
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
कुठल्याशा जवळच्या लग्नातील हा प्रसंग. काॅलेजमध्ये असेन मी. जेवणं आणि पाठवणी यामधील वेळात बायका गोल करून खुर्च्यांवर बसल्या होत्या. बहुतेकींच्या मांडीवर पर्स होतीच. मग त्यांची मुलं किंवा नवरे अधूनमधून येऊन काही ठेवायला द्यायचे. किंवा कुणी काही मागितलं, तर ती वस्तू पर्समधून बाहेर यायची आणि दिली जायची. म्हटलं, अरेच्चा ही पर्स आहे की अलिबाबाची गुहा! कारण खेळायचा चेंडू, लवंग, चष्म्याची केस, रिकामी पिशवी अशा विविध वस्तू आतबाहेर येत-जात होत्या. सगळं काही ती पर्स सामावून घेत होती आणि मागितलेली वस्तू चुकून घरीच राहिली असं कधीच घडत नव्हतं. ती पर्स तिची असली तरी अवघं कुटुंब त्या एका वस्तूने जोडलं होतं.