भागीरथी : समूह चार शिखरांचा

उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालय म्हणजे नंदनवनच. इथं वसलेली शिखरं नितांत सुंदर आहेत.
Uttarakhand Bhagirathi
Uttarakhand Bhagirathisakal

उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालय म्हणजे नंदनवनच. इथं वसलेली शिखरं नितांत सुंदर आहेत. विस्तीर्ण पसरलेली, हिमाची दुलई पांघरलेली, कोवळ्या सोनकिरणांना कवेत घेणारी ही शिखरं भारताच्या वैभवशाली इतिहासाची, जडणघडणीची साक्ष देतात. त्यांचं भौगोलिक महत्त्व हे देखील वादातीत आहे. या शिखरांमधील एक आघाडीचं नाव म्हणजे भागीरथी.

स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणणारा राजा म्हणजे भगीरथ, सूर्यवंशी घराण्यातील या राजाच्या नावावरून जो पर्वत समूह ओळखला जातो तो भागीरथी. हा मुळात चार शिखरांचा समूह आहे. भागीरथी -एक (६८५६ मीटर), भागीरथी - दोन (६५१२ मीटर), भागीरथी-तीन (६४५४ मीटर) व भागीरथी -चार (६१९३ मीटर) अशी या शिखरांची नावं. ही सर्व शिखरं चारही बाजूनं विविध ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्यांनी वेढलेली आहेत.

पूर्वेला वासुकी, पश्चिमेला गंगोत्री, दक्षिणेला स्वच्छंद तर उत्तरेला चतुरंगी अशी चार ग्लेशियर्स आहेत. यातील गंगोत्री ग्लेशियर हे सर्वांत मोठं. या ग्लेशियर मधूनच पुढं गोमुख तयार होतं व तेथून सुरू होते भागीरथी नदी, जी पुढं जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास करून देवप्रयागला अलकनंदा नदीशी एकरूप होते अन् गंगामातेचे रूप धारण करते.

सियाचीननंतर आशिया खंडातील सर्वांत मोठं ग्लेशियर अशी ओळख असलेलं गंगोत्री ग्लेशियर हे भागीरथी व अर्थात गंगा नदीचं मुख्य स्रोत आहे. हे संपूर्ण ग्लेशियर भागीरथी पर्वत समूहाचं विस्तारित रूप वाटावं एवढं एकरूप झालेलं आहे, म्हणूनच कदाचित या ग्लेयशीरमधून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी हे नाव दिलं गेलं असावं. भागीरथी शिखर समूह व गंगोत्री ग्लेशियर परस्परपूरक आहेत असं माझं मत आहे.

सहा हजार मीटरहून उंच असलेली चार शिखरं आजूबाजूला उभी असल्यानं गंगोत्री ग्लेशियर विस्तीर्ण असं रूप धारण करू शकलं, जे पुढे २५ कोटींहून अधिक लोकांची जीवनदायिनी असलेल्या गंगा नदीचं मुख्य स्रोत बनलं. मी गेल्या पाच दशकांत अनेक वेळा गंगोत्री येथे गेलो आहे. ग्लेशियरचं बदलणारं रूप मी अनुभवतो आहे. काही दशकांपूर्वी डोळ्यात न सामावणारे गंगोत्री हळूहळू विरळ होताना दिसतं आहे, त्यामुळे भागीरथी शिखर समूह तुलनेने जवळ आल्याचा भासतो.

भागीरथी पर्वत समूह व आजूबाजूचा परिसर हा अत्यंत पवित्र मानला जातो. तपोवन परिसर हा अनादी काळापासून ऋषीमुनींच्या तपश्चर्येचं आद्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आजही मी जेव्हा तपोवनला जातो, तेव्हा विविध साधू, ऋषी अत्यंत विपरीत हवामानामध्येही दृढ निश्चयानं आपला ध्यास पूर्णत्वास नेताना दिसतात.

या परिसरात गेल्यावर वाटणारी प्रसन्नता ही कदाचित तिथं असणाऱ्या हवेत वर्षानुवर्षे रुळलेली आहे, असं मला नेहमी वाटतं. मी जेव्हा मोहिमेसाठी या परिसरात जातो, तेव्हा येथे असणारी प्रसन्नता व सकारात्मकता मला पूर्ण मोहिमेसाठी शिदोरी म्हणून कामी येते, असा माझा अनुभव आहे.

