नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण ही संकल्पना अमलात आणण्याचे योजले आहे. मातृभाषेव्यतिरिक्त इतर दोन भाषांमध्ये इंग्रजी आणि आपली राष्ट्रभाषा हिंदीचा समावेश आहे. तमिळनाडू राज्याने हिंदीचा समावेश शिक्षण प्रणालीमध्ये नाकारला आहे आणि तो एक राजकीय मुद्दा बनवला आहे.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्याला ते शिक्षण समजण्यास सोपे जाते. अर्थात, उच्च शिक्षणामध्ये विशेषतः शास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयांसाठी मातृभाषेतून पुस्तके उपलब्ध नाहीत, हा मोठा अडसर ठरणार आहे. काही राज्यांनी यावर कामास सुरवात केली आहे आणि मातृभाषेमध्ये अनेकविध पुस्तकांचे भाषांतर सुरूही केले आहे.
मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी आणि जिची राष्ट्रभाषा म्हणून ओळख आहे ती भाषा हिंदी आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदीबद्दल आत्मीयता आहे, पण दक्षिणेमधील काही राज्यांच्या बाबतीत भाषेचा मुद्दा विशेषत: हिंदी भाषेचा मुद्दा हा कळीचा ठरत आहे. दक्षिणेमध्ये तमिळनाडू आणि केरळ ही राज्ये वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हिंदी कमी अधिक प्रमाणात बोलली जाते आणि लिहिली जाते.
शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये पाठ्यक्रमामध्ये या भाषेचा या राज्यांत समावेशही आहे. अलीकडेच विशेषत: तमिळनाडू राज्याने हिंदीचा समावेश शिक्षण प्रणालीमध्ये नाकारला आहे आणि तो एक राजकीय मुद्दा बनवला आहे. यातूनच केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. ही संकीर्ण विचारपद्धती शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आणि घातक आहे.
याचा विपरीत असा परिणाम विद्यार्थी घटकावर होणार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच राज्यामध्ये त्याला नोकरीची शाश्वती किंवा तशी हमी कोणतेच राज्य देऊ शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्याला नोकरीनिमित्त इतर राज्यांमध्ये स्थलांतर गरजेचे होते. विशेषतः स्थलांतरासाठी त्याला हिंदी भाषिक राज्यात जावे लागल्यास त्याला हिंदी न येणे ही मोठी अडचण ठरू शकते.
नवीन शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्याला इतर संस्थांमधून क्रेडिट घेण्याची मुभा दिली गेली आहे. या संस्था त्या राज्याव्यतिरिक्तही असू शकतात. अशावेळी हिंदी भाषिक राज्यातील संस्था ज्यांना जागतिक पातळीवरही मानांकन मिळालेले आहे, उदाहरणार्थ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली विद्यापीठ, बनारस विश्वविद्यालय अशा नामांकित संस्थांमधून काही क्रेडिट्स विद्यार्थ्याला घेणे शक्य होणार आहे.
यासाठी ॲकॅडमी बँक ऑफ क्रेडिट ही नवीन संकल्पना या धोरणामध्ये आखली आहे. हिंदी भाषेला विरोधाचा विपरीत परिणाम अशावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. अनेक दक्षिणात्य कलाकारांना विशेषतः सिनेमासृष्टीतील कलाकारांना बॉलिवूडचे मोठे आकर्षण असते. अशावेळी हिंदी न येणे किंवा न समजणे ही त्याच्या बाबतीत अडचण ठरू शकते. स्वतःच्या भाषेबद्दल स्वाभिमान असणे आवश्यक आहे. पण याच भाषेच्या विस्तारासाठी आणि प्रगल्भतेसाठी इतर भाषा असणे आणि समजणे हे नितांत गरजेचे आहे.
भाषेचा दुस्वास नको
प्रसिद्ध मराठी लेखक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज म्हणत की, मराठी भाषेचा स्वार्थ अभिमान ठेवण्यासाठी इतर भाषेचा दुस्वास करणे अपेक्षित नाही. भाषा या नेहमीच संस्कारांचे आदान-प्रदान करण्याचे माध्यम राहिले आहे. भाषेचे संवर्धन करीत असताना अनेक वेळा इतर भाषेतील शब्द बऱ्याच वेळा जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत आणि आजही वापरत आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास मराठी भाषेत अनेक कन्नड शब्दांचा जसाचा तसा वापर करण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातील पसा हा शब्द मूळचा कानडी आहे. तसेच हिंदीमधील अनेक शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरले गेले आहेत. भाषा वृद्धिंगत करण्याकरिता अनेक वेळा परप्रांतीय किंवा परराष्ट्रीय लोकांनीही योगदान दिले आहे.
मराठीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकूण विसाव्या शतकापर्यंत मराठीमध्ये विरामचिन्हांचा वापर अस्तित्वात नव्हता. मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा म्हणजे पूर्णविराम, स्वल्पविराम, अल्पविराम इत्यादी चिन्हांचा वापर थॉमस कॅन्डी व मोल्सन या ब्रिटिश अभ्यासकांच्या माध्यमातून सुरू झाला! यासाठी या दोघांनी ५० वर्ष परिश्रम घेतले.
यातील मोल्सन हा कॅन्डीचा वरिष्ठ अधिकारी होता पण आजारपणामुळे त्याला इंग्लंडला परत जावे लागले आणि त्यानंतर थॉमस कॅन्डीने हे काम पूर्ण केले. या दोघांच्या अथक परिश्रमातून २५ हजार शब्दांचा पहिला मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी शब्दकोश अस्तित्वात आला. यातील थॉमस कॅन्डी हा पुण्यातील डेक्कन कॉलेजचा पहिला प्राचार्य होता.
मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी या दोघांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. साहित्याच्या आदान-प्रदानासाठी मातृभाषेबरोबरच इतर भाषा शिकणे तितकेच जरुरीचे आहे. तमीळ साहित्यातील उत्कृष्ट साहित्य इतर राज्यांत पोचवायचे असल्यास त्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर जरुरीचे आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली असल्याने हिंदीमध्ये केलेले भाषांतर जास्त प्रभावशाली ठरू शकते.
भाषेपासून वंचित ठेवणे निष्ठुरपणाचे
प्राचीन काळी जी आंतरराष्ट्रीय गुरुकुले अस्तित्वात होती त्यातील नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला शारदा पीठ ही आजच्या हिंदी भाषिक उत्तरेकडील भागात वसलेली होती. त्यामुळे दक्षिण प्रांतात विशेषत: मौजी बंधनानंतर त्या विद्यार्थ्यास उत्तरेकडे सात पावले चालण्याचा संस्कार अस्तित्वात होता.
या संस्काराचा मतितार्थ असा होता की, उच्च शिक्षणासाठी तुला उत्तरेमधील या गुरुकुलांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळो व तुला तिथे उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळोत. आदी शंकराचार्य हे मूळचे केरळचे. पण शिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी काश्मीरस्थित शारदा विद्यापीठात काही काळ व्यतीत केला. आजही काश्मीरमधील श्रीनगर येथे शंकराचार्यांचे मंदिर अस्तित्वात आहे.
याचाच अर्थ असा की, प्राचीन काळीही भाषांना सीमेचे बंधन नव्हते. अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेल्या ओपन हायमर या अमेरिकन शास्त्रज्ञावर भगवत् गीतेचा मोठा प्रभाव होता आणि ती समजण्यासाठी त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास केला. संस्कृतबरोबरच त्याला लॅटिन ग्रीक रोमन इत्यादी इतर भाषाही अवगत होत्या.
रामायण, महाभारत, गीता इत्यादी ग्रंथ भारतभर पोचण्यासाठी विविध भाषांचे योगदान आहे आणि म्हणूनच भाषांना सीमांमध्ये अडकविणे अत्यंत संकुचित मनोवृत्तीचे प्रतीक आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२०मध्ये मुक्त आणि उदार शिक्षणाचा अंगीकार केला आहे आणि विद्यार्थ्याला आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भाषेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
अनेक भाषेचा अभ्यास विद्यार्थ्यास जास्त प्रगल्भ बनवी ते त्यामुळे शिक्षणामध्ये एखाद्या भाषेपासून त्याला वंचित ठेवणे अत्यंत निष्ठुरपणाचे आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे ज्या अनेक समस्या उद्भवल्या त्यातील इतर भाषांचा द्वेष ही एक महत्त्वाची समस्या निर्माण झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरण या समस्येचे निवारण करण्याची एक संधी आहे आणि त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थासाठी इतर भाषांचा द्वेष हा अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.