅन्क बर्फावर बसतील की नाही याची शाश्वती नसे. हे पिटॉन्स मजबूत बसणं व त्यावर अँकर लावता येणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या जोरावरच गिर्यारोहक चढाई करू शकतो.

हा जर अँकर निसटला, तर गिर्यारोहक खोल दरीत कोसळलाच म्हणून समजा. इथं तर ७०-८० अंश कोनातील खडी चढण होती, एक छोटी चूक काही काही हजार मीटर खाली कोसळण्याची भीती. म्हणूनच शिखरमाथा अगदी जवळ आला असला तरी कोणतीही रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती. हिमानं वेढलेल्या तंबूत, हिमवर्षावाच्या सान्निध्यात गिर्यारोहक नेटानं बसून होते, एकदा कुठंतरी सूर्यदर्शन होईल, उष्णता येईल, वातावरण निवळेल आणि चढाईची संधी मिळेल, या आशेत.

शेवटच्या दिवशी दिवसभर हवामान चांगलं होतं, आकाश निरभ्र होतं, त्यामुळे शिखर चढाई सत्यात उतरेल असं वाटलं. आम्ही बेस कॅम्पवर पुण्यातून हवामान अहवाल मागवला होता. आजची रात्र आशेचा किरण घेऊन येईल असं वाटलं. मात्र झालं भलतंच. कोणतीही शक्यता नसताना रात्री ८ ते पहाटे ३ कॅम्प-१वर इतका हिमवर्षाव झाला की, संघाला तंबूत हालचाल करणंही अवघड झालं.

आम्ही इकडं बेस कॅम्पवर नेमकं काय घडतंय, याच विचारात रात्रभर जागे होतो. संघ वर गेला का, त्यांनी शिखर चढाई केली का, किती जोरात हिमवर्षाव असेल, यातून मार्ग सापडेल का... या नानाविध विचारांचं माझ्या डोक्यात काहूर माजलं होतं. शेवटी पहाटे विवेक शिवदेचा सॅटेलाइट फोनवर संपर्क झाला, त्याने सांगितलं की, हिमवर्षाव थांबायचं नाव घेत नाही. म्हणून आम्ही तंबूतच बसून आहोत. माझ्या जिवात जीव आला.

शिखर चढाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची. पाचवा दिवस उजाडला तरी हवामान साथ देण्याचं नाव घेत नव्हतं. पुढील हवामान अंदाजदेखील फारसा अनुकूल नव्हता. आम्ही सगळ्यांनी एकत्र चर्चा केली आणि खाली परतण्याचा निर्णय घेतला. शिखरमाथा अवघ्या ४०० मीटरवर असताना संघाला खाली यावं लागलं. आमचा संघ तयारीचा होता, यातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट, कांचनजुंगासारख्या कठीण अष्टहजारी शिखरांवर चढाई केली होती.

त्यामुळे अनुभव व कौशल्यं यांचा उत्तम संगम त्यांच्याकडं होता. तरीही निसर्गामुळे मेरूचा शिखरमाथा गाठता आला नाही. तरीदेखील मोहीम यशस्वी झाली असंच मी म्हणेन. ज्या मार्गानं शिखर चढाई करण्याचा विचारदेखील गिर्यारोहक करत नाहीत, तिथं येऊन मार्गनिश्चिती करून ६२०० मीटर चढाई करणं, म्हणजे एव्हरेस्ट शिखर चढाईइतकं यश आहे, असं मी म्हणेन.

म्हणूनच आजपर्यंत अंदाजे ८ हजार वेळा यशस्वी चढाई झालेल्या एव्हरेस्टच्या तुलनेत मेरूवर फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या कमी चढाया झाल्या आहेत. एव्हरेस्ट व इतर शिखरांचं आव्हान विरळ हवामान आहे, तर मेरूसाठी कौशल्यं व जिद्द यांचा संगम लागतोच, सोबत हवामानाची साथ हवी, नाहीतर शिखर चढाईचं निर्भेळ यश हुलकावणी देऊ शकतं.

शिखरमाथा कितीही जवळ असला तरी सुरक्षितता प्रथम हे आम्ही नेहमी पाळत आलो आहोत. म्हणूनच शिखराच्या अवघ्या ४०० मीटरहून खालून आम्ही परत फिरलो. बेस कॅम्पहून माउंट मेरूचा निरोप घेताना आम्हा सर्वांचे कंठ दाटून आले होते; मात्र सर्वांनी भावनांना आवर घातला व तपोवनच्या दिशेनं मार्गस्थ झालो.

सर्व योग जुळून आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या मोहिमेतून पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं. मात्र, मेरूसारख्या अभेद्य पर्वताच्या पश्चिम बाजूनं चढाई करण्याचा विचार करणं, हा विचार सत्यात उतरविणं व जगातील पहिलावहिला प्रयत्न करणं, ही कृतीच मुळातच धाडसी आहे, त्यामुळे गंगोत्रीला परतल्यावर गंगामय्याचं दर्शन घेताना मी मनोमन प्रार्थना केली की मेरूचं आव्हान पेलण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, तू अशीच कृपादृष्टी ठेव!

(लेखक गिरिप्रेमी संस्थेच्या हिमालयीन गिर्यारोहणाच्या मोहिमांचे नेते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com