गिर्यारोहणाच्या दृष्टीनं देखील भागीरथी शिखर समूह हा नावाजलेला आहे. भागीरथी - एक पासून भागीरथी- चारपर्यंत चारही शिखरांवर चढाई करणं तसं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. यात पहिल्या शिखरावर चढाई करताना गिर्यारोहकांचा जास्त कस लागतो. १९८० मध्ये जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संघानं दक्षिण-पूर्व धारेनं शिखरावर पहिल्यांदा यशस्वी चढाई केली. यांत तब्बल दोन हजार मीटर चढाई ही तंत्रशुद्ध कौशल्य पणाला लावणारी बाब होती.

आजही भागीरथी-एक या शिखरावर चढाई करण्यासाठी अगदी मोजक्याच गिर्यारोहकांचे पाय वळतात, कारण येथील काठिण्य पातळी. त्या मानानं भागीरथी-दोन हे शिखर गिर्यारोहकांना लवकर आपलंस करतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, ६५१२ मीटर उंच असलेल्या या शिखरावर गिर्यारोहकांचा राबता तुलनेनं जास्त आहे. गिरिप्रेमीच्या विविध संघानी आतापर्यंत तीन वेळा भागीरथी-दोन या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.

या शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली ती तब्बल नऊ दशकांपूर्वी. १९३३ मध्ये, जेव्हा गिर्यारोहण हे फारसं रुळलं देखील नव्हतं तेव्हा ऑस्ट्रियन गिर्यारोहक द्वयी असलेल्या एडी एलमॉथलर व टोनी मेसनर यांनी विजयी झेंडा भागीरथी-दोन शिखरावर फडकविला होता. त्याच वर्षी ब्रिटिश जोडगोळी कोलिन किर्कस व चार्ल्स वॉरेन यांनी ६४५४ मीटर उंच असलेल्या भागीरथी-तीन शिखरावर चढाई यशस्वी केली.

त्यामानाने भागीरथी-चार हे शिखर तसं दुर्लक्षित राहिलं. उंचीनं कमी असलं तरी सतत बदलणारं हवामान, तीव्र चढाई मार्ग यांमुळं पहिला यशस्वी समिट अटेम्प्ट आला तो तब्बल २००९ मध्ये, जेव्हा स्लोव्हेनियन गिर्यारोहक रॉक ब्लॅगस, लूज लिंदीच व मार्को प्रॅझॉज यांनी शिखर चढाई यशस्वी केली. याआधी भागीरथी-चार हे शिखर चढण्यासाठी सिल्व्हो कारो व मॅटजॅझ जामनिक यांनी तब्बल ११ अयशस्वी प्रयत्न केले. मात्र त्यांना शिखरमाथ्यानं नेहमी हुलकावणी दिली.

भागीरथी शिखर समूह हा अत्यंत सुंदर अशा शिखरांनी वेढलेला आहे. एका बाजूला वासुकीसारखा बलाढ्य पर्वत तर दुसऱ्या बाजूला शिवलिंगसारखं मनमोहक शिखर. आम्ही जेव्हा गढवाल हिमालयातील शिखर मोहिमांवर जातो, तेव्हा भागीरथीच्या चार शिखरांचं दर्शन ठरलेलं. शिवलिंग शिखर चढाई करताना कॅम्प एकच्या वर गेल्यावर पूर्वेला दिसणारी व सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हालेली चार टोकं, अर्थात भागीरथी शिखरं ही आम्हाला वेगळीच ऊर्जा देतात.

गिर्यारोहणच नव्हे तर गढवाल हिमालयात तपोवन असो, भोजबासा ट्रेक करताना भागीरथी शिखर मन मोहून टाकतात. या परिसरात येणारे गिर्यारोहक असो वा भाविक यात्रेकरू, भागीरथी पर्वत समूह बघून हरखून जातात, त्याच्या समोर नतमस्तक होतात.

निसर्गाचं सुंदर रूप अनुभवण्यासाठी, आपल्या देवदेवतांच्या इतिहासातील घटनांची साक्ष अनुभवण्यासाठी, जीवनदायिनी गंगामातेच्या उगमासाठी कारणीभूत असलेल्या भागीरथी शिखरांना एकदा तरी ‘याची देही याची डोळा’ बघायला हवं.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com