लुगड्याची घडी...

गावाकडे पूर्वी फार सुंदर पद्धती होत्या. माणसं एकमेकांच्या सुख-दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होत.
Lugad
Lugadsakal
Updated on

गावाकडे पूर्वी फार सुंदर पद्धती होत्या. माणसं एकमेकांच्या सुख-दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होत. आज मोठ्या शहरात चार-पाच खोल्यांच्या घरात राहणारी माणसंही एकमेकांशी फक्त ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर बोलतात, तेव्हा गावाकडची जुनी माणसं आठवतात, जी केवळ वरवर बोलत नव्हती, तर अगदी मनाने जोडलेली होती.

त्या काळात कपड्यांचा दिखावा करण्याची पद्धत नव्हती. कपड्यांना प्रतिष्ठेचा मुद्दा मानलं जात नसे. अंग झाकलं की झालं, एवढीच साधी भावना होती. त्यामुळे नवा कपडा घेतला की, त्याचं खूप अप्रूप वाटायचं.

पूर्वी गावात नव्या कपड्यांचा फारसा प्रघात नव्हता. मोठ्याचे कपडे बारक्याला अशी जणू परंपराच होती. आजेसासू तिच्या लग्नात नेसलेलं लुगडं नातसूनेपर्यंत टिकवायची. कधी तरी सणासुदीला, लग्न कार्याला किंवा खास प्रसंगीच नवीन कपडे घेतले जायचे, पण कपडे घेणं हे खूप मोठं आर्थिक ओझं होतं. अगदी बिनमहत्त्वाचे काम म्हणून त्याकडे पाहिलं जायचं.

त्यातूनही जर नवीन कपडे जर घ्यायचे म्हटलेच, तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतेक वेळा गणवेशच घेतला जायचा. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट हेच अनेकांसाठी दिवाळीचा, लग्नाचा आणि शाळेचा ड्रेस होता. तो शुभप्रसंगीही घालायचा आणि नंतर शाळेतही वापरायचा.

जेव्हा असा नवा गणवेश घालून एखादा मुलगा किंवा मुलगी वर्गात आली की, वर्गातली पोरं न चुकता त्याच्या पाठीवर नऊ बुक्के मारायचे. हा प्रकार गंमतीचा वाटत असला, तरी त्यात एक प्रकारचं आजच्या भाषेत ज्याला आपण ‘सेलेब्रेशन’ म्हणतो ते असायचं. कारण त्या नव्या कपड्यांमागे एका संपूर्ण घराचा त्याग, मेहनत आणि काटकसर असायची. बुक्के खाल्ल्यावरही मुलं आनंदी असायची, कारण त्यांच्या अंगावर नवीन कपडे असायचे.

असंच काहीसं महिलांच्या बाबतीतही. खरं तर ग्रामीण भागात नव्वदच्या दशकात महिलांसाठी नवीन लुगडं मिळणं हा मोठा आनंद असायचा, पण प्रत्येक सासुरवाशिणीला दरसाल नवं लुगडं मिळेलच असं नव्हतं. काहींच्या माहेरची परिस्थितीच तशी नसायची की, त्यांनी आपल्या मुलीला दरसाल नवं लुगडं घ्यावं. त्यामुळे अनेक महिलांना नवा कपडा बऱ्याच वर्षांनी एखाद्याच सणाला मिळायचा.

त्या काळी एक सुंदर पद्धत होती अन् ती म्हणजे ज्या महिलांना नवीन लुगडं मिळायचं, त्या स्वतः पहिल्यांदा त्याची घडी मोडत नसत. कारण नवा कपडा घडी मोडण्याचा आनंद दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा ही सुंदर भावना त्यामागे होती. मग गावातल्याच एखाद्या गरीब महिलेला जिला सहसा नवीन लुगडं मिळत नाही अशा गरीब महिलांना ते लुगडं घडी मोडण्यासाठी दिलं जायचं.

त्या गरीब महिलेला काही काळ का होईना, नवा कपडा नेसायला मिळायचा. त्या आनंदानं ती स्त्री भारावून जायची. दिवसभर ती ते लुगडं खूप आनंदानं गावभर मिरवायची, पण मिरवताना लुगड्याला डाग लागू नये म्हणून फार जपायची. दुसऱ्या दिवशी ते लुगडं स्वच्छ धुवून, व्यवस्थित घडी करून पुन्हा जिने ते लुगडं दिलेलं असायचं तिला परत केलं जायचं, पण गरीब महिलेला घडी मोडायला लुगडं देण्याची पद्धत फार कमी होती. जास्तीत महिला ह्या श्रीमंत महिलांनाच भाव द्यायच्या. ती जगाची रीतच आहे म्हणा. त्याला तोही काळ अपवाद नव्हता अन् हाही काळ नाहीय.

आजच्या यंत्रयुगात पाहिजे तेवढ्या रंगाच्या अन् डिझाईनच्या साड्या उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी लांब कुठेतरी जाऊन त्या आणाव्या लागत, पण आता हाकेच्या अंतरावर सगळं मिळत आहे. त्यामुळे आजच्या काळात एकमेकांच्या घरी गेल्यावर साडी चोळी देण्याची पद्धत सगळीकडे पाळली जाते, पण अशा दिलेल्या त्या साड्या अनेकदा कपाटात पडून राहतात किंवा पुन्हा आल्या तशाच दुसरीकडे फिरवल्या जातात.

ज्या भावनेने अन् सन्मानाने ती साडी चोळी म्हणजे आताच्या भाषेत ‘ब्लाऊज पीस’ दिलं जातं त्याच भावनेनं तो सगळ्याच स्त्रिया त्या साड्या नेसत नाहीत. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की, का करतात ही देवाण-घेवाण, जर तिचा उपयोग होतंच नसेल तर? बरं, एखाद्या घराची परिस्थिती नसेल अन् त्यांनी साडी चोळी देऊन सन्मान नाही केला, तर बायका रुसून बसतात. कालानुरूप काही गोष्टी प्रथा बदलल्या पाहिजेत.

जुन्या काळी केवळ कपड्यांचीच नाही, तर दागिन्यांचीही अशीच देवाण-घेवाण व्हायची. बायका एकमेकींना गळ्यातलं, कानातलं, नाकातलं सहज देत. लग्नकार्य असेल, तर बहिणीकडे असलेलं नेकलेस, वहिनीच्या कानातली किंवा मैत्रिणीची एखादी वस्तू सहज एका बाईने दुसरीला घालायला दिली तरी कुणालाही काही वाटायचं नाही.

विश्वास हा इतका ठाम होता, की कुणीही नेलेलं न मागता पुन्हा माघारी आणून देत असे. मी स्वतः माझ्या लग्नात माझ्या पुतण्याचा कोट घालायला नेला होता. तोही घेणार नव्हतो, पण मित्रांनी सांगितलं म्हणून त्याच्याकडून कोट नेला होता. लग्न झाल्यावर धुऊन पुन्हा माघारी आणून दिला. त्यामुळे माझी हौसही झाली अन् पैसेही वाचले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे दिवस ढकलले जातात. गरज भागली जाते. आहे त्यात समाधान मानून माणूस सुखी राहतो.

आजच्या काळात मात्र ही मानसिकता बरीच बदलली आहे. ‘माझं आणि तुझं’ यामधला फरक वाढला आहे. गावाकडची जुनी माणसं सांगतात की, ‘आमच्या काळी फक्त लुगड्याची घडी मोडत नव्हती, तर माणसांच्या मनात असलेल्या अढीच्याही भिंती मोडल्या जायच्या.’ गावाकडच्या स्त्रिया आपलं आयुष्य कपड्यांच्या पदरासारखं जगायच्या, जपायच्या.

त्या पदरातच त्यांचं संपूर्ण कुटुंब, सासर-माहेर, लेकरं आणि आपली छोटी मोठी स्वप्नं असायची. त्या मिळालेल्या वस्त्रात समाधान मानायच्या. एकमेकींना मदतीचा हात द्यायच्या आणि गरजेच्या वेळी समोरच्याच्या दुःखात आपला आनंद विसरून मदतीला धावून जायच्या. आजच्या आधुनिक जगात कपड्यांचे ब्रँड आले, कपड्यांची विक्री वाढली, पण वस्त्रांना असलेलं आत्मीयतेचं मोल मात्र हरवलं.

त्यामुळे काही चांगल्या जुन्या पद्धती ह्या नात्यांची घडी व्यवस्थित बसवायला फार उपयोगी असतात. त्यातून पुन्हा एकदा आत्मीयतेची शिवण घालायला मदत होऊ शकते. कारण गावाकडच्या त्या साध्या माणसांनी शिकवलेली एक गोष्ट कधीच विसरता येणार नाही अन् ती म्हणजे आपल्या आनंदाची घडी मोडण्याच्या कामात जर दुसऱ्याला सामावून घेतलं, तर माणुसकीची घडी कधीच विस्कटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com